हल्दिन ग्लास म्हणजे पूर्वाश्रमीची हल्दिन ग्लास गुजरात लिमिटेड. १९९१ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी काचेच्या उत्पादनात असून मुख्यत्वे विविध प्रकारच्या काचेच्या बाटल्या तसेच काचेचे पॅकेजिंग मटेरिअल बनवते. खाद्य पदार्थ, शीतपेये, औषधे तसेच वाइन, बीअर आणि इतर मद्याच्या बाटल्यांचे उत्पादन गुजरातमधील बडोदे येथील कारखान्यातून होते. गुजरातमधून उत्पादन होत असल्याने राजस्थान आणि गुजरातमधील खाणी तसेच ओएनजीसीचे गॅस फिल्ड यांचा फायदा कंपनीला कच्च्या मालासाठी होतो. अनुभवी प्रवर्तक, कुशल कामगार तसेच अत्याधुनिक मशीन्स या तिघांचा उत्तम मेळ बसल्याने हल्दिन ग्लास आज काचेच्या पॅकेजिंगमधील एक अग्रगण्य कंपनी मानली जाते. कंपनीच्या ग्राहकांच्या मांदियाळीत अमूल, ग्लॅक्सो, बजाज कॉर्प, सिप्ला, नोव्हार्टिस, वाईथ, हिंदुस्तान अँटिबायोटिक्स, पार्ले, हमदर्द, यू बी समूह, कॅम्लिन, वाडीलाल, कॅडिला, फायझर, शॅम्पेन इ. कंपन्यांचा समवेश होतो. तसेच परदेशांतील प्रमुख ग्राहकांमध्ये दुबई येथील डाबर, अल माया, वेकफिल्ड, बैरूतमधील सागा कन्सेप्ट, येमेनमधील मोहम्मद अली आणि नायजेरियातील बेन्टोस फार्माचा समावेश होतो. वाढत्या मागणीमुळे आपली उत्पादन क्षमता वाढवतानाच कंपनीने आधुनिकीकरणावर भर दिला आहे. तसेच डेकोरेटेड जार या सारखे नवीन उत्पादनदेखील सुरू केले आहे. मार्च २०१७ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता कंपनीने १७१.८६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १२.४१ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो ७१ टक्क्यांनी अधिक आहे. फार्मा कंपन्यांना काही उत्पादनाच्या बाबतीत काच पॅकेजिंग बंधनकारक केल्याचा फायदा हल्दिन ग्लाससारख्या कंपन्यांना होईल. येत्या आर्थिक वर्षांत कंपनीकडून अशीच कामगिरी अपेक्षित असून येत्या दोन वर्षांत कंपनीची उलाढाल तसेच नफ्यात भरीव वाढ होऊ शकेल. सध्या ४० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा मायक्रो कॅप शेअर तुमच्या पोर्टफोलियोसाठी एक चांगली दीर्घकालीन गुंतवणूक ठरू शकेल.
सूचना : प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.