मागील अभ्यासवर्गामध्ये आपण लाँग कॉल केव्हा खरेदी करावा हे पहिले आहे. कॉल खरेदी करताना, बाजाराची दिशा तेजीची असते त्याचप्रमाणे इतरही घटक जे मागील लेखांमधून नमूद केले आहेत जसे ध्वनित अस्थिरता, महत्त्वाचे होऊ घातलेले निर्णय इत्यादीचा विचार करावा. परंतु सर्वसाधारणपणे नफा-अमर्याद, तोटा-मर्यादित (म्हणजे जास्तीत जास्त भरलेला प्रीमिअम) या खुळखुळ्याची सामान्य लोकांवर एवढी मोहिनी असते की अनेक वेळा तोटा सहन करूनही नग्न कॉल व पुट घ्यायचा हव्यास सुटत नाही.
बाजार केव्हाही आपल्या अंदाजानुसार जात नसतो तेव्हा एखाद्या व्यवहारामध्ये तोटा होत असल्यास बाजाराची दिशा माझ्या बाजूने आता तरी असेल ही आशा ठेवून पुन्हा तोच व्यवहार करण्याचा व तोटा सरासरीनुसार कमी करण्याचा प्रयत्न अनेक ट्रेडर्स करत असतात. म्हणजे ज्या स्ट्राईकच्या कॉल सुरुवातीला घेतला त्याच स्ट्राईकचा कॉल पुन्हा घेतला जातो. आताच्या पातळीवर तो कॉल स्वस्त असल्याने हातात असलेल्या दोन कॉलची किंमत सरासरी होऊन खर्च कमी झालेला असतो. पुन्हा बाजार मंदीमध्ये जायला लागल्यास पुन्हा त्याच स्ट्राईकचा स्वस्त झालेला कॉल विकत घ्यायचा व केलेल्या एकूण खर्चाची सरासरी होऊन कमी भावामध्ये मिळत असल्याचा आनंद मानायचा असा प्रकार अनेक लोक करतात. परंतु हा प्रकार अतिशय धोकादायक असतो. विकल्पामध्ये व्यवहार करताना केव्हाही तोटा सरासरी करण्यासाठी पुन्हा पुन्हा त्याच स्ट्राईकचा कॉल घेऊ नये. कारण त्या स्ट्राईकचा कॉल फारच ‘ओटीएम (ओव्हर द मनी)’ झालेला असेल व त्याचा डेल्टा अतिशय कमी असल्याने तेजी आली तरी त्या स्ट्राईकमध्ये भाववाढ होऊन नफा मिळवणे दुरापास्त झालेले असेल.
अशा वेळी आपण खालील डावपेच वापरू शकता. (अर्थात तोटा होत असल्यास आता तरी बाजारात तेजी येईल असा आशावाद न ठेवता तोटा पत्करून बाजारातून बाहेर पडणे शहाणपणाचे असते. परंतु शेअर बाजारामधून नफा कमावणे हा तंत्राचा खेळ कमी व मनाचा खेळ जास्त असल्याने सामान्यत: लोक तोटा मान्य न करता आशावाद कायम ठेवून बाजारात मोठा तोटा करून बसतात.)
लाँग कॉल स्ट्रिप (Long call strip): तांत्रिकदृष्टय़ा लाँग कॉल स्ट्रिप म्हणजे एकाच करार समाप्तीचे वेगवेगळ्या स्ट्राईकचे कॉल एकाच वेळी विकत घेणे. परंतु एखाद्या व्यक्तीची अशी ठाम समजूत असेल की बाजारात तेजी येईल व सध्या असलेली मंदी अल्पजीवी आहे तरच त्या व्यक्तीने लाँग कॉल स्ट्रिप थोडय़ा वेगळ्या पद्धतीने घेण्यास हरकत नाही.
लाँग कॉल स्ट्रिप डावपेच केव्हा? : दिशा तेजीची असेल व व्हेगा (vega)च्या संकल्पनेमुळे अस्थिरतादेखील वाढणार असेल, तेव्हा प्रथम आपण एक एटीएम (अ‍ॅट द मनी) कॉल घेतला, जेव्हा बाजाराची मुख्य दिशा तेजीची असता व तत्कालीन कारणामुळे बाजार मंदीमध्ये येत असल्यास आधार पातळीवर भाव आल्यास एक त्या किमतीनुसार एटीएम कॉल घ्यायचा. त्यामुळे ग्रीकच्या संकल्पनेनुसार शेअर्सच्या किमतीमध्ये भाववाढ झाल्यास नफा होईल व पहिल्या स्ट्राईकचा कॉलसुद्धा मनीनेसच्या संकल्पनेनुसार हळूहळू ओटीएम होत जाईल. जर बाजार तेजीमध्ये न जाता पुन्हा मंदीत येत असेल व आपला मुख्य दृष्टिकोन तेजीचाच असेल व इतर बाबीसुद्धा सकारात्मक असतील तर जेव्हा पुन्हा बाजार आधार पातळीला आल्यास आता त्या किमतीच्या जवळचा म्हणजेच एटीएम कॉल विकत घ्यावा. अशा तऱ्हेने तीन किंवा त्यापुढील संख्येने कॉल घेतल्यास लाँग कॉल या डावपेचास, लाँग कॉल स्ट्रिपमध्ये रूपांतरित केले असे आपण म्हणू.
