रिझव्‍‌र्ह बँकेचा दावा; ‘अल्पकाळ नकारात्मकता मात्र वाढली’

एका रात्रीत लागू करण्यात आलेल्या नोटाबंदीने काळा पैसा रोखण्यात कोणतेही यश आले नसल्याचे स्पष्ट करत उलट त्याचा अल्प कालावधीसाठी का होईना देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे.

माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या एका उत्तरात रिझव्‍‌र्ह बँकेने केलेला हा दावा मोदी सरकारसाठी हा घरचा अहेर ठरू शकतो. रिझव्‍‌र्ह बँकेच्या नोटाबंदीबाबतच्या बैठकीतील चर्चेची माहिती देताना बँकेने अप्रत्यक्षरीत्या सरकारच्या उद्दिष्टालाच नाकबूल केले.

रिझव्‍‌र्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नोटाबंदीबाबत सरकारने केलेल्या विनंतीला अनुसरून झालेल्या चर्चेतील टिप्पणी माहिती अधिकाराच्या उत्तरात स्पष्ट झाली आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरचित्रवाणीवरून रात्री जाहीर केलेल्या नोटाबंदीपूर्वी रिझव्‍‌र्ह बँकेची याबाबतची बैठक तब्बल अडीच तास चालली होती.

विशेष म्हणजे पटेल यांच्यासह रिझव्‍‌र्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर व तत्कालीन केंद्रीय अर्थव्यवहार सचिव शक्तिकांत दास हे या बैठकीला उपस्थित होते. याशिवाय तत्कालीन वित्तीय सेवा सचिव अंजुली चिब दुग्गल, रिझव्‍‌र्ह बँकेचे तत्कालीन डेप्युटी गव्हर्नर आर. गांधी व एस. एस. मुंद्रा आदीही या बैठकीला उपस्थित होते.

गांधी व मुंद्रा हे आता रिझव्‍‌र्ह बँकेत नाहीत. तर दास हे सध्या गव्हर्नर आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते व्यंकटेश नायक यांनी रिझव्‍‌र्ह बँकेला नोटाबंदीबाबत केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात, नोटाबंदीचा विपरीत परिणाम चालू आर्थिक वर्षांच्या सकल राष्ट्रीय उत्पादनावर झाल्याचेही म्हटले आहे. अधिकतर काळा पैसा हा रोकड स्वरूपात नव्हे तर स्थावर मालमत्ता तसेच सोने रूपात होता, असेही स्पष्ट झाले आहे.

नोटाबंदीचे समर्थन करताना मात्र पंतप्रधानांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी काळ्या पैशावर नियंत्रणासाठी पाऊल, अशी प्रतिक्रिया दिली होती. तसेच दहशतवाद रोखण्यासाठीही नोटाबंदी अमलात आणली गेल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात येत होता. नोटाबंदीपर्यंत चलनात असलेल्या १५.४१ लाख कोटी रुपयांच्या बाद नोटांपैकी विहित मुदतीत केवळ १०,७२० कोटी रुपयांच्या नोटा परत येऊ शकल्या नाहीत, असे रिझव्‍‌र्ह बँकेने लगेच स्पष्ट केले होते.

मुभा असलेल्या ठिकाणच्या नोटांबाबत माहिती नाही!

रिझव्‍‌र्ह बँकेने एका अन्य उत्तरात पेट्रोल पंप, रुग्णालये आदी ठिकाणी जमा झालेल्या जुन्या ५०० व १,००० रुपयांच्या नोटांबाबत काहीच माहिती नसल्याचेही स्पष्ट केले आहे. नोटाबंदी लागू करताना जुन्या नोटा काही सेवेकरिता वापरण्यास काही कालावधीकरिता मुभा देण्यात आली होती. बाद नोटा बदलून घेण्याची प्रक्रिया २५ नोव्हेंबर २०१६ पर्यंत होती. तर जुन्या ५०० रुपयांच्या नोटांचा वापर १५ डिसेंबर २०१६ पर्यंतच करता येत होता. मुभा दिलेल्या ठिकाणीही बाद नोटांचा वापर २ डिसेंबर २०१६ पासून पूर्णपणे थांबविण्यात आला होता.