तृप्ती राणे

बाजार नियामक ‘सेबी’ने शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२० ला मल्टिकॅप फंडांचे अ‍ॅसेट अलोकेशन म्हणेजच लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप गुंतवणुकीचे किमान प्रमाण ठरवून दिले. या म्युच्युअल फंडांना दिलेल्या निर्देशांचे तीन मुख्य पैलू आहेत :

१. किमान समभाग निगडित गुंतवणूक ७५ टक्के (आधी ६५ टक्के) करावी लागेल.

२. किमान २५ टक्के गुंतवणूक प्रत्येकी लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये ठेवावी लागेल.  (या आधी मल्टिकॅप फंड हे कुठे व किती पैसे गुंतवायचे हे स्वत: ठरवू शकत होते.)

३. पोर्टफोलिओमध्ये हे बदल करण्यासाठी ३१ जानेवारी २०२१ पर्यंतचा कालावधी म्युच्युअल फंडांना दिला गेला आहे.

हे असे करण्यामागे एक मोठे कारण सेबीकडे होते. सेबीच्या लक्षात आले की, अनेक फंड हे नावाने मल्टिकॅप असूनही लार्जकॅपमध्ये जास्त गुंतवणूक ठेवत होते. मिड व स्मॉलकॅपमध्ये त्यांची गुंतवणूक खूप कमी किंवा अनेक प्रसंगी शून्य होती. ३१ ऑगस्ट २०२० ला उपलब्ध माहितीनुसार, जर आपण मल्टिकॅप फंडांचा अभ्यास केला तर लक्षात येईल की, काही मल्टिकॅप फंड हे ७५ टक्के लार्ज कॅप गुंतवणूक बाळगून होते, तर काही फंडांमध्ये स्मॉल कॅप गुंतवणूकच नव्हती! त्यामुळे या फंडांचा पोर्टफोलिओ त्यांच्या नावानुसार नव्हता. शिवाय परताव्याचा बेंचमार्क ठेवताना लार्ज कॅप (पहिल्या १०० कंपन्या) आणि लार्जकॅपकडे झुकलेल्या मल्टिकॅप फंडांमध्ये (पहिल्या ५०० कंपन्या) तफावत होत होती. परिणामी मल्टिकॅप फंडांचे परतावे बेंचमार्कपेक्षा सरस वाटायची शक्यता जास्त होती. तेव्हा या मल्टिकॅप फंडांना त्यांच्या नावाप्रमाणे वागायला लावण्यासाठी ही तरतूद करण्यात आली. आजच्या लेखामधून आपण या बदलामुळे गुंतवणुकीवर होणाऱ्या परिणामाचा आढावा घेणार आहोत.

आजच्या घडीला बाजारात असणारे इक्विटी अर्थात समभागसंलग्न फंड हे गुंतवणूदारांच्या साधारणपणे पावणे दहा लाख कोटी रुपयांना सांभाळतात. त्यामध्ये सर्वात जास्त योगदान हे लार्जकॅप फंडांचे (साधारणपणे एक तृतीयांश) आणि त्या खालोखाल मल्टिकॅप फंडांचे (२० टक्के) आहे. तुलनेने मिड आणि स्मॉलकॅप फंडांचा पसारा बऱ्यापैकी कमी आहे (क्रमश: नऊ आणि पाच टक्के). लार्जकॅप फंड हे गुंतवणूकदारांना जास्त आवडतात कारण हे फंड मिड आणि स्मॉलकॅपपेक्षा कमी जोखमीचे वाटतात. परंतु लार्जकॅपमधील गुंतवणूक ही मल्टिकॅपपेक्षा जास्त जोखमीची असू शकते. कारण मल्टिकॅप फंड हे आधी सांगितल्या प्रमाणे बाजाराच्या परिस्थिती आणि गुंतवणुकीची संधी यानुसार पोर्टफोलिओमध्ये बदल करू शकतात.  असे करणे लार्ज कॅप फंडांना शक्य होत नाही. कारण त्यांना किमान ८० टक्के गुंतवणूक ही बाजार भांडवलानुसार अव्वल १०० कंपन्यांमध्येच करावी लागते. मग त्या कंपन्या कितीही महाग असल्या तरीसुद्धा फंडांना त्याच विकत घ्याव्या लागतात. या उलट मल्टिकॅप फंड हे मिड आणि स्मालकॅप कंपन्यांमध्ये योग्य वेळी पैसे गुंतवून जोखीम व्यवस्थापन चांगलं करून थोडे जास्त परतावे देऊ शकतात. परंतु नवीन नियमानुसार आता मल्टिकॅप फंडांना पूर्वीइतके स्वातंत्र्य राहणार नाही.

