प्रवीण देशपांडे
प्राप्तिकर कायद्यात झालेल्या बदलानुसार १ जुलै २०२२ पासून खालील बदल लागू झाले आहेत :
* ज्या करदात्यांनी आधार आणि पॅनची जोडणी अद्याप केलेली नाही त्यांना दुप्पट म्हणजे १,००० रुपये दंड भरावा लागणार आहे. ३० जून २०२२ पर्यंत तो ५०० रुपये होता.
* मागील अर्थसंकल्पात प्राप्तिकर कायद्यात नव्याने ‘१९४ आर’ हे कलम जोडण्यात आले. हे कलम १ जुलै २०२२ पासून लागू झाले. या कलमानुसार उद्योग-व्यवसायातून किंवा व्यवसायातून उद्भवलेला कोणताही लाभ किंवा अनुलाभ, जो पैशात बदलता येण्याजोगा असो किंवा नसो, असा लाभ किंवा अनुलाभ प्रदान करण्यापूर्वी अशा लाभाच्या किंवा अनुलाभाच्या मूल्याच्या किंवा एकूण मूल्याच्या दहा टक्के दराने उद्गम कर (टीडीएस) कापण्याची तरतूद आहे.
* असे लाभ एका आर्थिक वर्षांत २०,००० रुपयांपेक्षा कमी असल्यास ही तरतूद लागू होत नाही.
* डॉक्टर आणि सामाजिक माध्यमाद्वारे प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती या तरतुदीमुळे प्रभावित होतील. उदाहरणार्थ, औषध कंपन्यांकडून डॉक्टरांना मोफत मिळणाऱ्या औषधांच्या नमुन्यांवर (एका वर्षांत २०,००० रुपयांच्या किमतीपेक्षा जास्त असल्यास) उद्गम कर कापला जाईल.
* आभासी चलनावर १ टक्का उद्गम कर (टीडीएस) १ जुलै २०२२ पासून कापला जाईल. आभासी चलनाच्या उत्पन्नावर ३० टक्के सरसकट कराच्या तरतुदी १ एप्रिल २०२२ पासूनच लागू झाल्या आहेत. उद्गम कर मात्र १ जुलै २०२२ पासून कापला जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता वाचकांच्या प्रश्नोत्तराकडे वळू या :

’ प्रश्न : माझी पत्नी राज्य सरकारची निवृत्तिवेतनधारक आहे. डिसेंबर २०२१ मध्ये तिचे वय ७४ वर्षे पूर्ण झाले. तिचे वार्षिक उत्पन्न सुमारे ५,५०,००० रुपये आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये एक सदनिका विकून तिला ६५,३५,००० रुपये मिळाले. फेब्रुवारी २०२२ मध्ये ही सर्व रक्कम नवीन घर घेण्यात गुंतविली. तिने २०२१-२२ या आर्थिक वर्षांसाठी विवरणपत्र भरणे आवश्यक आहे का? असल्यास ते कोणत्या फॉर्ममध्ये भरावे? – प्रकाश, पुणे</strong>
उत्तर : ज्या करदात्याचे उत्पन्न कोणतीही वजावट घेण्यापूर्वी कमाल करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा, २,५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल (ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ लाख रुपये आणि अतिज्येष्ठ नागरिकांसाठी ५ लाख रुपये) तर त्यांना विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. आपल्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न ५,५०,००० रुपये आणि सदनिका विक्रीतून होणारा भांडवली नफा (‘कलम ५४’नुसार वजावट घेण्यापूर्वी) कमाल करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्यामुळे त्यांना विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. नवीन घरात केलेली गुंतवणूक आणि इतर गुंतवणुका विचारात घेतल्यास कदाचित कर भरावा लागणार नाही; परंतु विवरणपत्र भरावेच लागेल. आपल्या उत्पन्नात भांडवली नफ्याचा समावेश असल्यामुळे आणि उद्योग-व्यवसायाचा समावेश नसल्यामुळे आपल्याला ‘आयटीआर फॉर्म २’ मध्ये विवरणपत्र भरावे लागेल.

