26 September 2020

News Flash

नावात काय? : स्पॉट रेट, फॉरवर्ड रेट

परकीय चलनाची खरेदी-विक्री करायची असल्यास ज्या दिवशी प्रत्यक्ष खरेदी-विक्री होते तो दर म्हणजे स्पॉट रेट होय.

(संग्रहित छायाचित्र)

कौस्तुभ जोशी

परकीय चलनात व्यवहार करताना चलनाचा दर हा बाजाराच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. सध्याच्या काळात आपण ‘फ्लेक्सिबल एक्स्चेंज रेट सिस्टिम’ म्हणजेच बाजारप्रणीत चलन बदलाची व्यवस्था स्वीकारलेली आहे. याचा अर्थ परकीय चलनाचा दर हा रिझव्‍‌र्ह बँक किंवा सरकार ठरवून देत नाही तर परकीय चलनातील मागणी आणि पुरवठय़ाच्या परिस्थितीनुसार त्यात चढ-उतार होत असतात. अशा वेळी परकीय चलनाची मोठय़ा प्रमाणावर खरेदी करायची असेल, अथवा आपणच वस्तू निर्यात केली असेल आणि आपल्याला परकीय चलन मिळणार असेल तर अल्पकाळात विशेष फरक पडत नाही. मात्र तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीत जर चलनाचा दर वर किंवा खाली झाला तर व्यवहारात त्याचा निश्चितच धोका संभवू शकतो. म्हणून परकीय चलनाच्या व्यवहारांमध्ये स्पॉट रेट आणि फॉरवर्ड रेट या दोन संकल्पना महत्त्वाच्या ठरतात.

स्पॉट रेट म्हणजे काय?

परकीय चलनाची खरेदी-विक्री करायची असल्यास ज्या दिवशी प्रत्यक्ष खरेदी-विक्री होते तो दर म्हणजे स्पॉट रेट होय. उदाहरणार्थ, समजा २३ डिसेंबर रोजी एका व्यापाऱ्याने १,००० अमेरिकी डॉलर विकत घेतले आणि त्याची डिलिव्हरी ताबडतोब घेतली. त्या वेळी एका डॉलरचा दर हा ७५ रुपये असेल तर तो त्या दिवशीचा स्पॉट रेट ठरतो.

फॉरवर्ड रेट म्हणजे काय?

विनिमय बाजारातील खरेदी-विक्रीचा सौदा हा आजच्या दिवशी होतोय, पण त्याची डिलिव्हरी भविष्यातील एका ठरवलेल्या दिवशी मिळणार आहे म्हणजेच आपण स्पॉट रेट नव्हे तर फॉरवर्ड रेटविषयी आपण बोलतो आहोत असे समजा!  फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एक प्रकारचा करार समजूया, की ज्यात एका भविष्यातील तारखेला तुम्हाला डॉलर किंवा जी पाहिजे त्या परकीय चलनाची रक्कम उपलब्ध करून दिली जाईल. मात्र, याचा सौदा आज केला जाईल.

समजा, एका व्यापाऱ्याला वस्तू आयात करायची आहे आणि त्यासाठी एकूण १,००० डॉलर लागणार आहेत. यापैकी २५० डॉलर स्पॉट दराने विकत घेऊन त्याने व्यवहार सुरू केला आहे व उरलेले ७५० डॉलर त्याला पुढील तीन महिन्यांत अदा करायचे आहेत. अशा वेळी जर पुढच्या तीन महिन्यांत डॉलरचा दर वाढणार असेल तर आताच फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट करून भविष्यातील वाढणाऱ्या दरापासून त्याला संरक्षण मिळू शकेल. या फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टची मुदत ज्या दिवशी संपेल म्हणजेच त्याची मॅच्युरिटी येईल त्या दिवशी त्याला ते डॉलर मिळतील. भविष्यातील वाढणाऱ्या विनिमय दरापासून संरक्षण मिळण्यासाठी जेव्हा अशा प्रकारची फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट केली जातात तेव्हा त्यासाठी ‘हेजिंग’ असाही शब्दप्रयोग वापरला जातो. तसेच परकीय चलनामध्ये होणाऱ्या चढ-उतारांचा लाभ घेण्यासाठी आणि सतत वर-खाली असणाऱ्या चलनाच्या दरामुळे नफा कमावण्यासाठी जर एखाद्या ट्रेडरने अशी कॉन्ट्रॅक्ट केली असती असतील तर त्याला ‘स्पेक्युलेशन’ असे म्हटले जाते.

(लेखक वित्तीय नियोजनकार, अर्थशास्त्राचे प्राध्यापक)

joshikd28@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2019 4:10 am

Web Title: spot rate forward rate in foreign currency abn 97
Next Stories
1 माझा पोर्टफोलियो : डिजिटल युगाचा सांगावा
2 अर्थ चक्र : युद्धविराम
3 बाजाराचा तंत्र कल : अनर्थ टाळायचा तर..
Just Now!
X