|| प्रवीण देशपांडे

  • प्रश्न : मी नुकताच नोकरीतून निवृत्त झालो आहे. मी या वर्षी (आर्थिक वर्ष २०१८-१९) काही शेअर्सचे खरेदी-विक्री व्यवहार केले आहेत या मध्ये पुढील नफा आणि तोटय़ांचा समावेश आहे. नोंदणीकृत शेअर्स विक्रीतून अल्प मुदतीचा भांडवली नफा ४८,४०० रुपये, अल्प मुदतीचा भांडवली तोटा १४,५०० रुपये, दीर्घ मुदतीचा भांडवली नफा १५,७०० रुपये आणि दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा २२.५०० रुपये. हे सर्व व्यवहार मी शेअर बाजारामार्फत केलेले आहेत. यावर कर आकारणी कशी असेल? – सुदर्शन मांडवे, पुणे

उत्तर : आपल्याला झालेला अल्प मुदतीचा भांडवली तोटा (१४,५०० रुपये) हा अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यातून (४८,४०० रुपये) वजा होईल आणि बाकी रक्कम (४८,४०० रुपये वजा १४,५०० रुपये = ३३,९०० रुपये) करपात्र असेल. या रकमेवर ‘एसटीटी’ भरला असल्यामुळे आपल्याला या रकमेवर १५ टक्के इतका सवलतीच्या दरात कर (अधिक  ४ टक्के शैक्षणिक आणि आरोग्य कर) भरावा लागेल. दीर्घ मुदतीचा भांडवली नफा कलम १०(३८) नुसार ३१ मार्च २०१८ पूर्वी पर्यंत करमुक्त होता. त्यामुळे असा दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा कोणत्याही उत्पन्नातून वजा करता येत नव्हता आणि तो पुढील वर्षांसाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ सुद्धा करता येत नव्हता. परंतु १०(३८) हे कलम १ एप्रिल २०१८ पासून रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे दीर्घ मुदतीचा भांडवली नफा हा करपात्र झाला आहे (हा कर १० टक्के एक लाख रुपयांच्या वर, अटींची पूर्तता केल्यास) आणि त्यावर होणारा तोटासुद्धा इतर दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येतो आणि त्यावर्षी तो पूर्णपणे वजा होत नसेल तर पुढील वर्षांंसाठी कॅरी फॉरवर्डसुद्धा करता येतो. त्यामुळे आपल्याला झालेला दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा (२२,५०० रुपये) हा पूर्णपणे दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून (१५,७०० रुपये) वजा होत नाही. त्यामुळे बाकी ६,८०० रुपयांचा तोटा पुढील ८ वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येईल. यासाठी आपल्याला विवरणपत्र मुदतीत दाखल करणे गरजेचे आहे. दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा हा अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येत नाही.

 

  • प्रश्न : मी माझे राहते घर मे २०१८ मध्ये विकून जून २०१८ मध्ये दुसरे घर खरेदी केले आहे. मी माझे घर ७० लाख रुपयांना विकले त्यावर घर खरेदी करणाऱ्याने १ टक्का इतका उद्गम कर (टीसीएस) म्हणजे ७०,००० रुपये कापून मला बाकी पैसे दिले. मी नवीन घरामध्ये गुंतवणूक केल्यामुळे मला माझ्या घराच्या विक्रीच्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागणार नाही. पण माझ्या घर विक्रीवर कापलेला ७०,००० रुपये उद्गम कर मला परत मिळेल का? – प्रकाश मिस्त्री, ईमेलद्वारे

उत्तर : आपण आपल्या राहत्या घराच्या विक्रीवर झालेला दीर्घ मुदतीचा भांडवली नफा नवीन घरात गुंतविला असल्यामुळे आपल्याला या भांडवली नफ्यावर कर भरावा लागणार नाही. परंतु आपल्या घरविक्रीवर कापला गेलेल्या उद्गम कराचा दावा आपल्याला आर्थिक वर्ष २०१८-१९ (कर निर्धारण वर्ष २०१९-२०) चे विवरणपत्र भरून करता येईल. विवरणपत्रात आपल्याला घर विक्रीचा व्यवहार ‘भांडवली नफा’ या सदरात विक्रीचा, कलम ५४ नुसार नवीन घरात गुंतवणुकीचा आणि उद्गम कराचा तपशील दाखवावा लागेल.

 

  • प्रश्न : माझ्या लग्नात माझ्या मित्रांनी एक दागिन्यांचा सेट भेट म्हणून दिला. या सेटची किंमत ३ लाख रुपये इतकी आहे. मला या भेटीवर कर भरावा लागेल का? – पायल देसाई, ईमेलद्वारे

उत्तर : कलम ५६ नुसार ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या भेटी एका आर्थिक वर्षांत मिळाल्या असतील तर त्या करपात्र आहेत. परंतु काही प्रसंगात मिळालेल्या भेटी या करमुक्त आहेत. या प्रसंगामध्ये लग्नाचा समावेश होतो. त्यामुळे लग्नात मिळालेल्या भेटी या करमुक्त आहेत.

