इक्विटास होल्डिंग या कंपनीची प्रारंभिक खुली भागविक्री-आयपीओ साधारण वर्षभरापूर्वी आला होता. १०० रुपये अधिमूल्याने भागभांडवलाची उभारणी करणाऱ्या इक्विटासला गुंतवणूकदारांचा चागला प्रतिसाद मिळाला होता. तसेच कंपनीच्या शेअरची शेअर बाजारात नोंदणीदेखील पहिल्याच दिवशी २५ टक्के अधिमूल्याने झाल्याने गुंतवणूकदारांचा चांगलाच फायदा झाला. अर्थात, ज्या गुंतवणूकदारांनी हे शेअर्स ठेवून दिले त्यांचा फायदा अधिक झाला. असो.
इक्विटास होल्डिंग ही रिझव्र्ह बँकेकडे नोंदणी झालेली बिगर बँकिंग वित्तीय कंपनी असून ती तिच्या उपकंपनीमार्फत आपले विविध व्यवसाय करते. यात प्रामुख्याने मायक्रो फायनान्स (सूक्ष्म वित्त), लघु वित्त बँक, मध्यम व लघुउद्योगांना वित्तसाहाय्य, वाहन कर्ज तसेच गृह वित्त यांचा समावेश होतो. गेल्या जुलै महिन्यात कंपनीच्या एका मुख्य उपकंपनीला (इक्विटास स्मॉल फायनान्स बँक) रिझव्र्ह बँकेकडून लघु वित्त बँक चालवण्याचा परवाना मिळाला आहे. आगामी वर्षांत भारतातील १३ राज्यांतून ४१२ शाखा उघडण्याचा कंपनीचा मानस आहे. या बँकेतर्फे मध्यम तसेच लघुउद्योगांना वित्तीय पुरवठा तसेच वैयक्तिक छोटी कर्जे देण्यात येतील. बँकेच्या २५ टक्के शाखा ग्रामीण भागात असतील. कंपनीच्या एकूण उलाढालीपैकी ५० टक्के उलाढाल सूक्ष्म वित्त, २६ टक्के उलाढाल वाणिज्य वाहने, तर उर्वरित उलाढाल परवडणाऱ्या घरांसाठी कर्ज वितरणात होते. येत्या सात वर्षांत देशांतर्गत कर्ज उलाढालीपैकी किमान ५ टक्के वाटा इक्विटास होल्डिंगचा असावा, असा व्यवस्थापनाचा मानस आहे. सध्या हा शेअर १८० रुपयांच्या आसपास असून तो थोडासा महाग वाटू शकेल. परंतु ज्या गुंतवणूकदारांची थांबायची तयारी असेल आणि ज्यांचा दीर्घकालीन गुंतवणुकीवर विश्वास आहे, त्यांच्यासाठी हा शेअर योग्य वाटतो.
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक —
परदेशी गुंतवणूकदार ३५.०७
बँक/ म्युच्युअल फंड ४३.८४
इतर २१.०९
सूचना : प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.