गुंतवणुकीचा सर्वात महत्त्वाचा नियम – Know what you own, and know why you own it – Peter Lynch (‘तुमच्याकडे काय आहे आणि ते तुमच्याकडे कशासाठी आहे’- पीटर लिंच). आर्थिक नियोजनात सुरुवातीला ध्येय निश्चित केल्यानंतर आणि आपली जोखीम घेण्याची क्षमता किती आहे (रिस्क प्रोफायलिंग) हे पडताळून पाहिल्यानंतरच अर्थनियोजक तुमच्यासाठी योग्य गुंतवणुकीचा आराखडा तयार करू शकतो. यामुळे केली जाणारी गुंतवणूक ही तुमच्या जोखीम क्षमतेप्रमाणे तुमच्यासाठी योग्य असणाऱ्या गुंतवणुकीच्या विविध पर्यायांमध्ये (अॅसेट अलोकेशन) विभागून केली जाईल व तुमच्या प्रत्येक ध्येयपूर्तीच्या वेळी योग्य ती रक्कम तुम्हाला उपलब्ध होऊ शकेल.
गुंतवणूक कशा प्रकारे केली गेली पाहिजे:
फेब्रुवारी २०१६ च्या लेखात सांगितल्याप्रमाणे ध्येयांच्या कालावधीची वर्गवारी करून त्याप्रमाणे योग्य गुंतवणूक पर्याय निवडावे.
१. अल्पावधी (शॉर्ट टर्म गोल्स) १ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी
२. नजीकचा कालावधी (इंटरमीडिएट गोल्स) २ ते ५ वर्षे
३. दीर्घावधी (लाँग टर्म गोल्स) ५ वर्षांपेक्षा जास्त
अशा प्रकारच्या गुंतवणुकीसाठी योग्य ते गुंतवणूक पर्याय कुठले असावे व ते निवडताना आपण काय खबरदारी घेतली पाहिजे ते आपण पाहू.
अल्पावधी उद्दिष्ट : (१ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी)
मार्च २०१६ च्या लेखात वित्तप्रवाह विश्लेषण करताना आपण वार्षिक येणाऱ्या काही खर्चाचा आढावा घेतला जसे की मुलांच्या शाळेची फी, सणासुदीच्या दिवसांत होणारे खर्च, विमा हप्ते वगैरे. जर यांसारख्या खर्चाची अंदाजे वार्षिक रक्कम किती होते, ती रक्कम १२ महिन्यांमध्ये सारखी विभागली तर मासिक रक्कम किती होईल हे गणित आपण मांडून ही रक्कम प्रत्येक महिन्याला बाजूला ठेवण्यासाठी आपण रिकरिंग डिपॉझिट किंवा म्युच्युअल फंडाच्या लिक्विड फंड यांसारखे गुंतवणूक पर्याय निवडू शकतो. अशा प्रकारे केल्या गेलेल्या गुंतवणुकीमुळे बचत तर होतेच, शिवाय रिकरिंग डिपॉझिट किंवा लिक्विड फंड गुंतवणुकीत मिळालेल्या व्याजामुळे रकमेत वृद्धीही होते. शिवाय अशा वेळी इतर आर्थिक उद्दिष्टांसाठी केलेल्या गुंतवणुकीलाही हात न लावल्यामुळे भविष्यातील ध्येयांसाठी केलेली बचत अबाधित राहते. म्युच्युअल फंडाच्या लिक्विड फंडांकडे बँकेतील बचत खात्याला पर्याय म्हणूनही बघता येऊ शकेल. त्याचे कारण म्हणजे:
अ. तरलता (लिक्विडिटी): ज्या दिवशी आपणास लिक्विड फंडामध्ये केलेल्या गुंतवणुकीतील पैशाची गरज पडेल त्याच्या आदल्या दिवशी आपण काढून घेण्यासाठी विनंती अर्ज (म्युच्युअल फंडामध्ये याला रीडम्पशन रिक्वेस्ट असे म्हणतात.) दुपारी ३ वाजण्याच्या आत दिल्यास, दुसऱ्या दिवशी आपल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात.
आ. लिक्विड फंडामध्ये केलेल्या गुंतवणुकीचा मोबदला हा बँकेच्या बचत खात्यामधून मिळणाऱ्या व्याजापेक्षा नक्कीच जास्त असतो.
इ. काही दिवसांसाठी एफडी करण्यासाठीसुद्धा हा पर्याय सुलभ आहे.
