भाग दुसरा
निवृत्ती नियोजन करताना सामान्यपणे होणाऱ्या काही चुका टाळता येण्यासारख्या असतात. जेणेकरून आपण योग्य वयात कामापासून निश्चिंतपणे निवृत्त होऊ शकतो.
तरुण आणि मध्यमवयीन वर्गाकडे त्यांच्या निवृत्ती नियोजनासाठी पुरेसा वेळ असतो. ही त्याची जमेची बाजू ठरते. निवृत्ती नियोजन करताना सामान्यपणे होणाऱ्या काही चुका टाळता येण्यासारख्या असतात. जेणेकरून आपण योग्य वयात कामापासून निश्चिंतपणे निवृत्त होऊ शकतो.
सर्वप्रथम आपण हे लक्षात घ्यायला हवे की निवृत्तीनंतर आपल्याला दरमहा किती रक्कम खर्चासाठी आवश्यक असेल. निवृत्तीनंतर काही खर्च कमी झालेले असतील जसे की मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते इत्यादी. परंतु काही खर्च कदाचित वाढतील जसे की, वैद्यकीय खर्च, प्रवास खर्च वगैरे. साधारणपणे या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला निवृत्तीनंतर येणाऱ्या मासिक खर्चाचा अंदाज बांधावा लागेल. म्हणजे समजा तुम्ही आज निवृत्त झालेले आहात, अशा वेळी तुम्हाला मासिक किती रक्कम खर्चासाठी लागेल त्याच अनुषंगाने तुमचा आर्थिक नियोजक भाववाढीचा दर लक्षात घेऊन, तसेच निवृत्तीसाठी तुम्हाला अजून किती कालावधी आहे याचे समीकरण मांडून तुम्हाला हे सांगू शकेन की निवृत्तीनंतर किमान आजच्या राहणीमानाप्रमाणे तुम्हाला किती रकमेची आवश्यकता असेल. जर तुमच्या निवृत्तीसाठी बराच काळ असेल तर ही रक्कम आता पाहताना तुम्हाला कदाचित फार मोठी वाटेल. परंतु हे एकदा समजले तर आपण ठरवू शकतो की निवृत्तीनंतर लागणाऱ्या रकमेचे ध्येय गाठण्यासाठी आजपासून आपल्याला किती रक्कम बाजूला ठेवायला हवी.
तरुण वर्ग निवृत्ती नियोजन करण्याचा विचारच करताना दिसत नाही. त्याचे मूळ कारण म्हणजे त्यांचा असा समज असतो की माझ्या निवृत्तीसाठी अजून बराच वेळ आहे. एवढय़ा लवकर काय गरज आहे? परंतु चक्रवाढ व्याजाच्या नियमानुसार जेवढय़ा लवकर आपण निवृत्ती नियोजनासाठी गुंतवणुकीला सुरुवात करू, तेवढी कमी रक्कम आजपासून तुम्हाला बाजूला ठेवावी लागेल. आल्बर्ट आइन्सस्टाइन म्हणून गेले आहेत की – Compound Interest is the eighth wonder of the world. He who understands it, earns it. he who doesnlt. pays it.- Albert Einstein. (चक्रवाढ व्याज हे जगातील आठवे आश्चर्य आहे.. हे ज्याला समजले तो कमावतो..ज्याला नाही कळले तो गमावतो.)
याशिवाय भाववाढीच्या दराचाही येथे विचार केला गेला पाहिजे. साधा विचार करून बघा, आपल्या लहानपणी दिवसाचा बसचा प्रवास खर्च किती असायचा, आज त्याच ठरावीक अंतरासाठी किती खर्च येतो. दुसरे उदाहरण म्हणजे आपल्या आई-वडिलांच्या तरुणपणी असणारा वैद्यकीय खर्चाचा दर आणि आज होणारा वैद्याकीय खर्चाचा दर किती पटीने वाढला आहे, हे पडताळून पाहा. यावरून आपण अंदाज बांधू शकतो की याच प्रमाणात भाववाढीचा दर आपल्या निवृत्तीपर्यंत राहिला तर. यातून खर्च किती वाढेल याचा अंदाजही आपण बांधू शकत नाही. त्यामुळे निवृत्तीसाठी फार कमी वेळ शिल्लक असेल तरीही लवकरात लवकर निवृत्ती नियोजनसाठी पाऊल उचला. कधीच नाही त्यापेक्षा उशीर बरा. नवीनच नोकरी सुरू केलेल्यांसाठी माझे आवाहन असेल की निवृत्ती नियोजनाचा विचार आजपासूनच सुरू करा.
