अर्धा डझन कच्चे लिंबू!   भाग – ७

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज निकालाचा दिवस! दहावी, बारावी किंवा पदवीचा नाही, तर आपल्या अर्धा डझन कच्च्या लिंबांचा. गेले सहा महिने जे शिकत होते त्याचं प्रत्यंतर आज त्यांच्या स्वत:च्या पोर्टफोलियोमध्ये झालं होतं. जरा बाचकत, जरा घाबरत का होईना, सगळ्यांनी हिंमत केली होती. सोनल काय अभिप्राय देते याबद्दल सर्वाच्या मनात खूप उत्सुकता होती. त्यामुळे आज सगळ्या जणी काहीही करून नेहमीच्या ट्रेनमध्ये चढल्या. ठाणे स्टेशन आलं तसं सोनल आणि सुगंधाताई ट्रेनमध्ये घुसल्या. सोनलने सर्वाच्या चेहेऱ्यावरून नजर फिरवली आणि तिला छान हसूच आलं. हसता हसता म्हणाली- ‘‘अगं बाई, काय टेन्शनमध्ये दिसताय तुम्ही सगळ्या! तुमचाच दहावी-बारावीचा निकाल असल्यासारख्या..’’ तिच्या या म्हणण्यावर सगळ्या जणी खुदकन हसल्या. जिग्ना म्हणाली- ‘सोनलदीदी, अहो परीक्षाच होती की आमची. किती मेहेनत करायला लागली.’ तिलोत्तमा तिला जोड देत म्हणाली- ‘गुंतवणूक विचार करून करणं हे शिस्तीचं आणि चिकाटीचं काम आहे बाबा. बऱ्याच वेळा अर्धवट सोडून द्यायचा विचार मनात येतो. पण प्रत्येक वेळेला तू सांगितलेल्या गोष्टी आठवून पुन्हा नवीन उमेदीने काम केलं.’ मग जरा घाबरत मीनाक्षी म्हणाली- ‘सोनल आक्का, एक सांगते. आम्ही थोडी चीटिंग पण केली.’ त्यावर यास्मिनने तिच्याकडे डोळे वटारून पाहिले. सोनलला आश्चर्य वाटलं. म्हणाली- चीटिंग? आता यात काय चीटिंग केली तुम्ही? सिल्वी म्हणाली – मी सांगते. आम्ही सगळ्या जणींनी दोन शनिवार बसून सगळं काम एकत्र केलं. म्हणजे आम्हा सर्वाचे पोर्टफोलियो बनवले. एक-एकटीने डोकं न लढवता, सगळ्यांनी मिळून काम केलं आहे. त्यामुळे असं झालं की आमचे बरेचसे प्रश्न आपसात चर्चा करून सुटले. सोनल म्हणाली – अरे यात कसली आली चीटिंग? हे तर बरंच झालं. खरं सांगायचं तर आपल्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना सगळ्याच गोष्टींची माहिती नसते. आणि जेव्हा आपण चार सुज्ञ लोकांमध्ये चर्चा करतो तेव्हा आपल्याला ज्ञान मिळतं. त्यावर यास्मिन म्हणाली- चला बरं झालं. आम्हाला आपलं उगीच अपराधी वाटत होतं. पण एक अजून गोष्ट आहे. आम्ही म्युचुअल फंड निवडताना वेगवेगळ्या वर्तमानपत्रात मिळणारी माहिती वाचली आणि त्यातून आम्हाला समजतील असे फंड निवडले. कुणा तज्ज्ञ व्यक्तीने वर्तमानपत्रात एखादा फंड सुचविला म्हणून आम्ही त्या फंडाकडे वळलो. पण या पुढे स्वत: फंड कसा तपासायचा हे पण आम्हाला शिकायचंय. सोनलने शांतपणे हे सर्व ऐकून घेतलं आणि तिला या सर्वाचं खूप कौतुक करावंसं वाटलं. ती म्हणाली – गुंतवणुकीची सुरुवात अशीच होते आणि जसजशा गोष्टी अंगवळणी पडतात तस तसं आपण त्याच्यात मुरत जातो. आधी आपण कुणी तरी सांगतंय म्हणून विश्वास ठेवतो आणि हळूहळू स्वत: एखाद्याचं म्हणणं आपल्यासाठी बरोबर आहे की नाही हे तपासायला शिकतो. मला आनंद आहे की तुम्ही हे सगळं केलं आहे. चला आता मला दाखवा बरं काय शिजवलंय ते!

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trupti rane article for choosing right investments
First published on: 17-07-2017 at 01:05 IST