श्रीकांत कुवळेकर

गेल्या वर्षांत सोन्याच्या डिजिटलीकरणाला चालना मिळाली असून सोन्याच्या बाजारपेठेमध्ये अनेक बदल घडून आले आहेत. बीएसईने नुकतेच स्पॉट गोल्ड एक्स्चेंज या नवीन दालनाचे औपचारिक उद्घाटन  केले. सामान्य गुंतवणूकदारांना त्यावर सोन्याची खरेदी—विक्री करण्याची सुविधा यातून उपलब्ध करून दिली गेली आहे. यापूर्वी आपल्याला ईटीएफ, सुवर्णरोखे, वायदे बाजार आणि डिजिटल सोने असे ‘पेपर गोल्ड — कम — सोने’ असे काही पर्याय माहीत होते. थोडासा अशाच प्रकारचा नवीन पर्याय आपल्याला आता बीएसईने उपलब्ध करून दिला असून त्याला ‘इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट (ईजीआर)’ म्हणजेच ‘इलेक्ट्रॉनिक सुवर्ण पावती’ असे नाव आहे.

बरोबर चार वर्षांपूर्वी या स्तंभामधून ‘सोने – एक वंडर कमोडिटी’ या शीर्षकाखाली चार लेखांची मालिका प्रकाशित केली गेली होती. भारताची आणि भारतीयांची सोन्याबाबत असलेली आत्मीयता, प्रेम, त्यामुळे भारतात मोठय़ा प्रमाणावर जमा झालेले सोने, परंतु अर्थव्यवस्थेसाठी अनुत्पादक मालमत्ता ठरलेले २५,००० टन सोन्याचे साठे याबाबत सविस्तर माहिती या लेखमालेमध्ये दिली होती. तर मागील दशकात इलेक्ट्रॉनिक क्रांतीमधून सराफा बाजारात झालेले बदल याची माहिती देतानाच सोन्याकडे भावनेपेक्षा गुंतवणुकीच्या नजरेने पाहणे कसे गरजेचे आहे आणि गुंतवणुकीच्या उपलब्ध पर्यायांपैकी प्रत्येकाला त्याच्या वकुबाप्रमाणे, जोखीम-क्षमतेनुसार कोणता पर्याय कसा निवडावा याबद्दलदेखील सविस्तर माहिती दिली गेली होती.

वर म्हटल्याप्रमाणे प्रचंड प्रमाणात, पण ‘अनुत्पादक’ असलेलं सोनं अर्थव्यवस्थेमध्ये आणून देशाची आयात कमी करण्यासाठी सुवर्णरोखे, सुवर्ण ठेवसारख्या योजना नव्याने आणल्या गेल्या. तर मागील काही वर्षांत सोन्याच्या डिजिटलीकरणालादेखील चालना मिळाल्यामुळे सोन्याच्या बाजारपेठेमध्ये अनेक बदल घडून आलेले दिसत आहेत. यापुढील काळातदेखील स्थानिक वायदेबाजार अधिक विकसित होतानाच, गुजरातमधील ‘गिफ्ट – सिटी’मध्ये डॉलरमध्ये व्यवहार करणारे आंतरराष्ट्रीय सराफा विनिमय मंच अर्थात इंटरनॅशनल बुलियन एक्स्चेंजदेखील चालू झाल्यामुळे सोन्याच्या आयात क्षेत्रात मोठे बदल होत आहेत आणि सर्वात जास्त काळा पैसा किंवा समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणाऱ्या सराफा बाजाराची प्रतिमाही त्यासरशी झपाटय़ाने बदलताना दिसू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर सोने बाजारपेठेमध्ये आता एक नवीन दालन उघडले गेले आहे त्याची माहिती आपण आज घेणार आहोत. मागील आठवडय़ामध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर बाजारातील शतकाहून जास्त अनुभव असणाऱ्या बॉम्बे स्टॉक एस्क्सचेंज म्हणजेच बीएसईने आपले स्पॉट गोल्ड एक्स्चेंज या नवीन दालनाचे औपचारिक उद्घाटन केले. सामान्य गुंतवणूकदारांना त्यावर सोन्याची खरेदी-विक्री करण्याची सुविधा यातून उपलब्ध करून दिली गेली आहे. यापूर्वी आपल्याला ईटीएफ, सुवर्णरोखे, वायदे बाजार आणि डिजिटल सोने असे ‘पेपर गोल्ड – कम – सोने’ असे काही पर्याय माहीत होते. थोडासा अशाच प्रकारचा नवीन पर्याय आपल्याला आता बीएसईने उपलब्ध करून दिला आहे.

‘इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट (ईजीआर)’ म्हणजेच ‘इलेक्ट्रॉनिक सुवर्ण पावती’ असे या साधनाचे नाव आहे. वर म्हटल्याप्रमाणे हे स्पॉट गोल्ड एक्स्चेंज आहे. म्हणजे येथे दर दिवशी होणारे सर्व व्यवहार हे प्रत्यक्ष डिलिव्हरी देऊन किंवा घेऊनच पूर्ण होणार असल्यामुळे त्यामध्ये सट्टा व्यवहार होण्यास जागा नाही. ज्याप्रमाणे आपण आपल्या ब्रोकरमार्फत जसे शेअर्सचे देवाणघेवाणीचे व्यवहार करतो त्याप्रमाणेच सोन्याची खरेदी-विक्री करायची आहे; परंतु सुरुवातीला हे सोने कोठून येते हे पाहणे जरुरीचे होईल.

