|| सुधीर जोशी
करोनाच्या नव्या अवताराच्या धास्तीने जागतिक बाजारात गेल्या सप्ताहाच्या सुरुवातीला मोठी पडझड झाली होती. आपल्या बाजारातही त्यामुळे गेल्या सप्ताहाच्या पहिल्या दोन दिवसांत मोठी पडझड झाली. बँकिंग क्षेत्राच्या दबावाने प्रमुख निर्देशांक एक टक्क्यांनी कोसळले होते. बुधवारच्या सुटीनंतर दोन दिवसांत बाजाराने बहुतांशी नुकसान भरून काढले, पण निफ्टीचे १६ हजारांचे स्वप्न साकारले नाही.

गेल्या सप्ताहात जाहीर झालेल्या तिमाही निकालात एचडीएफसी लाइफला करोनामुळे वाढलेल्या मृत्यू नुकसानीच्या दाव्यांमुळे भरपाईसाठी जास्त तरतूद करावी लागली व त्याचे परिणाम तिमाही निकालांवर दिसले. एचडीएफसी बँकेच्या किरकोळ क्षेत्रातील कर्जाच्या मागणीवरही करोनाच्या प्रभावाचा परिणाम झाला. त्यामुळे दोन्ही कंपन्यांच्या समभागांवर विक्रीचे दडपण आले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या चांगल्या कामगिरीच्या तुलनेत दिल्ली व सभोवतालच्या प्रदेशात एकवटलेल्या एचसीएल टेक्नॉलॉजीजला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम जास्त सोसावा लागला. परंतु कंपनीचे व्यवस्थापकीय मंडळ भविष्यातील प्रगतीबाबत निर्धास्त आहे.

एसीसीने विक्रीत पन्नास टक्के तर नफ्यात शंभराहून जास्त टक्के वाढ केली. वाहतुकीतील अडथळ्यांचा व वाढीव इंधन दराचा सामना कंपनीला करावा लागत असला तरी वाढलेल्या सिमेंटच्या किमती व ऊर्जा-खर्च कपातीसाठी कंपनीने केलेल्या उपायांचा कंपनीला फायदा मिळेल. बांधकाम प्रकल्प जसजसे सुरू होतील तशी रेडी मिक्स काँक्रीटची मागणीदेखील वाढेल. कंपनीत गुंतवणुकीला वाव आहे. एशियन पेंट्स व हॅवेल्स या गृहसजावटीशी निगडित कंपन्यांनी उत्तम निकाल जाहीर केले. एशियन पेंट्सच्या नफ्यात १०० टक्के तर हॅवेल्सच्या नफ्यात २६८ टक्के वाढ झाली. गेल्या वर्षाच्या तिमाहीतील कडक टाळेबंदीचा बसलेला फटका व संचित मागणीचा परिणाम यामुळे या तिमाहीत निकाल जास्तच चांगले आले. लोकांची गेल्या वर्षात राहून गेलेली कामे आता मार्गी लागत असल्यामुळे घरबांधणी, सजावट व इतर नित्योपयोगी वस्तूंच्या मागणीत सतत वाढ अपेक्षित आहे. सध्याच्या बाजाराच्या उच्च पातळीमुळे अशा समभागांमध्ये योग्य संधीची वाट पाहूनच गुंतवणूक करावी लागेल.

हिंदुस्तान युनिलिव्हरने तिमाहीतील विक्रीत १३ टक्के तर नफ्यात दहा टक्के वाढ जाहीर केली. निकाल जाहीर झाल्यावर कंपनीच्या समभागांत विक्रीचा मारा झाला. ग्राहकोपभोग्य वस्तूंची निर्मिती करणाऱ्या ‘एफएमसीजी’ कंपन्यांच्या समभागांनी गेल्या काही महिन्यांत बाजाराच्या उसळीत बरोबरीने सहभाग घेतला नव्हता. याला कारण करोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा ग्रामीण भागाला जास्त बसला व अंशत: टाळेबंदीमुळे रोजचे सामान्य व्यवहार सुरू होते. त्यामुळे या वस्तूंच्या मागणीत संचित मागणीची लाट आली नाही. धान्य व अन्य खाद्यपदार्थांच्या किमतीमधील वाढही त्यांच्या नफ्यावर ताण देणारी ठरली. महागाईचा दर खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे त्यामुळे काहीशा जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या व सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या कंपन्या गुंतवणूकदारांची निराशा करणार नाहीत पण मोठा फायदाही मिळवून देणार नाहीत.

बजाज ऑटोच्या तिमाही विक्रीत व नफ्यात दुप्पट वाढ झाली. कंपनीचा मोटारसायकलच्या बाजारपेठेतील हिस्सा २० टक्क्यांजवळ आला. टाळेबंदीच्या प्रभावामुळे हे तीन महिने परीक्षा पाहणारे असले तरी निर्यातीतील प्राबल्यामुळे कंपनीला दिलासा मिळाला. कंपनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी उपकंपनी स्थापून तयारी करत आहे. दुचाकीबरोबर कंपनीचे तीन चाकी वाहनांच्या बाजारात वर्चस्व आहे. तीन चाकी वाहनांचा खप गेले वर्षभर कमी असला तरी आता तो वाढण्याची शक्यता आहे. सध्याच्या भावातील गुंतवणूक वर्षभरात फायदा मिळवून देईल.

ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसची प्राथमिक समभाग विक्री उद्यापासून सुरू होत आहे. ग्लेनमार्क फार्माच्या या उपकंपनीचा औषध निर्मितीमध्ये महत्त्वाचा घटक असणाऱ्या एपीआय निर्मितीचा व्यवसाय आहे. या क्षेत्रातील सध्याच्या भरभराटीचा व प्राथमिक समभाग विक्रीस मिळणाऱ्या प्रतिसादाचा विचार करता अर्ज करून नशीब अजमावायला हरकत नाही.

पहिल्याच दिवशी एक लाखाचे बाजार मूल्य गाठणाऱ्या झोमॅटोने वेगाने येत असलेल्या डिजिटल युगाची एक झलक या सप्ताहात दाखवली. भारतीय बाजारातील ‘युनिकॉर्न’ म्हणावी अशी ही पहिलीच कंपनी. नजीकच्या तोट्याकडे लक्ष न देता नव्या डिजिटल युगात जरा हटके पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या अशा कंपन्यांना जोखीम घेऊ शकणाऱ्या भांडवलदारांचे पाठबळ मिळते हे भारतीय बाजारात सिद्ध झाले. अशा नव्या कल्पनांवर आधारित व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांचा आता भांडवली बाजारात उतरतील व गुंतवणूकदारांना नफ्याच्या नव्या संधी मिळतील. करोनाकाळामुळे दैनंदिन कामकाजाचे डिजिटायझेशन करण्याची लाटच सर्व आस्थापनांमध्ये आली आहे. गेल्या सहा महिन्यांत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांची तेजी याच कारणांसाठी आहे. पण कंपन्यांचे मूल्यमापन करण्याच्या पारंपरिक पद्धतीमधे जसे पर्यावरण, सामाजिक भान व सुशासन (ईएसजी) यांचा प्रभाव वाढला त्यामध्ये आता डिजिटल या नव्या निकषाची भर पडेल.

sudhirjoshi23@gmail.com