नजीकचा कालावधी उद्दिष्ट : (२ ते ५ वर्षे)
ज्या ध्येयांच्या पूर्ततेसाठी २ ते ५ वर्षांचा कालावधी आहे त्यासाठी कोणते गुंतवणूक पर्याय असू शकतील हे येथे आपण पाहू. या पर्यायांना दोन प्रकारांत विभागून त्याचे विश्लेषण करणे योग्य ठरेल.
अ. २ ते ३ वर्षांपर्यंतचे ध्येय
आ. ३ वर्षे ते ५ वर्षांपर्यंतचे ध्येय
ही विभागणी करण्याचे कारण या कालावधीतील ध्येयांसाठी आपण डेट आणि इक्विटी या दोन्ही पर्यायांचे संयोजन करून गुंतवणूक पर्याय निवडू शकतो. प्रत्येकाच्या जोखीम क्षमतेप्रमाणे याची विभागणी वेगवेगळी होऊ शकते. जसे की कमी जोखीम क्षमता असणाऱ्यांसाठी डेट गुंतवणूक अधिक प्रमाणात, तर जोखीम क्षमता अधिक असणाऱ्यांसाठी इक्विटी गुंतवणूक थोडी अधिक प्रमाणात आपण करू शकतो.
अ. २ ते ३ वर्षांपर्यंतचे ध्येय: यासाठी गुंतवणूक पर्याय असू शकतील ते म्हणजे बँक एफडी, म्युच्युअल फंडांमधील डेट फंड किंवा कंपनी एफडी ज्यात व्याज दर साधारणपणे माहीत असतो. त्यामुळे आपल्याला या कालावधीतील ध्येयपूर्तीसाठी लागणारी रक्कम निश्चित स्वरूपात योग्य वेळी उपलब्ध होऊ शकेल.
आ. ३ ते ५ वर्षांपर्यंतचे ध्येय : या कालावधीसाठी करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीत आपण डेटबरोबरच इक्विटीचाही विचार करू शकतो, परंतु तुमची जोखीम क्षमता सरासरीपेक्षा जास्त असेल तरच. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे इक्विटीमध्ये जोखीम ही थोडी अधिक प्रमाणात असते. जोखीम क्षमता अधिक असेल तरीही या कालावधीसाठी आपण डेट आणि इक्विटी या दोन्ही पर्यायांचे संयोजन करूनच गुंतवणूक करणे योग्य ठरेल. जसे की, मोठय़ा कालावधीच्या बँक एफडी, म्युच्युअल फंडांमधील बॅलन्स्ड फंड अशा प्रकारचे पर्याय या कालावधीसाठी योग्य ठरतील. त्यामुळे या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या मोबदल्यात थोडी अधिक वाढ आपण मिळवू शकू .
दीर्घावधी उद्दिष्ट : (५ वर्षांपेक्षा जास्त)
पाच वर्षांपेक्षा जास्त म्हणजे मोठा कालावधी असल्यामुळे ही गुंतवणूक करण्यास बरेच पर्याय असल्यामुळे योग्य तो पर्याय निवडण्यासाठी बराच वाव मिळतो. शिवाय इतर गुंतवणूकपर्यायांपेक्षा येथे गुंतवणुकीतून मिळणारा मोबदलाही अधिक असू शकतो. कमी जोखीम क्षमता असणाऱ्यांसाठीसुद्धा अॅग्रेसिव्ह बॅलन्स्ड फंडामध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. जोखीम क्षमता मध्यम किवा अधिक असणाऱ्यांसाठी इक्विटी म्युच्युअल फंड किंवा शेअर्स यामध्येही गुंतवणूक करता येऊ शकेल. ही गुंतवणूक कशा प्रकारे केली जावी ते आपण पाहू.
अ. इक्विटी म्युच्युअल फंड : दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडांतून उपलब्ध पर्यायांमध्ये ती दोन प्रकारे करता येते. एकरकमी किंवा नियमित मासिक गुंतवणूक पद्धतीने ती केली जाते. म्युच्युअल फंडामध्ये त्याला एसआयपी (Systematic Investment Plan) असे म्हणतात. यात एक ठरावीक रक्कम दिलेल्या तारखेला तुमच्या बँक खात्यामधून तुम्ही गुंतवणूक करीत असलेल्या म्युच्युअल फंडामध्ये जमा होते. मासिक गुंतवणूक हा गुंतवणुकीचा सर्वात उत्तम पर्याय आहे. त्याचे बरेच फायदे आहेत.
