सुंदरम स्मार्ट निफ्टी १०० इक्वल वेट फंड

भविष्य निर्वाह निधी संघटना कामगारांच्या पीएफचा पैसा इंडेक्स फंडात मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करीत आहेत. मागील तीन वर्षांत भविष्य निर्वाह निधीकडून २८,००० कोटींची गुंतवणूक इंडेक्स फंडात झाली आहे. दीर्घ काळासाठी अल्प जोखमीचा व मध्यम परतावा देणारा फंड असल्याने, ज्या गुंतवणूकदारांचा उद्देश केवळ महागाई दरापेक्षा अधिक परतावा मिळविणे हे आहे त्यांच्यासाठी हा आदर्श गुंतवणूक पर्याय आहे.

हेन्री मॅक्स मार्कोविट्झ हे आधुनिक पोर्टफोलिओ थिअरीचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी मांडलेला सिद्धांत ‘मार्कोविट्झ पोर्टफोलिओ थिअरी’ या नावाने गुंतवणूक जगतात ओळखला जातो. एखादा पोर्टफोलिओ त्याने निश्चित केलेल्या निर्देशांकसापेक्ष किती वरखाली होतो हे मोजण्याचे मापक म्हणजे ‘बीटा’. पोर्टफोलिओचा बीटा जितका अधिक तितके  त्या पोर्टफोलिओचे चढ-उतार अधिक. गुंतवणूक केलेल्या समभागांचे भाव कमी-अधिक होण्याचे प्रमाण म्हणजे जोखीम. ही जोखीम व पोर्टफोलिओचा परतावा यांचा थेट संबंध आहे.

गुंतवणुकीतील जोखीम जितकी अधिक तितका परतावा अधिक. हा अधिक परतावा मिळविण्यासाठी जोखीम उचलतात, तर इंडेक्स फंड निधी व्यवस्थापकाचा सक्रिय सहभाग कमी करतात. त्यामुळे जोखीम कमी होते. परतावा व जोखीम यांच्यातील समतोल साधला जात असल्यामुळे प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये व विशेषत: अमेरिकेत इंडेक्स फंड लोकप्रिय आहेत. एकूण इंडेक्स फंडात व्हॅनगार्ड समूहाचा २० टक्के इतका बाजारहिस्सा आहे. व्हॅनगार्ड समूहाचे संस्थापक जॉन बॉगल हे इंडेक्स फंड संकल्पनेचे जन्मदाते होत. वर्षांच्या शेवटच्या सोमवारी शिफारस करीत असलेला आजचा फंड हा गुंतवणूक शास्त्रातील दोन पुरुषोत्तमांच्या विचारांचा संगम होय. सुंदरम स्मार्ट निफ्टी १०० इक्वल वेट फंड हा इंडेक्स फंड असला तरी सक्रिय व्यवस्थापन असणारा हा फंड आहे.

राष्ट्रीय शेयर बाजाराचे निर्देशांकांचे व्यवस्थापन इंडिया इंडेक्स सव्‍‌र्हिसेस अ‍ॅण्ड प्रॉडक्ट्स ही स्वतंत्र कंपनी पाहते. निफ्टी या नाममुद्रा असलेल्या एकूण ६७ फंडांचे व्यवस्थापन ही कंपनी पाहते. यापैकी निफ्टी व निफ्टी ज्युनियर या निर्देशांकात सर्वाधिक भांडवली मूल्य असलेल्या पहिल्या १०० कंपन्यांचा समावेश होतो. तरी निफ्टी व निफ्टी ज्युनियर या निर्देशांकात ६५ टक्के भांडवली बाजाराचे प्रतिनिधित्व असते. वस्त्रनिर्मिती, अभियांत्रिकी यासारख्या उद्योगांना निर्देशांकात पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नसल्याने या आक्षेपांचा विचार करून  इंडिया इंडेक्स सव्‍‌र्हिसेस अ‍ॅण्ड प्रॉडक्ट्सने जून २०१३ मध्ये स्मार्ट निफ्टी हा इक्वल वेट म्हणजे सर्व समभागांचे सम प्रमाण असलेला निर्देशांक प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. सुंदरम स्मार्ट निफ्टी १०० इक्वल वेट फंड या फंडाचा स्मार्ट निफ्टी हा संदर्भ निर्देशांक आहे. असून इंडेक्स सव्‍‌र्हिसेस अ‍ॅण्ड प्रॉडक्ट्स ही कंपनी आपल्या निर्देशांकांचा सप्टेंबर व मार्च महिन्यात वर्षांतून दोन वेळा आढावा घेते.

