आदित्य बिर्ला सनलाइफ फ्लेक्झी कॅप फंड

मल्टीकॅप फंड प्रकारातील गुंतवणुकीचे ‘सेबी’ने प्रमाणीकरण केल्याची तीव्र प्रतिक्रिया मालमत्ता व्यवस्थापन उद्योगात उलटली.

६ फंड गट   फ्लेक्झी कॅप

६ फंडाची सुरुवात २७ ऑगस्ट १९९८

६ फंड मालमत्ता  १४,७५१ कोटी (३० जून २०२१ रोजी)

६ मानदंड एस अ‍ॅण्ड पी बीएसई ऑलकॅप टीआरआय

फंडाचा ‘फंडा’.. : अतुल कोतकर

मल्टीकॅप फंड प्रकारातील गुंतवणुकीचे ‘सेबी’ने प्रमाणीकरण केल्याची तीव्र प्रतिक्रिया मालमत्ता व्यवस्थापन उद्योगात उलटली. या तीव्र प्रतिक्रियेची दखल घेत ‘सेबी’ने नोव्हेंबर महिन्यात ‘फ्लेक्झीकॅप फंड’ गटाची निर्मिती केली. अनेक तत्कालीन मल्टीकॅप फंडांना व्यवस्थापकांनी फ्लेक्झीकॅप फंड गटात परावर्तित केले. उपलब्ध आकडेवारीनुसार समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंड गटात फ्लेक्झी कॅप फंड गटाने अधिराज्य गाजविणाऱ्या लार्जकॅप फंड गटाला मागे टाकून सर्वात मोठय़ा मालमत्ता असलेला फंड गट समोर आला आहे. फ्लेक्झीकॅप फंड गट ३० जून रोजी १.७६ लाख कोटींचे व्यवस्थापन करतो. समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंड गटात सर्वाधिक हिस्सा फ्लेक्झीकॅप फंडांनी व्यापलेला आहे. हा फंड गट गुंतवणूकदार प्रिय झाला आहे. शिवाय अतिरिक्त भर म्हणून या फंड गटात सध्या दोन फ्लेक्झी कॅप फंडांची प्राथमिक विक्री सुरू आहे.

फ्लेक्झीकॅप फंड गटातील मालमत्ता क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेला आणि आगामी १४ ऑगस्ट रोजी २४ व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या आदित्य बिर्ला सनलाइफ फ्लेक्झी कॅप फंडाची दखल घेणे गरजेचे आहे. सुरुवातीपासून, म्हणजे जानेवारी २०१२ पासून ‘लोकसत्ताकर्ते म्युच्युअल फंड’ यादीचा भाग राहिलेला आदित्य बिर्ला सनलाइफ फ्लेक्झी कॅप फंडाला (तत्कालीन नाव आदित्य बिर्ला सनलाइफ इक्विटी फंड) कामगिरी समाधानकारक नसल्याने ऑक्टोबर २०१७ मध्ये वगळण्यात आले होते. फंडांची कामगिरी सावरण्यासाठी निधी व्यवस्थापक अनिल शहा यांनी केलेल्या उपायांना यश आलेले दिसते. जुलै २०२१ च्या त्रमासिक पुनर्रचनेनंतर या फंडांचा नव्याने समावेश करता येऊ  शकेल. दरम्यान फंडाच्या नावाबरोबर फंडाच्या गुंतवणूक धोरणात बदल झाला. बदललेल्या गुंतवणूक परिमाणांच्या जोडीला फंडाची कामगिरी सुधारली.

या फंड गटात मालमत्ता क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेला हा फंड परताव्याच्या यादीत तीन, पाच, सात आणि दहा वर्षे कालावधीनुसार अनुक्रमे सातव्या, पाचव्या, सहाव्या आणि चौथ्या स्थानावर आहे. २०१७ च्या उत्तरार्धापासून या फंडाची कामगिरी कमालीची खालावली होती. तळाच्या फंड गटात (बॉटम क्वारटाइल) तो घसरला होता. सध्या हा फंड तिसऱ्या स्थानी असलेल्या फंड गटात (मिडल क्वारटाइल) आहे. सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत आदित्य बिर्ला सनलाइफ फ्लेक्झी कॅप फंडाने जोखीम समायोजित परताव्यात फ्लेक्झीकॅप फंड गटातील मोठी मालमत्ता असलेल्या दिग्गज फंडांना लीलया मागे टाकत जोरदार मुसंडी मारली आहे.