१. चक्रवाढ व्याज व वृद्धीचा फायदा
२. शेअर बाजाराचा निर्देशांक बघून गुंतवणूक करण्याची गरज भासत नाही
३. दर महिन्याला थोडी थोडी गुंतवणूक होत असल्यामुळे बाजाराच्या चढत्या आणि उतरत्या वेळीदेखील गुंतवणूक होत राहते.
४. ध्येयपूर्तीसाठी कालावधी मोठा असल्यामुळे गुंतवणूक वाढीस वाव मिळतो.
५. एकच मोठी रक्कम गुंतवणुकीसाठी असण्याची गरज नाही
६. पगारदार गुंतवणूकदारांसाठी उत्तम गुंतवणूक पर्याय
७. प्रत्येक जण आपापल्या क्षमतेप्रमाणे गुंतवणूक करू शकतो
८. शिस्तबद्ध गुंतवणुकीची सवय लागते
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ध्येयपूर्तीसाठी आवश्यक असणाऱ्या पैशांच्या गरजेप्रमाणे योग्य अॅसेट अलोकेशन केले गेले पाहिजे. वरील दिलेल्या गुंतवणूक पर्यायांव्यतिरिक्त सोने, स्थावर मालमत्ता असे इतरही पर्याय उपलब्ध आहेतच, परंतु तुमच्या पोर्टफोलिओमध्ये त्यांची गुंतवणूक ही तुमच्या ध्येयांशी संलग्न व योग्य तेवढीच असली पाहिजे. (सावधानतेचा इशारा : विमा हा गुंतवणूक पर्याय नाही. जून २०१६ मधील लेखात सांगितल्याप्रमाणे विम्याकडे जीवन व आर्थिक संरक्षण याच दृष्टीने बघितले गेले पाहिजे.)
In investing, what is comfortable is rarely profitable – Robert Arnott. अर्थात प्रत्येकाने आपल्या सोयीने गुंतवणूक करणे हे भविष्यात अयोग्य व धोकादायक ठरू शकते. यासाठी योग्य अर्थनियोजकाचा सल्ला घेऊनच सुयोग्य गुंतवणुकीचा आराखडा तयार करून गुंतवणूक करणे योग्य ठरेल.
‘एसआयपी’ गुंतवणूक पद्धतीचे फायदे..‘एसआयपी’ धाटणीची मासिक आणि नियमित गुंतवणूक पद्धत हा गुंतवणुकीचा सर्वात उत्तम पर्याय आहे.
१. चक्रवाढ व्याज व वृद्धीचा फायदा
२. शेअर बाजाराचा निर्देशांक बघून गुंतवणूक करण्याची गरज भासत नाही
३. दरमहा थोडी थोडी गुंतवणूक होत असल्यामुळे बाजाराच्या चढत्या आणि उतरत्या वेळीदेखील गुंतवणूक होत राहते.
४. ध्येयपूर्तीसाठी कालावधी मोठा असल्यामुळे गुंतवणूक वाढीस वाव मिळतो.
५. एकच मोठी रक्कम गुंतवणुकीसाठी असण्याची गरज नाही
६. पगारदार गुंतवणूकदारांसाठी उत्तम गुंतवणूक पर्याय
७. प्रत्येक जण आपापल्या क्षमतेप्रमाणे गुंतवणूक करू शकतो
८. शिस्तबद्ध गुंतवणुकीची सवय लागते
शेअर्समधील गुंतवणूक :
शेअर्समधील गुंतवणूक ही तज्ज्ञाच्या सल्ल्यानेच करण्यात यावी. ही गुंतवणूक करून आपण कंपनीतील भांडवलाचे भागीदार बनतो. त्यामुळे त्या कंपनीच्या उत्पादनाचा खप, कंपनीची फायदा कमावण्याची क्षमता, कंपनीच्या मागील काही वर्षांची कामगिरी, कंपनी सांभाळणाऱ्यांची दूरदृष्टी इत्यादी बऱ्याच गोष्टी पडताळून पाहून मगच गुंतवणूक करणे योग्य ठरते. ही गुंतवणूक दीर्घ काळासाठीच असावी. शेअर ट्रेडिंग ही गुंतवणूक नाही, हेही लक्षात ठेवावे.
किरण हाके kiranhake@fingenie.co.in
लेखक हे ‘सीएफपी’ पात्रताधारक अर्थ नियोजनकार आणि ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.