 

  • प्रश्न : मी माझ्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी सरकारी बँकेकडून २० लाख रुपयांचे शैक्षणिक कर्ज घेतले आहे. या कर्जाची परतफेड म्हणून मी आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये एकूण २,४०,००० रुपये बँकेला ‘ईएमआय’ देणार आहे. मला या रकमेची वजावट माझ्या उत्पन्नातून दाखविता येईल का? -आशुतोष काळे, मुंबई</strong>

उत्तर : ‘कलम ८० ई’नुसार स्वत:च्या, पती/पत्नीच्या आणि मुलांच्या उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावर भरलेल्या व्याजाची वजावट मिळते. या कर्जावरील केलेल्या मुद्दल रकमेची परतफेड वजावट म्हणून मिळत नाही. त्यामुळे आपण एकूण भरलेल्या २,४०,००० रुपयांपैकी फक्त व्याज रकमेची वजावट आपण उत्पन्नातून घेऊ शकता. यासाठी बँकेकडून मुद्दल आणि व्याज या रकमेच्या परतफेडीचे प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे.

 

  • प्रश्न : मी एक पगारदार नोकर आहे. मी एक घर भाडय़ाने घेतले आहे. या घराचे दरमहा भाडे ६०,००० रुपये इतके आहे. मला या रकमेवर उद्गम कर (टीडीएस) कापावा लागेल का? तो किती, कसा आणि कधी भरावा लागेल? – ऋषी सावंत, मुंबई

उत्तर : १ जून २०१७ पासून झालेल्या सुधारणेनुसार जे वैयक्तिक करदाते आणि हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ) करदाते आहेत आणि जे दरमहा ५०,००० रुपयांपेक्षा जास्त भाडे देत आहेत अशांना उद्गम कराच्या तरतुदी (कलम १९४-आयबी) लागू करण्यात आल्या आहेत. या उद्गम कराचा दर ५ टक्के इतका आहे. हा उद्गम कर आपल्याला वर्षांच्या शेवटच्या महिन्यात कापावा लागतो किंवा भाडे करारनामा वर्षांच्या आतमध्ये संपला तर करारनाम्याच्या शेवटच्या महिन्यात उद्गम कर कापावा लागतो. जर आपला भाडे करारनामा दोन आर्थिक वर्षांत विभागला गेला असेल तर आर्थिक वर्षांच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये आणि दुसऱ्या आर्थिक वर्षांत ज्या महिन्यात भाडे करारनामा संपेल त्या महिन्यात कापावा लागेल. उदा. आपले भाडे करारनामा १ ऑक्टोबर २०१७ ते ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत आहे, तर आपल्याला आर्थिक वर्षांच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे मार्च २०१८ मध्ये आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये केलेल्या सहा महिन्यांच्या (ऑक्टोबर ते मार्च) भाडय़ाच्या रकमेवर ५ टक्के इतका उद्गम कर कापावा लागेल. म्हणजे आपल्या दरमहा ६०,००० रुपयांच्या भाडय़ावर, ३,६०,००० रुपयांवर ५ टक्के म्हणजे १८,००० रुपये मार्च महिन्याचे भाडे देताना कापावा लागेल. आणि दुसऱ्यांदा ऑगस्ट २०१८ मध्ये (ज्या महिन्यात करारनामा संपेल) उद्गम कर कापावा लागेल. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये पाच महिन्यांच्या भाडय़ावर म्हणजेच ३,००,००० रुपयांवर ५ टक्के म्हणजे १५,००० रुपये इतका कर कापावा लागेल. हे झाले कर कधी कापावा या विषयी, आता हा कापलेला कर कधी भरावा? ज्या महिन्यात उद्गम कर कापला आहे तो महिना संपल्यानंतर ३० दिवसाच्या आत हा उद्गम कर आपल्याला ‘फॉर्म २६ क्यूसी’मध्ये चलन भरून तो भरावा लागेल. उदाहरणार्थ, आपण मार्च २०१८ मध्ये उद्गम कर कापला असेल तर ३० एप्रिल २०१८ पर्यंत भरावा लागेल आणि ऑगस्ट २०१८ मध्ये कापलेला कर ३० सप्टेबर २०१८ पूर्वी भरावा लागेल.

उद्गम कर ऑनलाइन भरता येतो. इतर उद्गम कर भरताना करदात्याला ‘टॅन’(कर वजावट क्रमांक) साठी अर्ज करून या क्रमांकावर कर भरावा लागतो. परंतु या घरभाडे उत्पन्नावर उद्गम कर भरताना हा क्रमांक घेणे गरजेचे नाही. हा कर आपला आणि घर मालकाचा ‘पॅन’ (पर्मनंट अकाऊंट नंबर) फॉर्म २६ क्यूसीमध्ये दर्शवून भरता येतो. हा कर भरताना दोघांचे ‘पॅन’ असणे गरजेचे आहे. जर घर मालकाचा ‘पॅन’ नसेल तर घरभाडय़ावर २० टक्के इतका उद्गम कर कापावा लागेल. हा कर भरल्यानंतर १५ दिवसात भाडेकरूने, मालकाला ‘फॉर्म १६ सी’मध्ये कर कापल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.

हे प्रमाणपत्र  www.tdscpc.gov.in या संकेत स्थळावरून डाऊनलोड करून देता येते. या कलमानुसार उद्गम कर कापताना काही मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत. फक्त निवासी-भारतीय मालकांना घरभाडे दिले तरच या कलमाच्या तरतुदी लागू होतात.

अनिवासी भारतीयांना घर भाडे दिले असेल तर ‘कलम १९५’च्या तरतुदी लागू होतात. ज्यांच्या धंदा-व्यवसायाची वार्षिक उलाढाल ‘कलम ४४ एबी’नुसार नमूद केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे अशांना ‘कलम १९४ आय’नुसार उद्गम कर कापावा लागतो, अशांना हे ‘कलम १९४-आयबी’ लागू होत नाही.

  • लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत. त्यांच्याशी ई-मेल pravin3966@rediffmail.com वर संपर्क साधून आपले करविषयक प्रश्न विचारता येतील.