आशीष ठाकूर

मागील आठवडय़ातील या स्तंभातील लेखातील वाक्य होते – ‘सद्य:स्थितीत निफ्टी निर्देशांक  १५,००० चा स्तर राखत असल्याने, आता निफ्टी निर्देशांकावर वरचे लक्ष्य हे १५,४५० असेल.’ सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारचा दिवसांतर्गत उच्चांक १५,४६९ तर, साप्तहिक बंद १५,४३५ च्या स्तरावर झाल्याने निफ्टी निर्देशांकाने १५,४५० चा अचूक लक्ष्यभेद केला. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ५१,४२२.८८

निफ्टी : १५,४३५.६५

येणाऱ्या दिवसात निर्देशांकाचे वरचे लक्ष्य सेन्सेक्सवर ५२,००० आणि निफ्टीवर १५,६०० असे असेल. हे लक्ष्य साध्य झाल्यावर एक घसरण अपेक्षित असून तिचे खालचे लक्ष्य सेन्सेक्सवर ५०,००० आणि निफ्टीवर १५,००० असेल. आतापर्यंत निफ्टी निर्देशांकाच्या उच्चांकाचे भाकीत वर्तवण्यासाठी निफ्टीवर ३०० अंशांची ‘जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली’ विकसित केली आणि ती काळाच्या कसोटीवर खरी उतरलीही. आता हाच दुवा साधत येणाऱ्या तीन वर्षांचा कालावधी म्हणजे २०२४ पर्यंत निर्देशांकाची वाटचाल कशी असेल त्यातील उच्चांकाचे शिखर तर मंदीची खोल दरी काय असेल याचा विस्तृत आढावा घ्यायचा प्रयत्न करूया. यासाठी काही आर्थिक गृहीतके, आंतरराष्ट्रीय संस्थांचे भारताबाबतचे आर्थिक अहवाल अशा सर्वाचा आधार घेत भविष्यात डोकावण्याचा प्रयत्न असेल. ती आर्थिक गृहीतके खालीलप्रमाणे –

गृहीतक १ – करोनाच्या दाहकतेतही वस्तू व सेवा कराचे विक्रमी संकलन. मार्चमध्ये १.२३ लाख कोटी, तर एप्रिलमध्ये १.४१ लाख कोटींचे झालेले जीएसटी संकलन आश्वासक निश्चितच.

गृहीतक २ – आज उद्योगधंद्याच्या बाबतीत ‘खोखो’चा खेळ  चालू आहे. काही उदयोगधंदे पळत आहेत तर काहीना ‘खो’ बसत आहे. हॉटेल, पर्यटन, विमानसेवा, सिनेमागृह, वाहतूक व्यवसाय अशा उद्योगांना आताच्या घडीला ‘खो’ बसत आहे. त्यामुळे या उद्योगधंद्यात पूर्ण क्षमतेने कार्य होत नसल्याने, उद्योगधंद्यांच्या रथाची दोन्ही चक्र एकाच गतीने फिरत नसल्याने, असमतोल दिसून येत आहे. पण येणाऱ्या सहा महिन्यांत वेगवान करोना लसीकरण झाल्यास रथचक्राची दोन्ही चक्र एकाच लयीत फिरल्यास समतोल तर साधला जाईलच, पण हीच क्षेत्र वस्तू व सेवा करात भरीव योगदान देणारी असल्याने अर्थव्यवस्थेस उभारी मिळेल.

गृहीतक ३ – आर्थिक रथाची दोन्ही चक्र एकाच गतीने – लयीत फिरल्यास जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालाची दखल घेणे क्रमप्राप्त ठरेल. या दोन्ही संस्थांनी भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) हे दहा टक्क्य़ांवर झेपावण्याचे भाकित वर्तविले आहे. हा सुखद अनुभव पूर्वी आपण एकदाच घेतला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान काळात २००३ ला आठ टक्कय़ांच्या जीडीपी वृद्धीचे सुख आपण अनुभवले. त्यानंतर जीडीपी उणे २४ अंशांपर्यंत घसरण्याची दाहकता देखील अनुभवली. त्यामुळे या वर्षांअखेरपर्यंत आर्थिक रथचक्राची दोन्ही चक्र एकाच गतीने-लयीत फिरल्यास, येणाऱ्या वर्षांतील अर्थव्यवस्थेची गरुडभरारी याची देही याची डोळा पाहायला मिळेल.

गृहीतक ४ – हवामान शास्त्रज्ञांच्या मते या वर्षीदेखील पाऊस समाधानकारक राहणार असल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेस उभारी मिळेल.

या लेखात नमूद केलेली वरील आर्थिक गृहीतके प्रत्यक्षात आल्यास, जी सुबत्ता येईल ती निफ्टीच्या उंची पेहरावात परावर्तित होऊन निफ्टीच्या पैठणीच्या पदरावरील मोराचा पिसारा १६,०००, १८,००० की २०,००० पर्यंत फुलणार, याचा आढावा पुढील लेखात घेऊया (क्रमश:)

निकालपूर्व विश्लेषण..

१) ऑरोबिंदो फार्मा लिमिटेड

*  तिमाही वित्तीय निकाल –    सोमवार, ३१ मे

*  २८ मेचा बंद भाव- १,०२२.५० रु.

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,००० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,००० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,०६० रुपये, द्वितीय लक्ष्य १,१५० रुपये

ब) निराशादायक निकाल : १,००० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ९३० रुपयांपर्यंत घसरण.

२) मदरसन सुमी सिस्टिम्स लिमिटेड

*  तिमाही वित्तीय निकाल –    बुधवार, २ जून

*  २८ मेचा बंद भाव – २३५.२० रु.

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २२० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २२० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २४५ रुपये, द्वितीय लक्ष्य २७० रुपये

ब) निराशादायक निकाल: २२० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १९० रुपयांपर्यंत घसरण.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.