निधी व्यवस्थापक अनिल शहा हे निर्देशांकाशी फंडाच्या गुंतवणुकीत साधम्र्य साधणारे निधी व्यवस्थापक आहेत. फंडाच्या गुंतवणुकीत ६६ समभाग असून ५३.९७ टक्के लार्जकॅप, २२.८६ टक्के मिडकॅप, ७.०५ टक्के स्मॉलकॅप आहेत. फंडाचे मल्टीकॅप फंड गटातून फ्लेक्झीकॅप फंड गटात परिवर्तन करतांना फंडाच्या गुंतवणूक परिघात परदेशातील समभागांचा समावेश करण्यात आला. परंतु सध्याच्या फंड गुंतवणुकीत परदेशातील गूगल, फेसबुकसारख्या वलयांकित कंपन्यांचा समावेश नाही.

थोर गुंतवणूक गुरू बेंजामिन ग्रॅहम हे ‘मार्जिन ऑफ सेफ्टी’बद्दल गुंतवणूकदारांना जागरूक करीत असत. मूळ मुद्दलाच्या सवलतीत उपलब्ध असलेली मालमत्ता खरेदी करण्याबाबतचा ‘मार्जिन ऑफ सेफ्टी’ सिद्धांत आहे. ज्या मालमत्ता केवळ उच्च-परताव्याची संधीच उपलब्ध करून देत नाहीत तर गुंतवणुकीतील जोखीमही कमी करतात अशा मालमत्तांचा समावेश गुंतवणुकीत करायला हवा. सोप्या शब्दांत, ५० सेंट नफ्यासाठी १ डॉलर किमतीची मालमत्ता खरेदी करणे हे ग्रॅहम यांचे लक्ष्य असे. हे समजून घ्यायचे असेल तर या फंडाच्या गुंतवणुकीचा सखोल अभ्यास करायला हवा. केवळ आदित्य बिर्ला सनलाइफ फ्लेक्झी कॅप फंडच नव्हे तर आदित्य बिर्ला सनलाइफ मिडकॅप, आदित्य बिर्ला सनलाइफ मॅन्युफॅक्चरिंग आणि आदित्य बिर्ला सनलाइफ स्पेशल सिच्युएशन फंड तसेच पूर्वी व्यवस्थापित केलेला आदित्य बिर्ला सनलाइफ जेनेक्स्ट या सर्व फंडांच्या गुंतवणुकीत ‘मार्जिन ऑफ सेफ्टी’ला महत्त्व दिलेले दिसून येते.

गेल्या सहा तिमाहीतील आदित्य बिर्ला सनलाइफ फ्लेक्झी कॅप फंडाच्या कामगिरीचा अभ्यास केल्यास फंड गटातील मोठी मालमत्ता असलेल्या आणि समाधानकारक कामगिरी असलेल्या दुर्मीळ फंडात या फंडांचा समावेश होतो. व्यापार चक्राच्या वेगवेगळ्या टप्प्यात फंडाने जोखीम संतुलन उत्तम साधले असल्याचे संकेत शार्प रेशो देत आहे. हा फंड २०१७ वगळता वर्षांनुवर्षे अव्वल दोन फंड गटात (टॉप आणि अप्पर मिडल क्वारटाइल) राहिला आहे. निधी व्यवस्थापकांनी सरासरीपेक्षा अधिक गुंतवणुकीत रोकड राखल्याने २०१७ मध्ये या फंडाच्या कामगिरीत घसरण झाली. २०१९च्या चौथ्या (ऑक्टोबर-डिसेंबर) तिमाहीपासून फंडाच्या कामगिरीने उसळी घेतली. तीन आणि पाच वर्षांतील या फंडांची कामगिरी फंड गटातील एचडीएफसी इक्विटी, कोटक फ्लेक्झीकॅप फंडांच्या तुलनेत फारच उजवी आहे. या फंडांची कामगिरी असे सूचित करते की, सकारात्मक कालावधीत (तेजी) या फंडाने निर्देशांकापेक्षा अधिक चमकदार कामगिरी केली असून घसरणीच्या कालावधीत निर्देशांकापेक्षा कमी मुद्दल गमावले आहे. परिणामी हा फंड सद्य परिस्थितीत आदर्श फंड शिफारसयोग्य फंड ठरतो.

atulkotkar@yahoo.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aditya birla sun life flexi cap fund ssh

Next Story
‘अर्थ’पूर्ण : जेवढय़ा लवकर सुरू कराल तेवढे चांगले!