हा फंड या योजनेत जमा झालेला निधी या १०० समभागात समप्रमाणात म्हणजे प्रत्येकी एक टक्का प्रत्येक कंपनीत गुंतविणार आहे. फंडाच्या गुंतवणुकीचा आढावा प्रत्येक तिमाहीत घेऊन गुंतवणुकीत समतोल साधला जाईल. या तीन महिन्यांच्या कालावधीत एखाद्या समभागाचे मूल्य वाढल्यामुळे एकूण गुंतवणुकीत या समभागाचा हिस्सा एक टक्क्याहून अधिक झाला असेल हे समभाग विकून हिस्सा मूळ १ टक्के राखला जाईल, तर ज्या समभागांचे भाव घटले आहेत अशा समभागांची खरेदी केली जाईल. जेणेकरून तिमाहीच्या सुरुवातीला सर्व १०० समभागांचे गुंतवणुकीतील प्रमाण सारखे असेल. दरम्यानच्या काळात फंडात जमा झालेला निधी प्रत्येक समभागात एक शतांश प्रमाणात गुंतविला जाईल. हा फंड आर्थिक आवर्तने, या सारख्या बाह्य़ गोष्टींनी प्रभावित होऊन समभागातील गुंतवणूक कमी-अधिक करणार नाही. अशा प्रकारच्या गुंतवणूक व्यवस्थापनाला निष्क्रिय व्यवस्थापन असे म्हणतात. निष्क्रिय व्यवस्थापन असल्याने निधी व्यवस्थापन खर्च अतिशय कमी असतो. सक्रिय निधी व्यवस्थापनाचा भारतातील खर्च २.२५ ते २.५० टक्के आहे तर निष्क्रिय व्यवस्थापन असलेल्या फंडाचा खर्च ०.२५ ते ०.३५ टक्के आहे. इंडेक्स फंडांची कार्यक्षमता मोजण्याचे परिणाम म्हणजे ‘ट्रॅकिंग एरर’. कोणत्याही फंडाची ट्रॅकिंग एरर जितकी कमी तितका तो फंड कार्यक्षम समजला जातो. सर्वसाधारण पणे ईटीएफ कार्यक्षम असतात. कारण एका मिनिटात चार वेळा निर्देशांकाप्रमाणे त्यांचे गणन केले जाते. या फंडाच्या पोर्टफोलियोचा तीन महिन्यांतून एकदा समतोल साधला जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनेकदा नवगुंतवणूकदार म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास कचरतो, कारण भाव वर अथवा खाली जाण्याची जोखीम. हा फंड अल्प जोखमीचा व मध्यम परतावा असणारा फंड आहे. या फंडाच्या विक्रीला आज सुरुवात होत असून हा फंड गुंतवणुकीसाठी ९ जानेवारीपर्यंत खुला राहणार आहे. त्यानंतर रोजच्या मालमत्ता मूल्यानुसार फंडाची खरेदी विक्री करता येऊ  शकेल. किमान गुंतवणूक ५,००० रुपये असून किमान १,००० रुपयाच्या एसआयपीने या फंडात गुंतवणुकीस सुरुवात करता येऊ  शकेल. ज्या गुंतवणूकदारांचा उद्देश केवळ महागाई दरापेक्षा अधिक परतावा मिळविणे हे आहे त्यांच्यासाठी हा आदर्श गुंतवणूक पर्याय आहे. भविष्य निर्वाह निधी संघटना कामगारांच्या पीएफचा पैसा इंडेक्स फंडात मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करीत आहेत. मागील तीन वर्षांत भविष्य निर्वाह निधीकडून २८,००० कोटींची गुंतवणूक इंडेक्स फंडात झाली आहे. दीर्घ काळासाठी अल्प जोखमीचा व मध्यम परतावा देणारा फंड असल्याने अल्प जोखीम असलेले गुंतवणूकदार या फंडाचा जरूर विचार करू शकतात.

(अस्वीकृती: या स्तंभात वापरलेली माहिती व आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

वसंत माधव कुलकर्णी Shreeyachebaba@gmail.com