आशीष ठाकूर

अर्थव्यवस्थेवर करोनाचे दुष्परिणाम होण्याचा एप्रिल ते सप्टेंबर हा टिपेचा कालावधी. अर्थव्यवस्था गळून पडल्यागत वाटत होती. अशा मरगळलेल्या, उदासीन सामाजिक, आर्थिक वातावरणात ऑक्टोबर महिन्याच्या पूर्वार्धात एचडीएफसी बँकेचे प्रमुख आदित्य पुरी यांचे आश्वासक वक्तव्य, टीसीएसची दमदार आर्थिक कामगिरी, दुचाकी, चारचाकी, मालवाहतूक करणाऱ्या ट्रक अशा सर्व वाहनांची सप्टेंबरमधील तडाखेबंद विक्री पाहून आताच्या मरगळलेल्या सामाजिक, आर्थिक वातावरणात वरील बातम्या मन पल्लवीत करणाऱ्या आशादायकच! या पार्श्वभूमीवर चालू आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ४०,५०९.४९

निफ्टी : ११,९१४.२०

या स्तंभातील १४ सप्टेंबरच्या ‘दिस जातील दिस येतील’ या लेखातील वाक्य होतं – ‘‘आपल्या भांडवली बाजारात घातक उतार आले तरी, या पडझडीत निर्देशांक – म्हणजे सेन्सेक्स ३६,६५० आणि निफ्टी १०,८००चा स्तर राखण्यात यशस्वी ठरल्यास हे वाईट दिस, भोग सरून सुखाचे चांगले दिस येतील.’’ या वाक्यातील शब्द न शब्द आपण बाजाराच्या वाटचालीतून अनुभवला.

कसं ते पाहा.. १६ सप्टेंबरला सेन्सेक्सवर ३९,३५९ आणि निफ्टीवर ११,६१८ चा उच्चांक नोंदवत बाजारात घसरण सुरू झाली व बरोबर २४ सप्टेंबरला ‘सेन्सेक्स’ने ३६,४९५ आणि निफ्टीवर १०,७९० चा नीचांक नोंदविला. हा स्तर राखण्यात निर्देशांक यशस्वी ठरल्याने हे वाईट दिस, भोग सरून, निर्देशांकावर नीचांकापासून सेन्सेक्सवर चार हजार अंशांची आणि निफ्टीवर अकराशे अंशांची तेजी आल्याने पुन्हा सुखाचे चांगले दिस आले. शिवाय हे सगळे अवघ्या एक महिन्याच्या आत घडले.

येणाऱ्या दिवसातील निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर ४१,०७० ते ४१,५५० आणि निफ्टीवर १२,०५० ते १२,२०० असे असेल. त्या नंतरच्या हलक्याफुलक्या पडझडीत सेन्सेक्सला  ३९,६०० ते ३८,६५० आणि निफ्टीला ११,७०० ते ११,४०० चा भरभक्कम आधार असेल. या स्तराचा आधार घेत निर्देशांकाचे वरचे लक्ष्य सेन्सेक्सवर ४१,०७० ते ४१,५५० आणि निफ्टीवर १२,३०० ते १२,५०० असेल.

समभाग विश्लेषण

वाचकांनी विचारणा केलेल्या समभागांच्या निकालपूर्व तिमाही विश्लेषणाकडे वळूया.

एचडीएफसी बँक

* तिमाही वित्तीय निकाल – शनिवार, १७ ऑक्टोबर

* ९ ऑक्टोबरचा बंद भाव- १,२३३.७० रु.

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,१५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,१५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,२६०, द्वितीय लक्ष्य १,३००.

ब) निराशादायक निकाल : १,१५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,०८० रुपयांपर्यंत घसरण.

(एचडीएफसी बँक संदर्भातील विचारणा – विजय सोनार, अशोक शिरभाटे, प्रशांत हनमसेठ आणि सावंत यांच्याकडून)

हिंदुस्तान युनिलीव्हर लि.

*  तिमाही वित्तीय निकाल – मंगळवार, २० ऑक्टोबर

*  ९ ऑक्टोबरचा बंद भाव- २,१३८.८५ रु.

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – २,१५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून २,१५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २,२५०, द्वितीय लक्ष्य २,३५०.

ब) निराशादायक निकाल : २,१५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत २,००० रुपयांपर्यंत घसरण.

(हिदुस्तान युनिलीव्हर संदर्भातील विचारणा दांडगे यांच्याकडून)

एल अँण्ड टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेड

* तिमाही वित्तीय निकाल – गुरुवार, २२ ऑक्टोबर

*  ९ ऑक्टोबरचा बंद भाव- ६२.९० रु.

*  निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ६० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ६० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ६५, द्वितीय लक्ष्य ७५.

ब) निराशादायक निकाल : ६० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ५५ रुपयांपर्यंत घसरण.

(एल अँण्ड टी फायनान्स संदर्भातील विचारणा – मंगेश कुळकर्णी, गिरीश जोशी, चंद्रशेखर कुळकर्णी यांच्याकडून)

ashishthakur1966 @gmail.com

लेखक भांडवली बाजार विश्लेषक