तर ‘ईजीआर’ म्हणजे प्रत्यक्ष सोन्याचे सिक्युरिटायझेशन आहे. म्हणजे आपल्याकडे सोन्याचे १० किंवा १०० ग्रॅमचे बार असतील तर ते बीएसई-प्रमाणित सोन्याची रिफायनरी आणि नंतर सोने साठवणूक करणाऱ्या (व्हॉल्ट) कंपनीकडे ठेवून त्या बदल्यात एक-एक ग्रॅमच्या १० किंवा १०० ईजीआर आपल्या डिमॅट खात्यात जमा होतील. म्हणजे आपले प्रत्यक्ष सोने डिजिटल स्वरूपात आपल्या खात्यात जमा होऊन जाईल. आता याच ईजीआर आपल्याला स्पॉट एक्स्चेंजवर व्यवहारांसाठी वापरता येतील. जर आपण १ ग्रॅम सोने ईजीआर खरेदी केला तर आपल्याला सुरुवातीला किमतीच्या सुमारे २० टक्के एवढी रक्कम ब्रोकरला द्यावी लागेल. तर दुसऱ्या दिवशी आपल्या खात्यात या १ ग्रॅम सोन्याची डिलिव्हरी येईल. त्यापूर्वी उरलेले ८० टक्के पैसे द्यावे लागतील. शेअर्समध्ये डे-ट्रेिडगप्रमाणे ईजीआरमध्ये दररोज खरेदी-विक्रीचे अनेक व्यवहार केल्यास एक्स्चेंजचे व्यवहार संपताना एकंदर व्यवहारांपैकी नक्त व्यवहारांचीच प्रत्यक्ष डिलिव्हरी देणे किंवा घेणे बंधनकारक राहील. सुरुवातीला बीएसईने ९९.५ आणि ९९.९ शुद्धतेच्या सोन्याच्या १ ग्रॅम आणि १० ग्रॅम वजन-तुल्य ईजीआर व्यवहारांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. तर सामान्य गुंतवणूकदार नजरेसमोर ठेवून काही दिवसांतच  १०० मिलिग्रॅमच्या ईजीआरदेखील उपलब्ध करून देण्याचा एक्स्चेंजचा मानस आहे.

गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यावे की, हा मंच ‘सेबी’च्या कडक नियंत्रणाखाली राहणार असल्यामुळे त्यात व्यवहार करताना कुठलीही भीती मनात बाळगण्याची गरज राहणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यवहारांमध्ये आपल्या खात्यातील सोने ईजीआरच्या स्वरूपात पाहिजे तितके दिवस ठेवू शकता. शिवाय जेव्हा सोन्याच्या भावात मोठे चढ-उतार होतात तेव्हा त्याचा फायदा घेऊन खरेदी-विक्री करून अधिक पैसे कमावता येऊ शकतील आणि ज्याला जेव्हा प्रत्यक्ष सोन्याची आवश्यकता असेल तेव्हा तेच ईजीआर प्रत्यक्ष सोन्यात रूपांतरित करून घेता येतात; परंतु प्रत्यक्ष सोने हे १० ग्रॅम आणि त्याच्या पटीतच रूपांतरित केले जाईल. याहूनही सर्वात मोठा फायदा म्हणजे या मंचावर व्यवहारांची वेळ हे सकाळी ९ वाजल्यापासून ते रात्री ९.३० वाजेपर्यंत राहणार असल्यामुळे संध्याकाळच्या वेळी आपल्या नेहमीच्या रहाटगाडग्यातून वेळ काढून सोनाराकडे जाण्याऐवजी घरबसल्या किंवा मोबाइलवरून उशिरापर्यंत व्यवहार करण्याची मुभा राहील. शिवाय संध्याकाळनंतर आपले सराफा बाजार बंद झाल्यावर जागतिक बाजारात सोन्याच्या भावात मोठी घसरण झाल्यास या मंचाद्वारे त्याचा फायदा घेणे शक्य होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे पाहता ज्यांना ‘एसआयपी’ किंवा विशिष्ट गुंतवणूक मासिक पद्धतीने करून थोडे थोडे सोने साठवायचे असेल त्याने  ईजीआर हे साधन वापरण्यास योग्य राहील. अर्थात हे नवीन साधन असल्यामुळे त्यातील व्यवहारांबाबत करप्रणाली काय असेल याबाबत करनियंत्रकदेखील यातील व्यवहारांचा योग्य तो अभ्यास करून योग्य ते निर्णय लवकरच जाहीर  करतील आणि त्यामुळे हा मंच अधिक आकर्षक आणि मजबूत होईल हे निश्चित.

लेखक वस्तू बाजार विश्लेषक

ksrikant10@gmail.com

अस्वीकरण : कमॉडिटी बाजार हा मुख्यत: जोखीम व्यवस्थापनासाठी असून वरील लेख या गोष्टीचे महत्त्व आणि त्यातील गणित विशद करून सांगण्यासाठी आहे, लेखाला गुंतवणुकीचा सल्ला मानण्यात येऊ नये.