’ प्रश्न : मी ३० वर्षांपूर्वी शेअर बाजारात सूचिबद्ध कंपनीचे समभाग खरेदी केले होते, त्यावर दोनदा बक्षीस समभाग (बोनस) मिळाले. हे सर्व समभाग मी आत्ता विकले तर त्यावर कर आकारणी कशी होईल? – एक वाचक
उत्तर : आपण समभाग ३० वर्षांपूर्वी खरेदी केले होते म्हणजे ती दीर्घ मुदतीची संपत्ती आहे आणि त्यावर ‘कलम ११२ अ’नुसार कर आकारणी होईल. या कलमानुसार भांडवली नफा गणताना समभागाची खरेदी किंमत खालीलप्रमाणे दोन्हीपैकी (१ आणि २ पैकी) जी जास्त आहे ती विचारात घेतली जाईल :
प्रत्यक्ष खरेदी किंमत खालीलपैकी (अ आणि आ पैकी) जी कमी आहे ती
अ. समभागांचा ३१ जानेवारी २०१८ रोजीचा योग्य बाजारभाव
आ. विक्री किंमत

अशाप्रकारे गणलेली खरेदी किंमत आणि विक्री किंमत यामधील फरक हा भांडवली नफा किंवा तोटा असेल. बक्षीस समभाग कधी मिळाले यावर त्याची कर आकारणी होईल. हे समभाग ३१ जानेवारी २०१८ पूर्वी मिळाले असतील तर वरीलप्रमाणे भांडवली नफा गणावा लागेल आणि बक्षीस समभाग ३१ जानेवारी २०१८ नंतर मिळाले असतील तर त्याचे खरेदी मूल्य ‘शून्य’ समजून संपूर्ण विक्री किंमत हा भांडवली नफा असेल. बक्षीस समभाग कधी जाहीर झाले त्यानुसार ते अल्पमुदतीचे आहेत किंवा दीर्घ मुदतीचे आहेत हे ठरते. विक्री करण्यापूर्वी १२ महिन्यांच्या आत ते जाहीर झाले असतील तर ते अल्पमुदतीचे असतात अन्यथा दीर्घमुदतीचे. ते अल्पमुदतीचे असल्यास भांडवली नफ्यावर १५ टक्के (अधिक ४ टक्के शैक्षणिक कर) आणि दीर्घमुदतीचे असल्यास ‘कलम ११२ अ’नुसार कर भरावा लागेल. प्रथम १ लाख रुपयांच्या नफ्यावर कर भरावा लागणार नाही. नफा त्यापेक्षा जास्त असेल तर अशा जास्त रकमेवर १० टक्के इतक्या सवलतीच्या दराने कर भरावा लागेल. या कलमानुसार महागाई निर्देशांकाचा फायदा घेता येणार नाही. या समभागाची विक्री शेअर बाजारामार्फत केली तरच म्हणजेच त्यावर ‘एसटीटी’ भरला असेल, तरच या सवलतीच्या दराचा फायदा मिळतो.

’ प्रश्न : मी मागील महिन्यात एक सदनिका निवासी भारतीयांकडून खरेदी केली. त्याचे मुद्रांक शुल्कानुसार मूल्य ९० लाख रुपये आहे. या सदनिकेचे करार मूल्य ७८ लाख रुपये आहे. मला उद्गम कर कापावा लागेल का? आणि किती कापावा लागेल? मला याव्यतिरिक्त काही कर भरावा लागेल का? – संदीप जोशी
उत्तर : आपण खरेदी केलेल्या सदनिकेचे करार मूल्य ७८ लाख असले आणि आपण सदनिका विक्री करणाऱ्याला ७८ लाख रुपये दिले असले तरी, १ एप्रिल २०२२ पासून केलेल्या सुधारणेनुसार, उद्गम कर हा करार मूल्य आणि मुद्रांक शुल्कानुसार मूल्य यामधील जे जास्त आहे त्यावर कापावा लागणार आहे. आपल्या सदनिकेचे मुद्रांक शुल्कानुसार मूल्य जास्त असल्यामुळे आपल्याला १ टक्का उद्गम कर ९० लाख रुपयांवर कापावा लागेल. शिवाय करार मूल्य आणि मुद्रांक शुल्कानुसार मूल्य यामधील फरक हा १० टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर सदनिका विक्री करणाऱ्याला यामधील जी जास्त रक्कम असेल त्यानुसार भांडवली नफा गणावा लागतो आणि खरेदी करणाऱ्यासाठी सदनिकेचे मुद्रांक शुल्कानुसार मूल्य हे करार मूल्याच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर ही फरकाची रक्कम सदनिका खरेदी करणाऱ्याच्या ‘इतर उत्पन्ना’मध्ये गणली जाते आणि त्याला त्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागतो. आपल्या बाबतीत हा फरक (९० लाख वजा ७८ लाख रुपये) १० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे आपल्या उत्पन्नात १२ लाख रुपये दाखवून आपल्याला त्यावर कर भरावा लागेल. त्यामुळे घर खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्यावी. अन्यथा जास्त कर, व्याज भरावे लागू शकते.
लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार
pravin3966 @rediffmail. Com

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crypto tax tds new provisions in the income tax act applicable from 1st july amy
First published on: 04-07-2022 at 00:02 IST