‘माझा पोर्टफोलियो’ कोविड घात-रोधी!

जानेवारी ते डिसेंबर २०२० वार्षिक आढावा

|| अजय वाळिंबे

या वर्षांने जगातल्या प्रत्येकाला काहीतरी शिकवले. या अनिश्चित काळात संयम, बचत, गुंतवणूक आणि पैशाचे महत्त्व, छंदांचे महत्त्व, डिजिटल शिक्षण, कुटुंब वात्सल्य, सहकार आणि अर्थात आरोग्य या सगळ्याचे महत्त्व कळले. याच काळात फोमो (फिअर ऑफ मिसिंग आऊट), फोबी (फिअर ऑफ बीइंग इन्व्हेस्टेड), रॉबिनहूड इन्व्हेस्टर, टिना (देअर इज नो अल्टरनेटिव्ह), व्ही शेप, यू शेप आणि डब्ल्यू शेप रिकव्हरी इत्यादी संज्ञांचा देखील नव्याने परिचय झाला. मधल्या काळात वर्तमानपत्रं केवळ डिजिटल माध्यमातच उपलब्ध होती. मात्र त्या काळातही पोर्टफोलियोच्या ज्या वाचक गुंतवणूकदारांनी शिफारसीप्रमाणे गुंतवणूक केली त्यांचा नक्कीच फायदा झाला असणार.

सरत्या वर्षांत दोन्ही शेअर बाजार निर्देशांकांनी नवीन उच्चांक प्रस्थापित केले आहेत आणि गुंतवणूकदारांना सरासरी १५ टक्के परतावा दिला आहे. (‘सेन्सेक्स’ने १ जाने. ते ३१ डिसें. २०२० दरम्यान १५.६% तर निफ्टीने १४.६% परतावा दिला आहे.)

आपल्या पोर्टफोलियोचा वार्षिक आढावा बघितला तर ४१,७८० रुपयांची गुंतवणूक ११,७६२ रुपयांच्या (२८.७%) नक्त नफ्यासह ५३,५४२ रुपयांवर वर गेली आहे. याच कालावधीत आपल्या पोर्टफोलियोचा आयआरआर तब्बल ५५.६६% आहे. सीडीएसएल, अ‍ॅडव्हान्स्ड एन्झाइम, अपोलो पाइप, थायरोकेअर टेक्नॉलॉजी आणि अ‍ॅफल इंडिया या पाच कंपन्यांच्या शेअर्सने पोर्टफोलियोच्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत दुपटीहून अधिक परतावा दिला आहे. तर सात कंपन्यांनी ५५% हून अधिक परतावा दिला आहे. पोर्टफोलियोतील केवळ प्रिव्ही स्पेशालिटी, जेके लक्ष्मी आणि भारत पेरेंटल्स या तीनच कंपन्यांची गुंतवणूक अल्प नुकसानीत आहेत.

करोना लशीवर अनेक बातम्या यात असल्या तरीही परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नाही. किंबहुना जर्मनी, इंग्लंडसारख्या काही युरोपियन देशांत पुन्हा टाळेबंदीसदृश र्निबधांची भीती व्यक्त होताना दिसते आहे. त्यामुळेच सोमवारी २० डिसेंबर रोजी शेअर बाजार गडगडला. मात्र माहिती तंत्रज्ञान, अमेरिकेतील स्टिम्युलस पॅकेज आणि ब्रेग्झिटवरील तोडगा याचा एकत्रित सकारात्मक परिणाम होऊन बाजार सावरला आणि सेन्सेक्सची घोडदौड पुन्हा सुरू झाली. २०२० मध्ये आयपीओंना देखील मोठा प्रतिसाद मिळाला. या करोना वर्षांत नवीन कंपन्यांच्या खात्यात १.६६ लाख कोटी रुपये आयपीओद्वारे जमा झाले आहेत. रूट मोबाइल, हॅप्पीएस्ट माइंड, कॅम्स, रोझारी बायोटेक, केमेक्स केमिकल्स, माझगाव डॉक, ग्लॅंड फार्मा, बर्गर किंग आणि नुकताच लिस्ट झालेला मिसेस बेक्टर्स फूड्स या सगळ्याच आयपीओना गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आणि सूचिबद्धतेलाच रग्गड लाभाने (लिस्टिंग गेन) गुंतवणूकदारांचा दणदणीत फायदाही झाला. टाळेबंदी कालावधीतही लिक्विडिटीमुळे आणि परदेशी संस्थांच्या सततच्या खरेदीमुळे शेअर बाजारात अनेक दिवस उत्साहाचेच वातावरण राहिले आहे. दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले आहेत. या खेरीज वाढलेले जीएसटी संकलन, वाहन विक्री आणि उत्पादन क्षेत्रात झालेली दमदार वाढ यामुळे भारतीय अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे असे संकेत मिळत आहेत.

खरं तर इतर देशांच्या तुलनेत भारताची आर्थिक घडी पूर्ववत व्हायला अजून किमान दोन वर्षे जावी लागतील असा अंदाज आहे. करोना आणि जागतिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर आपले मानांकन घसरले आहेच, परंतु त्याच बरोबर बेरोजगारी, अनुत्पादित कर्जे आणि आजारी बँका, वाढत्या वित्तीय तुटीचे आव्हान तसेच घसरत्या रुपयामुळे भारताची आर्थिक घडी बसायला बराच काळ जावा लागणार आहे. यंदा आपल्या आर्थिक प्रगतीचा दर उणे असणार आहे. पहिल्या तिमाहीत आपला आर्थिक प्रगतीचा दर -२३.९ टक्क्य़ांवर घसरल्याने आर्थिक मंदीच्या दिशेने वाटचाल चालू असल्याचे संकेत मिळत आहेत. अर्थात इतके निराशाजनक चित्र असूनही परकीय गुंतवणुकीचा ओघ, जीएसटी संकलनात झालेली वाढ आणि अमेरिकेतील अपेक्षित अर्थप्रोत्साहक ९०० अब्ज डॉलरचा बूस्टर डोस (क्यूई) यामुळे बाजार निर्देशांकांत भरीव वाढ झाली आहे.

पोर्टफोलियोमध्ये आत्तापर्यंत सुचवलेले बहुतांशी शेअर्स राखून ठेवण्यासारखे किंवा अजूनही खरेदी करण्यासारखेच आहेत. मात्र शिफारस केल्याप्रमाणे काही शेअर्सची विक्री करून लाभ पदरात पडून घेता येईल. तसेच डिसेंबर २०२० अखेर तिमाही आणि नऊमाहीचे निकाल लवकरच जाहीर होतील त्याचा प्रभाव लक्षात ठेवणे आवश्यक आहे. मात्र आतापर्यंत सुचविल्याप्रमाणे कुठल्याही शेअर्सची खरेदी/ विक्री टप्प्याटप्प्यानेच करा. आगामी कलावधीत देखील, शेअर बाजाराचे हेलकावे पाहता अल्पवधीत २० ते २५ टक्के परतावा मिळत असल्यास फायदा पदरात पडून घेऊन तेच शेअर्स पुन्हा खालच्या भावात खरेदी करण्याचे धोरण अनुभवी आणि जाणकार गुंतवणूकदारांना फायद्याचे ठरू शकते.
२०२१ हे वर्ष देखील तेजीचे असणार असे वाटत असले तरीही आभासी परिस्थितीपेक्षा प्रत्यक्ष परिस्थितीचे भान ठेवून गुंतवणूक करणे अपेक्षित आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: January to december 2020 annual review mppg

ताज्या बातम्या