निफ्टी निर्देशांकाने सरलेल्या आठवडय़ात ‘बेअरिश एन्गल्फिंग’ मेणबत्ती रचना दाखवून मंदीग्रहणता दर्शविली आणि जसा निर्देशांकाने प्रतिकार क्षेत्रात प्रवेश केला, तसा बाजारात विक्रीचा दबावही वाढला असे आपण तांत्रिक आलेखाच्या आधारे या स्तंभातून निष्कर्ष मांडला होता. निर्देशांक आपल्या प्रतिकार क्षेत्रात प्रवेशकर्ता झाला असल्याचे म्हटले गेले. त्याप्रमाणे संपूर्ण आठवडाभर निर्देशांकाचा नकारात्मक कल दिसून आला आणि तो हळूवार पण निरंतर घसरता राहिला. शिथिल झालेले महागाई निर्देशांकाचे (चलनफुगवटा) शुक्रवारी आलेले आकडे मात्र आशा जिवंत ठेवणारे ठरले आणि व्याजदर कपातीच्या संभाव्यतेने बँकांच्या समभागांना भाव कमावला. तथापि सरकारने आर्थिक सुधारणांच्या आघाडीवर दाखविलेले कणखरता बाजारात गुंतवणूकदारांच्या भावना उंचावण्यात अपयशी ठरलेल्या दिसल्या. परिणामी सरलेल्या आठवडय़ात निफ्टी निर्देशांकाने ५८३९ पर्यंत घसरण दाखवून, सप्ताहअखेर ५८८० वर विश्राम घेतला.
जागतिक स्तरावर अमेरिकेतील घडामोडी सर्वच भांडवली बाजाराच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरल्या आहेत. निर्णायक मुदतीची वर्षसांगता समीप येऊन ठेपली तरी  वित्तीय अरिष्टाचे महादिव्य पार करण्याबाबत अमेरिकेतील धोरणकर्त्यांमध्ये एकमत होताना दिसून येत नाही. हा कथित ‘वित्तीय कडेलोटा’चे संकट (फिस्कल क्लिफ असे त्याला नामाभिधान दिले गेले आहे.) दूर लोटण्याबाबत अपयश हे अमेरिकेला भयंकर आर्थिक मंदीच्या गर्तेत लोटणारे ठरेल, अशी साधार भीती व्यक्त केली जात आहे. अर्थात याच्या परिणामाच्या चिंतेने भारताच्या बाजारातही पुरती सावधगिरीची स्थिती दिसून येत आहे. देशांतील बाजारात लक्षणीय स्वरूपाची तेजी सुरू असतानाच, प्रामुख्याने बाह्य कारणाने ही साशंकतेची स्थिती समोर उभी येऊन ठाकली आहे.
तांत्रिकदृष्टय़ा पाहता निफ्टी निर्देशांकाने अतिखरेदीच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. स्टॉकॅस्टिक ऑसिलेटर हा महत्तावाच दोलकदेखील हेच स्पष्ट करतो की, वरच्या पातळीवर निर्देशांकाला तग धरून राहणे उत्तरोत्तर कठीण बनत आहे आणि निरंतर दिवसाच्या नीचांक स्तरावर लोळण घेऊन विश्राम घेत आहे. सोबतच्या आलेखात दिसते त्याप्रमाणे ८० टक्क्यांच्या कलाटणी रेषेवर पोहचल्यानंतर निर्देशांकाने सीमोल्लंघनाचा संकेत देताना, विद्यमान पातळीपासून आणखी काही अंशांची त्यात दुरूस्ती शक्य असल्याचा संकेत दिला आहे. बाजारात चतुर व निष्णात गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचा कल दाखविणारा ‘मनी फ्लो इंडेक्स’देखील हेच सांगतो या दिग्गजांनी आता बाजारापासून दूर राहण्याचाच पवित्रा घेतला आहे. विशेषत: बाजाराची ही ताजी मनोदशा ५९२० ते ६००० अशा निर्देशांकाच्या आगामी प्रवासातील कडव्या प्रतिकार क्षेत्रातील प्रवेशामुळे बनली असल्याचे मागेच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यातूनच डिसेंबर महिन्याच्या एफ अ‍ॅण्ड ओ  मालिकेच्या सौदापूर्तीपर्यंत निफ्टीचा उच्चांक स्तर ६०००च्या पल्याड निश्चितच जाताना दिसत नाही, हेही गेल्या आठवडय़ातील स्तंभात सांगण्यात आले आहे. डेरिव्हेटिव्हच्या उलाढाली हेच दाखवितात की, बाजाराचा आगामी प्रवास हा अत्यंत अरुंद टप्प्यात हेलकाव्यांचा राहिल. ५७५० हा निफ्टी निर्देशांकााचा मजबूत आधार स्तर तूर्तास कायम आहे. ३१ डिसेंबर २०१२ ही संभाव्य वित्तीय कडेलोटाच्या अंतिम मुदतीकडे जगभरच्या भांडवली बाजाराचे डोळे लागले आहेत. ते टाळायचे झाल्यास अमेरिकेतील धोरणकर्त्यांना शीघ्रगतीने कृती करायला हवी. आगामी दोन आठवडय़ात अमेरिकेतील हालचालींनुसार आपल्या बाजारातील निर्देशांकांनीही ताल धरलेला दिसणे क्रमप्राप्तच आहे.       

सप्ताहासाठी शिफारस
*    स्टेट बँक : (सद्य दर २३२० रु.)     
        खरेदी :  लक्ष्य: रु. २३७८
*   टेक महिंद्र  :  (सद्य दर ९४८ रु.)     
        खरेदी : रु. ९५२ वर; लक्ष्य: रु. ९९५
*   येस बँक : (सद्य दर ४६० रु.)
        खरेदी: रु. ४६५ वर; लक्ष्य: रु. ४७८-४८५
*   युना. फॉस्फरस : (सद्य दर१२७.२५ रु.)
        खरेदी: रु. १२८.६० वर;  लक्ष्य: रु. १३५
गेल्या आठवडय़ातील विक्री  शिफारशीप्रमाणे टीसीएस आणि सेसा गोवा यांनी दिलेले इष्टांक गाठून अनुक्रमे १२१० आणि १८० अशा नीचांकापर्यंत घसरणदाखविली. तर खरेदीसाठी सुचविलेल्या युनायटेड फॉस्फरसने १२९.९५ या भावापर्यंतच मजल मारली.