तुम्ही तुमच्या पहिल्या पगारापासून १० टक्के जरी रक्कम निवृत्ती नियोजनासाठी बाजूला ठेवलीत आणि पगार वाढीप्रमाणे ही रक्कम थोडी थोडी वाढवत राहिलात तरी निवृत्तीपर्यंत बरीच रक्कम जमा होईल. अशी गुंतवणूक करण्यासाठी म्युचुअल फंडांमध्ये गुंतवणूक करताना ‘एसआयपी टॉप-अप’चा पर्यायही उपलब्ध आहे.
निवृत्ती नियोजनासाठी करावी लागणारी गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी करावी लागत असल्यामुळे ती अशाच गुंतवणूक पर्यायांमध्ये केली गेली पाहिजे की जे गुंतवणूक पर्याय तुम्हाला भाववाढीचा दर ओलांडून परतावा देऊ शकतील. हे करण्यासाठी तुमच्या पोर्टफोलिओत इक्विटीलाही स्थान देणे भाग आहे, परंतु ते किती असावे हे व्यक्तिगणिक त्यांच्या जोखीम घेण्याची क्षमता पडताळूनच ठरवणे योग्य आहे. तसेच अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की, निवृत्तीनंतर पगाराप्रमाणे मासिक परतावा कशा प्रकारे आपण मिळवू शकतो, आपण ज्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करणार आहोत, त्यात निवृत्तीनंतर मासिक परताव्यासाठी सोय आहे का हे लक्षात घ्यायला हवे. शिवाय पुढे मिळणारी रक्कम ही त्या वेळचा भाववाढीचा दर ओलांडून मिळायला हवी. योग्य अर्थिक नियोजक निवृत्ती नियोजन करताना या सर्व गोष्टींचा विचार करूनच गुंतवणूक सल्ला देतात. त्यामुळे दीर्घकाळासाठी होणारी तुमची गुंतवणूक योग्य प्रकारे केली गेली आहे का याची पडताळणी तुम्हाला वरील प्रश्नांवरून मिळेल. गुंतवणूक ही काळजीपूर्वक नीट समजून घेऊनच करा. अवाजवी परतावा देण्याचे वचन देणाऱ्या पोन्झी योजनांना बळी पडू नका.
लवकरात लवकर कमी वयात निवृत्ती नियोजनासाठी घेतलेला निर्णय निवृत्तीनंतरही आत्मनिर्भर असल्याचा आपल्याला विश्वास देईल.
निवृत्ती नियोजनासाठी उपयुक्त काही गुंतवणूक पर्याय
* म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी, न्यू पेन्शन स्कीम (एनपीएस), विमा कंपन्याचे पेन्शन प्लान अथवा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) यातील योग्य पर्यायांची निवड ही आर्थिक नियोजकाच्या साहाय्याने तुम्ही करू शकता.
* निवृत्तीपश्चात वयोमानानुसार आपले वैद्यकीय खर्चही वाढू शकतात. यासाठी तरुण वयातच योग्य आरोग्य विमा घेऊन ठेवणे केव्हाही हिताचेच असते. तसेच सुरुवातीलाच गंभीर आजारासंबंधीचा विमा घेऊन ठेवणे. (आरोग्य विम्यासंबंधी जून २०१६ च्या लेखात आपण सविस्तर पाहिले आहेच.)
किरण हाके kiranhake@fingenie.co.in
लेखक हे ‘सीएफपी’ पात्रताधारक अर्थ नियोजनकार आणि ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.