डेल्टा परिणाम : निर्देशांक / शेअर्स वर गेल्यास कॉलची किंमत वाढते
व्हेगा परिणाम : अस्थिरता (volatility) वाढल्यास कॉलची किंमत वाढते
थीटा परिणाम : दिवसागणिक कॉलची किंमत कमी होते
नफा: अमर्याद
तोटा: जास्तीत जास्त भरलेला प्रीमियम
केव्हा बाहेर पडावे: बाजार/ शेअर्स दिशा लवकरात लवकर तेजीची / बुलिश होत नसल्यास संपूर्ण प्रीमिअमचे नुकसान करण्यापेक्षा झालेला तोटा बुक करून बाहेर पडावे किंवा अगोदरच ठरवलेला तोटा किंवा फायदा झाल्यास बाहेर पडावे.
उदाहरणार्थ: एलआयसी हाऊसिंग फायनान्सच्या शेअरचा विचार करता असे मला वाटते की, स्मार्ट सिटी संकल्पना, सातवे वेतन आयोग, मेक इन इंडिया इत्यादी सरकारी पातळीवरील धोरणात्मक बाबींचा गृहनिर्माण क्षेत्राला फायदा होईल. पुढील काही दिवसांत वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) विषय लोकसभेमध्ये चर्चिला जाणार आहे. १५-१६ डिसेंबरला अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हचा दरवाढीबाबत निर्णय अपेक्षित आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून माझा या उद्योग क्षेत्राबद्दलचा दृष्टिकोन तेजीचा आहे. परंतु नजीकच्या काळात काही दिवसाकरिता मंदीही असू शकते. अशा वेळी माझ्या डोळ्यांसमोर लाँग कॉल हा डावपेच घ्यावा असे वाटते. परंतु या डावपेचाला मी लाँग कॉल स्ट्रिपमध्ये रूपांतरित करण्याची तयारी ठेवून हा लाँग कॉल घेत आहे.
एलआयसी हाऊसिंग फायनान्स या शेअर्सची किंमत ४५८ रुपये आहे. मला असे वाटते की, या शेअर्सची किंमत नजीकच्या कालावधीमध्ये ५०० पर्यंत जाऊ शकते, म्हणजे माझा दृष्टिकोन तेजीचा आहे.
त्याचप्रमाणे वरील विविध आर्थिक गोष्टींमुळे अस्थिरतेमुळे वाढ होणार आहे, परंतु अस्थिरतेसह दृष्टिकोन तेजीचा आहे, या दोन्ही गोष्टींचा विचार करता मी कॉल खरेदीचा पर्याय स्वीकारणार आहे. मी विकल्प साखळीतील विविध स्ट्राईकपकी रु. ४६० स्ट्राईकच्या कॉलचा प्रीमिअम १५ रु. आहे. हा खरेदीसाठी निवडतो व त्याची लॉट संख्या ११०० आहे. त्यामुळे माझी एकंदर गुंतवणूक १६५०० आहे. ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत केव्हाही माझा अंदाज खरा ठरला असता व बाजारभाव ५०० रु. झाल्यास डेल्टामुळे, अधिक अस्थिरतेमुळे विकल्पाच्या किमतीमध्ये झालेली वाढ उणे थीटामुळे झालेला ऱ्हास यांचा एकंदरीत परिणाम होऊन सदर कॉलचा भाव कमीत कमी ४०-४२ रु. झालेला असेल. म्हणजेच केवळ १६५०० रु. भरून मी २७००० ते ३०००० हजार रुपयांचा नफा कमावू शकतो. त्याच वेळी शेअरच्या तक्त्याचा अभ्यास करता शेअरची ४२० रु. ही आधार पातळी असल्याने तिथून तो वरच जाईल. त्यामुळे त्या किमतीला शेअर आल्यास एक कॉल परत ४२० या स्ट्राईकचा खरेदी करेन व त्या स्ट्राईकच्या कॉलची किंमत १२ ते १३ रुपये असेल. त्यानंतरची आधार पातळी ४०० रुपये आहे. हा शेअर त्या किमतीला आल्यास पुन्हा मी एक कॉल ४०० रु.च्या स्ट्राईकचा खरेदी करेन. तेव्हा त्या कॉलची किंमत १० ते १२ रुपये असेल. अशा रीतीने माझ्या या लाँग कॉल या डावपेचास लाँग कॉल स्ट्रिपमध्ये मी रूपांतरित करेन. अशा स्थितीत जर तो शेअर वाढायला लागला तर खूप नफा होईल.

(केवळ विकल्पाचे तंत्र व डावपेचांची माहिती देण्याकरिता सदर उदाहरणाचा उल्लेख आला आहे. चालू बाजारातील उदाहरणही केवळ संकल्पना समजून सांगण्यासाठी आहे. कृपया वाचकांनी माझा लेखकाचा सल्ला व खरेदीची शिफारस आहे असे समजू नये. योग्य सल्लागाराकडून मार्गदर्शन घेऊनच व्यवहार करावा.)

– नरेश यावलकर
primeaocm@yahoo.com