फोर्स मोटर्स म्हणजे पूर्वाश्रमीची बजाज टेम्पो. १९५८पासून वाणिज्य वाहनांचे उत्पादन करणारी ही कंपनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतातील एक आघाडीची वाहन उत्पादन करणारी कंपनी मानली जाते. सुरुवातीला केवळ तीनचाकी वाहनांचे उत्पादन करणारी ही कंपनी आता ट्रॅक्टर, टेम्पो, हलकी वाणिज्य वाहने (एलसीव्ही) तसेच मोठय़ा वाणिज्य वाहनांचे (एचसीव्ही) उत्पादन करते. कंपनीचे वाहन उत्पादनांचे तीन कारखाने असून त्यातील दोन महाराष्ट्रात तर एक मध्य प्रदेशात पिथमपूर येथे आहे. सुरुवातीला म्हणजे १९५८ मध्ये आपल्या गोरेगाव येथील कारखान्यातून हंसीत या तीनचाकीचे उत्पादन करणाऱ्या बजाज टेम्पोने नंतर मॅटाडोर तसेच जर्मनीच्या मर्सिडीज बेन्झच्या सहकार्याने ‘ट्रॅव्हलर’ या प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या वाहनाचे उत्पादन सुरू केले. सध्या कंपनीकडे ट्रॅव्हलर, ट्रॅक्स, ट्रम्प ४०, स्कूल बस, बलवान आणि ऑर्चड या वाणिज्य वाहनांच्या श्रेणीखेरीज फोर्स १ आणि फोर्स गुरखा ही पर्सनल वाहन श्रेणीही आहे. वाहन उत्पादनाखेरीज फोर्स मोटर्स मर्सिडीज बेन्झच्या इंजिन असेम्ब्ली आणि तपासणीचेही काम करते. गेल्या २० वर्षांत कंपनीने ५०,०००पेक्षा जास्त इंजिन पुरवली आहेत. गुणवत्तेबद्दल कंपनीला आतापर्यंत दोनदा मर्सिडीज क्वालिटी परितोषकाने गौरवण्यात आले आहे. गेल्या वर्षीपासून कंपनीला बीएमडब्ल्यूचेदेखील कंत्राट मिळाले आहे. यासाठी चेन्नई येथे अद्ययावत कारखान्यातून इंजिन टेस्टिंग होते. दोन मोठय़ा युरोपियन कंपन्यांकडून अशा प्रकारची कंत्राटे मिळणारी फोर्स ही जगातील एकमेव कंपनी आहे. केवळ १३.१८ कोटी रुपये भागभांडवल असलेल्या या कंपनीची गेल्या आर्थिक वर्षांची कामगिरी उत्तम आहे. मार्च २०१६ रोजी समाप्त आर्थिक वर्षांसाठी कंपनीने ३,०३३.२६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १७९.४२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. पोर्टफोलियोसाठी एक आकर्षक आणि फायद्याची गुंतवणूक म्हणून फोर्स मोटरची निवड करावी.
ता. क. ‘माझा पोर्टफोलियो’चा उद्देश मराठी माणूस शेअर बाजाराकडे वळावा तसेच त्याने स्वत: अभ्यास करून आपले शेअर्स निवडून गुंतवणूक करावी असा आहे. काही सजग वाचक आणि गुंतवणूकदार या स्तंभातून सुचवलेल्या शेअर्सचा बारकाईने अभ्यास करून आपला अभिप्राय कळवतात. अशाच एका गुंतवणूकदार वाचकाने मागच्या आठवडय़ात (अर्थवृत्तान्त, १८ जुलै) सुचवलेल्या आयनॉक्स विण्डबद्दल आपली प्रतिकूल प्रतिक्रिया काही माहितीसह कळवली आहे. मलाही त्यात तथ्य आढळल्याने या शेअरची शिफारस मागे घेत आहे.
सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) लेखात सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
Mutual fund investments are subject to market risk. Please read the offer documents carefully before investing.
अजय वाळिंबे – stocksandwealth @gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 25th Jul 2016 रोजी प्रकाशित
माझा पोर्टफोलियो : ‘बलवान’ पोर्टफोलियोसाठी
वाहन उत्पादनाखेरीज फोर्स मोटर्स मर्सिडीज बेन्झच्या इंजिन असेम्ब्ली आणि तपासणीचेही काम करते.
Written by अजय वाळिंबे

First published on: 25-07-2016 at 01:05 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Force motors portfolio