आता आपण वळूया नवीन नियमांमुळे फंडांना कराव्या लागणाऱ्या बदलांकडे. गेल्या महिन्यातील मल्टिकॅप फंडांच्या सामूहिक पोर्टफोलिओमध्ये मिडकॅप २१ टक्के, तर स्मॉलकॅपचे प्रमाण ६ टक्के इतके होते. तेव्हा ३१ जानेवारीपर्यंत अजून ४ टक्के मिडकॅपमध्ये तर स्मॉलकॅपमध्ये १९ टक्के इतकी वाढ होणे अपेक्षित आहे. परिणामी, मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर वाढतील आणि लार्ज कॅप शेअर्सचा भाव खाली येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवाय, मिड आणि स्मॉल कॅपचे प्रमाण वाढल्यामुळे मल्टिकॅप फंडांची जोखीमसुद्धा वाढेल.

जर फंडांना नवीन नियमाप्रमाणे त्यांचे अ‍ॅसेट अलोकेशन करायचं नसेल तर इतर काही पर्यायसुद्धा त्यांच्याकडे आहेत. ते स्वत:ला मल्टिकॅप न म्हणवता, लार्ज अँड मिडकॅप म्हणवू शकतील, किंवा जर पोर्टफोलिओ ३० कंपन्यांपुरता मर्यादित करता आला तर फोकस्ड फंडांच्या श्रेणीमध्ये ते स्वत:ला बसवू शकतील. अशा परिस्थितीत पोर्टफोलिओमध्ये फार बदल न करता फंड चालू ठेवता येईल. पण जर त्या म्युच्युअल फंड घराण्यामध्ये आधीपासून अशा प्रकारचे फंड असतील, तर मग दोन्ही फंड एकत्र केले जातील.

या शिवाय काही फंड मल्टिकॅपमधील जास्तीचे लार्ज कॅप स्वत:च्या लार्जकॅप फंडाला विकून, आणि मिड आणि स्मॉलकॅप फंडाकडून तिथले शेअर्स घेऊनसुद्धा हवे ते बदल घडवून आणू शकतील. हा पर्याय वापरल्यास बाजारातून फारशी खरेदी करावी लागणार नाही आणि त्यामुळे शेअर्सच्या किमती फार वर-खालीसुद्धा होणार नाहीत. परंतु असे करणे सगळ्याच फंडांना शक्य नाही.

येत्या काळात मिड आणि स्मालकॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढेल. आणि म्हणून त्यांच्या किमतीसुद्धा वाढतील. तसे अजून चार महिने आहेत. आणि त्याआधी जर बाजारात करेक्शन आले तर थोडय़ा फार प्रमाणात मिड कॅपचे २५ टक्के प्रमाण कदाचित बसेल, पण स्मॉल कॅपमध्ये तसे होणार नाही. चांगल्या स्मॉल कॅप कंपन्या कमी आहेत. त्यातसुद्धा प्रवर्तकाचे शेअर बाजूला केले तर गुंतवणूकदारांच्या खरेदी-विक्रीसाठी बाजारात मिळणारे शेअर्स अजून कमी आहेत. तेव्हा ठरावीक कंपन्यांचे शेअर हे थोडय़ा काळामध्ये जास्त वर जातील. परंतु जोवर यांची रोकड सुलभता चांगली होत नाही तोवर खऱ्या अर्थाने सेबीच्या उद्दिष्टानुसार मिड आणि स्मॉलकॅप कंपन्यांमध्ये चांगली गुंतवणूक होणे कठीण आहे.  शिवाय प्रत्येक फंडामध्ये हे बदल कसे घडवले जात आहेत हे सुद्धा येणारा काळ दाखवेल.

पर्याय कुठलाही असो, परंतु परिणाम मात्र संपूर्ण बाजारावर आणि परिणामी तुमच्या मल्टिकॅपव्यतिरिक्त इतर गुंतवणुकीवरसुद्धा होईल. मागे जेव्हा मे २०१८ मध्ये सेबीने इतर म्युच्युअल फंडांच्या श्रेणी ठरविल्या होत्या त्यानंतर अनेक फंडांच्या कामगिरीत नकारात्मक बदल जाणवले होते. तेव्हा यावेळीसुद्धा काही विपरीत होईल का अशी भीती गुंतवणूकदाराला वाटणे साहजिक आहे. यावर उपाय म्हणजे गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडे असलेल्या फंडांचा पोर्टफोलिओ आणि त्यातील जोखमीवर येत्या काळात नीट लक्ष देऊन त्यावर गरजेनुसार निर्णय घेणं आवश्यक आहे. गुंतवणूकदारांच्या जोखीम क्षमतेच्या पलीकडे फंडाची जोखीम जात असल्यास त्यातून वेळीच बाहेर पडणे जास्त फायद्याचे ठरेल. याकामी त्यांना आर्थिक सल्लागार निश्चितच मदत करू शकतील.

* लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार trupti_vrane@yahoo.com