डॉ. मेधा शेटय़े

इच्छापत्र विरुद्ध वारसाचा हक्क या विषयावरील या सदरातील गेल्या लेखात प्रामुख्याने पुरुषांच्या संपत्तीचे विभाजन इच्छापत्र न केल्यास कसे होते ते आपण पाहिले. आता हिंदू स्त्रीच्या संपत्तीचे वाटप कसे होईल ते पाहूया.

स्त्री ही तिच्या मालमत्तेची संपूर्ण मालकीण असते. तिला तिच्या मालमत्तेचे वाटप तिच्या इच्छेप्रमाणे करता येते. परंतु तिने तसे न केल्यास हिंदू वारसा कायद्याप्रमाणे संपत्तीचे विभाजन होते.

पुरुषांसारखेच, संपत्तीचे वितरण कायद्यात नमूद असलेल्या प्राधान्य यादीप्रमाणे होते. त्यात तिचे सर्व वारसदार व आप्त-नातेवाईकांचा समावेश केला गेला आहे. पण स्त्रियांच्या बाबतीत तिची संपूर्ण मालमत्ता तिने कशी प्राप्त केली आहे ते पाहावे लागते. त्याप्रमाणे तिच्या पश्चात मालमत्तेचे विभाजन करण्यात येते. जर ती मालमत्ता तिला आई-वडिलांकडून प्राप्त झाली असेल तर प्रथम वर्गातील वारसदार नसल्यास परत तिच्या आईवडिलांकडे ती जाऊ शकते. तसेच मालमत्ता सासरहून प्राप्त झाली असेल तर प्रथम वर्गातील वारसदार नसल्यास सासरकडील वारसदारात विभागली जाते. त्याचप्रमाणे जर ती मालमत्ता तिने स्वत: कमावली असेल तर त्याचे विभाजन कायद्यात नमूद केलेल्या प्रणालीप्रमाणे होते. सर्व वारसदारांना हक्क  एकाच वेळी व सम प्रमाणातच प्राप्त होतो.

उदाहरणार्थ, श्रीमती शामला यांना मालमत्ता तिच्या आईवडिलांकडून प्राप्त झाली आहे. ती इच्छापत्र न करता मृत्यू पावते. तिच्या पाठीमागे तिचे पती रघुनाथ व दोन मुले राम व श्याम आहेत. अशा परिस्थितीत तिची मालमत्ता तिचा नवरा रघुनाथ व दोन मुले राम व श्याम यांना सम प्रमाणात विभागली जाईल. पण यापैकी कुणीही जिवंत नसल्यास ती मालमत्ता तिच्या वडिलांच्या वारसदारांमध्ये पुरुष हक्क कायद्याप्रमाणे विभागली जाते. तसेच जर ती मालमत्ता सासरकडून प्राप्त झाली असेल तर वरील नमूद केल्याप्रमाणे प्रथम वर्गातले वारसदार म्हणजेच तिचे पती रघुनाथ व दोन मुले राम व श्याम हयात नसल्यास ती रघुनाथच्या वारसदारांमध्ये पुरुष हक्क कायद्याप्रमाणे विभागली जाईल.

हे सगळे थोडे गुंतागुंतीचे आहे, पण सर्व काही टाळायचे असेल तर जरूर इच्छापत्र करून घ्यावे.

(लेखिका कायदेतज्ज्ञ आहेत.)

(या संदर्भातील आपले प्रश्न पाठविण्यासाठी ई-मेल : willassure@gmail.com)