गेल्या काही दिवसांपासून मुंबई शेअर बाजारामध्ये सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. गेल्या महिन्याभरात शेअर बाजाराने रोज नवनवे उच्चांक गाठले आहेत. गुरुवारी मुंबई शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सनं थेट ६१ हजारांच्या वर विक्रमी झेप घेतली. त्यामुळे खरेदी-विक्रीमध्ये मोठ्या हालचाली दिसून आल्या. यामध्ये इन्फोसिस, टेक महिंद्रा, आयटीसी, एल अँड टी, एनटीपीसी, टाटा स्टील, मारुति सुझुकी, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, आरआयएल या कंपन्यांच्या शेअर्सचा भाव चांगलाच वधारल्याचं दिसून आलं. मात्र, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एम अँड एम, हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात एचटीएफसी, भारती एअरटेल आणि इंडसइंड बँक या कंपन्यांना शेअर्स वर ठेवण्यासाठी आज बराच काथ्याकूट करावा लागला.

दरम्यान, सेन्सेक्सपाठोपाठ निफ्टीनं देखील मोठी झेप घेतली आहे. पहिल्यांदाच निफ्टीनं १८ हजार २५० अंकांपर्यंत मजल मारली आहे. यामध्ये बँक निफ्टीनं ०.२३ टक्के, निफ्टी ऑटोनं १.१८ टक्के तर निफ्टी आयटीनं २.५ टक्के इतकी वाढ नोंद केली आहे.