असे म्हटले जाते की ज्याला आपले आरोग्य सांभाळायचे आहे त्याने आपल्या मौखिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. ज्याला आपले ऐहिक सांभाळायचे आहे त्याला त्याचे आर्थिक गणित पक्के असणे गरजेचे असते. वित्तीय नियोजन ही आर्थिक गणित बिघडू न देण्याची पहिली पायरी असते. रोहन भागवत (३८) हे दंतवैद्य आहेत तर शर्मिला भिडे (३५) या पार्लर चालवितात. रोहन आणि शर्मिला यांच्या व्यवसायाचे ठिकाण नव्याने निर्मिती झालेल्या जिल्ह्य़ातील एका औद्योगिक वसाहतीच्या शहरात आहे. रोहन यांचा दवाखाना बाजारपेठेत पंरतु भाडय़ाच्या जागेत आहे. दवाखान्यासाठी जागा खरेदी करणे हे रोहन यांचे पहिले वित्तीय ध्येय आहे. शर्मिला यांचे पार्लर स्वत:च्या निवासी जागेत (अर्थात बिगर व्यापारी) सुरू आहे. त्यांना स्वत:ची व्यापारी जागा घेण्यात रस आहे. मुलगा निहार सीबीएसईच्या शाळेत इयत्ता सातवीत शिकत आहे. रोहन आणि शर्मिला यांनी नुकतीच एक निवासी जागा गुंतवणूक म्हणून खरेदी केली आहे. यासाठी रोहन आणि शलाका यांनी बँकेकडून २६ लाखांचे गृहकर्ज घेतले आहे. नियोजित कर्जाच्या हप्त्यापेक्षा रोहन आणि शर्मिला अधिक हप्ता भरीत असल्याने १८ लाखांचे त्यांचे कर्ज अद्याप फेडणे शिल्लक आहे. त्यांच्या कुटुंबाच्या घरखर्चाचा तपशील आणि वित्तीय ध्येयांची यादी सोबत दिली आहे.

एखाद्या व्यक्तीला चांगल्या आणि वाईट सवयी असतात त्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक वर्तनातसुद्धा चांगल्या आणि वाईट सवयी असतात. रोहन आणि शर्मिला यांचे वित्तीय वर्तनांत चांगल्या सवयींचा अभाव ठळकपणे जाणवतो. वित्तीय शिस्तीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या गोष्टींचा अभाव आणि अनावश्यक गोष्टींची खरेदी या गोष्टी ठळकपणे दिसून येतात. वित्तीय ध्येयांच्या यादीत कधीच अंतर्भूत नसलेली निवासी सदनिका रोहन आणि शर्मिला यांनी भावनेच्याभरात कोणाच्या तरी सांगण्यावरून खरेदी केली. कोणताही वित्तीय निर्णय हा भावनेच्या भरात न घेता तज्ज्ञ व्यक्तीच्या सल्लय़ाने घेणे गरजेचे असते.

अनेकांप्रमाणे रोहन आणि शर्मिला यांनी नवीन वाहन खरेदी केले. परंतु मुदतीचा विमा (टर्म इन्शुरन्स) खरेदी केलेला नाही. रोहन हे कुटुंबाचा प्रमुख आर्थिक स्रोत आहेत. तर कुटुंबाची मोठी वित्तीय ध्येये कर्ज काढून पूर्ण होणार आहेत. रोहन यांच्या बाबतीत एखादी दुर्दैवी घटना घडली तर कुटुंबाचा आर्थिक स्रोत पूर्णपणे थांबणार आहे. दुर्दैवाने असे घडले तर तजवीज म्हणून रोहन यांनी किमान १ कोटीचा २५ वर्षे मुदतीचा टर्म प्लान खरेदी करणे गरजेचे आहे.

रोहन हे दंतवैद्यक आहेत. दंतवैद्यकी करणाऱ्याला नवीन तंत्रज्ञान शिकणे गरजेचे असते. दंत निगेसाठी लागणाऱ्या कच्या मालाच्या खरेदीसाठी मोठी रक्कम मोजावी लागते. आवक मोठी असली तरी खर्च वजा जाता फारच थोडी रक्कम शिल्लक राहते हे या व्यवसायाचे वैशिष्टय़ आहे. सर्व डॉक्टरांना गरजेचा असलेला ‘प्रोफेशनल इंडेम्निटी इन्शुरन्स’ रोहन यांनी खरेदी केलेला नाही. एखाद्या व्यावसायिक चुकीमुळे संभाव्य नुकसानभरपाई द्यावी लागल्यास कायदेशीर मदतीसाठी केलेल्या खर्चाची आणि आर्थिक हानीची भरपाई देणारी ही पॉलिसी असून दंतवैद्यकांनीसुद्धा ही पॉलिसी घेणे आवश्यक आहे. शर्मिला आणि राहुल यांना गिर्यारोहणाची आवड असल्याने डोंगरदऱ्यातून हे दोघे भटकत असतात. सामान्य माणसापेक्षा यांना अपघात होण्याची शक्यता अधिक असल्याने रोहन यांनी ५० लाख, तर शर्मिला यांनी २५ लाखांचा अपघाती विमा घेणे गरजेचे आहे. रोहन आणि शर्मिला यांच्याकडे मेडिक्लेम नाही. रोहन आणि शर्मिला यांनी किमान ५ लाखांचे विमाछत्र असलेला आरोग्य विमा खरेदी करावा.

