मागील लेखातून एकदा जोखीम घेण्याची क्षमता (रिस्क प्रोफाइल) निश्चित झाली तर मालमत्तेची विभागणी (अ‍ॅसेट अलोकेशन) वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांमध्ये कशा प्रकारे करणे योग्य राहील हे आपण पाहिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांमधील मालमत्तेची विभागणी म्हणजे काय? तर आपली जोखीम घेण्याची क्षमता आणि गुंतवणुकीतून मिळणारा मोबदला यातला समतोलपणा राखण्याचे हे एक धोरण आहे. जसे की शेअर्स, मुदत ठेवी, म्युच्युअल फंड, स्थावर मालमत्ता, सोने वगैरे पर्यायांमध्ये तुमची गुंतवणूक किती कमी-अधिक प्रमाणात असायला हवी याचा विचार केला जातो. यामध्ये कुठल्या ध्येयासाठी ही गुंतवणूक कशा प्रकारे करण्यात यावी याचे योग्य संतुलन हे जोखीम घेण्याच्या क्षमतेवरून व ध्येय गाठण्यासाठी लागणाऱ्या कालावधीवरून निश्चित करता येते.

मालमत्ता विभागणी करण्याचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे वर दिलेले गुंतवणूक पर्याय हे वेगवेगळ्या वेळेत कमी-अधिक मोबदला देऊन जातात. सर्वच गुंतवणूक पर्याय हे एकाच वेळेस चांगले किंवा वाईट मोबदला देऊ  शकत नाहीत. जसे की कधी शेअर बाजाराचा निर्देशांक वर जाईल, कधी स्थावर मालमत्तेचे दर वाढतील तर कधी सोन्याच्या भावामध्ये चढ-उतार होतील. शिवाय हे सर्व गुंतवणूक पर्याय भविष्यात कसे काम करतील याची शाश्वती नाही. कशात कमी मोबदला मिळेल तर कशात अधिक याचा काहीच अंदाज आपण बांधू शकणार नाही. इंग्रजीत याला एक साजेशी म्हण आहे –  त्यामुळे गुंतवणूक पर्यायांची योग्य सरमिसळ असणे केव्हाही चांगले. अर्थनियोजकाच्या सल्ल्यानुसार तुम्ही आपल्या पोर्टफोलिओचा समतोल साधू शकता व तोही आपल्या जोखीम क्षमतेप्रमाणे.

सोबत दिलेल्या तक्त्यामध्ये गुंतवणुकीच्या पर्यायांचे वर्गीकरण हे त्याच्या अंगिभूत गुणधर्माप्रमाणे केलेले आहे.

तक्त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे तुमची गुंतवणूक ही वेगवेगळ्या मालमत्ता पर्यायांमध्ये केली गेली पाहिजे. तत्पूर्वी त्यांचे मूलभूत गुणधर्म लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. दिलेल्या गुंतवणूक पर्यायांमधील अजून काही महत्त्वाच्या बाबी म्हणजे हे गुंतवणूक पर्याय वेगवेगळ्या जोखीम प्रकारात मोडणारे आहेतच, शिवाय त्यामध्ये केलेल्या गुंतवणुकीतून येणारा मोबदला व त्यांचा कालावधीही वेगवेगळा आहे. तसेच गुंतवणुकीतून येणाऱ्या मोबदल्यावर लागणारा करही वेगवेगळा आहे. त्यामुळे प्रत्येक गुंतवणुकीचा पर्याय निवडताना, ध्येय गाठण्यासाठी लागणारा कालावधी किती आहे, गुंतवणुकीतील जोखीम तसेच करसंरचना कशी आहे, हे पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरते.

वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांमध्ये मालमत्ता विभागणी एकदाच करून सोडून देणे योग्य नाही, तर तिचा नियमित पाठपुरावाही जरुरीचा आहे. याचे कारण असे की, निवडलेल्या गुंतवणूक पर्यायांपैकी एखादा पर्याय हा जास्त परतावा देऊन गेला तर त्याचे एकूण गुंतवणुकीतील मूल्यांकन वाढते व पुन्हा समतोल साधण्याची (पोर्टफोलियो रिबॅलेन्सिंग) आवश्यकता निर्माण होते.

लक्षात ठेवा विजयी क्रिकेट संघात फक्त चांगले गोलंदाज किंवा फक्त चांगले फलंदाज असून चालत नाही. तर गोलंदाजांमध्ये काही जलदगती गोलंदाजी करणारे, काही फिरकी गोलंदाजी करणारे अशी विविधता असावी लागते. तसेच फलंदाजीचेसुद्धा कोणी उजव्या हाताने खेळणारे, संथ, संयमित बाजू लावून धरणारे, तर कोणी डावखुरे आणि दे-मार फलंदाज असावे लागतात. एवढेच नाही तर चांगले क्षेत्ररक्षक, यष्टिरक्षक, काही अष्टपैलू खेळाडूही असावे लागतात. याचप्रमाणे जर तुमच्या गुंतवणुकीचा डाव तुम्हाला जिंकायचा असेल तर अशाच वैविध्यपूर्ण गुंतवणूक पर्यायांचा संघ तुमच्या पोर्टफोलिओत असायला हवा. आर्थिक नियोजकाच्या सल्ल्याने तुम्ही असा पोर्टफोलिओ तयार करू शकता, तो तुम्हाला योग्य त्यावेळी गुंतवणूक संतुलन साधण्यास मदतकारक ठरू शकेल.

अशा प्रकारे ध्येय ठरवणे, वित्तप्रवाह विश्लेषण, जोखीम क्षमतेचे विश्लेषण व शेवटी गुंतवणूक पर्यायाची निवड इथपर्यंत अर्थ नियोजनाचा एक टप्पा पूर्ण होतो. यानंतर पुढील टप्प्यात आपण जोखीम नियोजन (रिस्क प्लॅनिंग) समजून घेऊ.

kiranhake@fingenie.co.in

लेखक हे ‘सीएफपी’ पात्रताधारक अर्थ नियोजनकार आणि ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.

Web Title: Financial planning
First published on: 09-05-2016 at 01:22 IST