एका बाजूला मोठी वित्तीय ध्येये तर दुसऱ्या बाजूला तुटपुंजी बचत अशा कात्रीत रोहन आणि शर्मिला सापडले आहेत. साहजिकच वित्तीय ध्येयांचे पुनर्विलोकन करणे गरजेचे आहे. तुटपुंज्या बचतीत सर्वच वित्तीय ध्येये साध्य होणार नाहीत. शर्मिला यांनी व्यावसायिक जागा घेणे रहित केलेले चांगले. स्थावर मालमत्ता ही सगळ्यात चांगली गुंतवणूक असल्याचा अनेकांचा गैरसमज असतो. एनपीएस, म्युच्युअल फंड आदी आर्थिक साधनांतून गुंतवणूक करण्यास कच खाणारे कर्ज काढून मालमत्ता खरेदी करायला लगेचच तयार होतात. मालमत्ता असूनही या मालमत्तेचे रोकडीत रूपांतर न करता आल्यामुळे सध्या एका मालमत्ता विकासकाला तुरुंगाची हवा खावी लागत आहे. स्थावर मालमत्ता ही रोकडसुलभ गुंतवणूक साधन नाही हेच यावरून सिद्ध होते.

आर्थिक सल्लागाराने रोहन आणि शर्मिला यांचाशी बोलणे केल्यानंतर, आयकर वाचविण्यासाठी आणि किमतीत वृद्धी झाल्यामुळे भांडवली नफा होण्याच्या आशेने ही अनावश्यक सदनिका त्यांनी खरेदी केली असे दिसून आले. कर वाचविण्यासाठी घर घेणारे रोहन आणि शर्मिला केवळ एकटे नव्हेत. योग्य कर सल्लागाराकडून कर नियोजन करून न घेण्यामुळे आणि फुकट मिळणाऱ्या सल्लय़ामुळे असे घडते. वापरात नसलेले हे अनिवासी घर विकून टाकले तर रोहन आणि शर्मिला यांची कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी खर्च होणाऱ्या २७ हजारांची बचत होणार आहे. या वाचलेल्या रकमेतून रोहन यांच्या दवाखान्यासाठी स्वत:च्या मालकीची जागा खरेदी करून कर्जाचा हप्ता देणे शक्य होईल.

रोहन आणि शर्मिला यांचा व्यवसाय रोखीचा असल्याने बँक खात्यात मोठी रक्कम शिल्लक राहते. ही शिल्लक लिक्विड फंडात गुंतविणे ही चांगली वित्तीय सवय लावून घेणे गरजेचे आहे. निहारच्या शिक्षणासाठी २०२२ ते २०२६ दरम्यान मोठी रक्कम जमा करण्यासाठी दरमहा २२ हजारांची वार्षिक १० टक्के परतावा देणारी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. रोहन आणि शर्मिला हे किमान २५-३० वर्षे कमावते राहणार आहेत. दोघांनी किमान ३० वर्षे दरमहा प्रत्येकी ५ हजार रुपयांची नियोजनपूर्वक गुंतवणूक सेवानिवृत्तीपश्चातची तरतूद म्हणून करणे गरजेचे आहे. या गुंतवणुकीवर किमान १० टक्के परतावा मिळाला तरी ३६ लाखांच्या गुंतवणुकीचे २.२७ कोटींचा सेवा निवृत्ती कोश जमणे सहज शक्य आहे. या गुंतवणुकीत खंड पडू न देणे आवश्यक आहे.

रोहन रुग्णांच्या मौखिक आरोग्याची तर शर्मिला ग्राहकांच्या चेहऱ्याची रंगरंगोटी करतात. कुटुंबाच्या आर्थिक आरोग्याचे अंतर्गत आणि बाह्य़ असे दोन प्रकार असतात. बाह्य़ भाग जो दिसतो तो उदाहरणार्थ स्थावर मालमत्ता, वाहन, सोने नाणे इत्यादी आणि अंतर्गत आरोग्य ज्यात मुदतीचा विमा, आरोग्य विमा, मालमत्ता खरेदी करण्यासाठी घेतलेले कर्ज यांचा समावेश होतो. मुख्यत्वे बाह्य़ आरोग्यापेक्षा अंतर्गत आरोग्य जपणे महत्त्वाचे असते. कारण त्याची रंगरंगोटी करून दोष लपविता येत नाहीत.

arthmanas@expressindia.com