|| तृप्ती राणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकेरी पालकत्व हा निर्णय कधी कधी स्वतचा असतो किंवा नियती अशा परिस्थितीत आणून ठेवते. कारण कोणतेही असो, परंतु इतर कुटुंबांच्या तुलनेत एकेरी पालकांची विशेषकरून स्त्री पालकांसाठी आर्थिक आव्हानं जरा जास्त कठीण असतात..

संसार म्हटला की दोन चाकांची गाडी, नवरा-बायको म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू, घर एकाने पसरवलं तर दुसऱ्याने आवरायचं, आपल्याकडे अशा प्रकारच्या म्हणी, वाक्प्रचार जुन्या काळापासून प्रचलित आहेत. त्यामुळे चौकोनी आणि कालांतराने त्रिकोणी कुटुंब म्हणजे परिपूर्ण कुटुंब असं समीकरण ठाम होतं. आई आणि वडील हे या कुटुंबाचे दोन मजबूत खांब. परंतु गेली काही वर्षं आपण आपल्या आजूबाजूला एकेरी पालक पाहतोय आणि ही संख्या चांगल्याच वेगाने वाढतेय. अशा  एकेरी पालकांसाठी, त्यातही विशेषकरून स्त्री पालकांसाठी, आपलं करियर आणि कुटुंब दोन्ही सांभाळणं ही तर जणू तारेवरची कसरतच! त्यामध्ये जर आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर ठीक, नाही तर सगळंच अवघड होऊन जातं. एकेरी पालकत्व हा निर्णय कधी कधी स्वतचा असतो किंवा नियती अशा परिस्थितीत आणून ठेवते. कारण कोणतेही असो, परंतु इतर कुटुंबांच्या तुलनेत एकेरी पालकांची आर्थिक आव्हानं जरा जास्त कठीण असतात. त्यामुळे अशा पालकांनी जमेल तितकं लवकर आपलं आर्थिक नियोजन करून आपल्या कुटुंबाचं भविष्य स्थिरस्थावर करून घ्यावं.

सर्वसाधारणपणे आई आणि वडील मिळून जेव्हा कुटुंबाचं आर्थिक नियोजन करतात तेव्हा काही जबाबदाऱ्या आई तर काही वडील सांभाळतात. त्यात दोघेही कमावते असले तर कुटुंबाचा आर्थिक भार झेलणं प्रत्येक पालकाला थोडं सोयीचं होतं. आजच्या तणावपूर्ण, अस्थिर आणि चढाओढीच्या युगात तर मानसिक व भावनिक आधारासाठीसुद्धा जोडीदाराची साथ अजूनच गरजेची झाली आहे. त्यात मुलांच्या संगोपनात येणारी आव्हाने तर दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीची होत आहेत. हे सगळं जेव्हा एकेरी पालकाला आणि विशेषकरून स्त्री पालकाला एकटय़ाने झेलायची वेळ येते तेव्हा शिस्तबद्ध नियोजन हाच त्यावर उपाय आहे असे मला वाटते. अशा पालकांकडे फॉल-बॅक पर्याय खूप कमी असल्यामुळे त्यांना सदैव पुढची आव्हाने ओळखून तत्पर राहणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी या पालकांनी खालील प्रश्न स्वतला विचारावेत:

  • माझ्याकडे माझ्या स्वतसाठी आणि माझ्या मुलांसाठी व्यवस्थित पैसा आहे का?
  • उद्या माझी नोकरी गेली तर नवीन नोकरी मिळेपर्यंत माझा व कुटुंबाचा नियमित खर्च मी सांभाळू शकेन का?
  • मला जर एखादा असा आजार झाला की त्यामुळे मला नोकरी करणं अशक्य होईल त्यावेळी माझ्या कुटुंबाचा आर्थिक गाडा सांभाळला जाईल का?
  • मी जर काही कारणवश कोणतेही व्यवहार करण्यात अक्षम झालो/झाले आणि माझी मुलं लहान असतील, तर मग माझ्यावतीने व्यवहार कोण करेल?
  • माझ्या पश्चात माझ्या मुलांची पुढची सोय कशी होणार?
  • पुढे जाऊन जर मी लग्न/ पुन्हा लग्न केलं तर माझ्या मुलांचा संपत्तीतील अधिकार कसा अबाधित ठेवू शकेन?

आर्थिक नियोजनाची सुरुवात करताना आपल्याला वरील प्रश्नांची उत्तरं शोधून त्यानुसार पुढच्या तयारीला लागायचं आहे. या उत्तरांमध्ये जितकी स्पष्टता जास्त तितकं आपलं नियोजन मजबूत होईल. आर्थिक नियोजनाचे सगळे नियम हे एकेरी पालकाला जास्त चिकाटीने आणि संयमाने पाळावे लागतात. तेव्हा खाली नमूद केलेले दिशानिर्देश समजून घ्या:

  1. आर्थिक आराखडा तयार करा – तुमच्याकडे किती आणि कोणती मालमत्ता आहे याचा एक तक्ता बनवा. त्यात तुमच्या नियमित कमाई व खर्चाचा अर्थसंकल्प मांडा. तुमचा मुदत विमा, अपघात विमा, गंभीर आजार विमा आणि आरोग्य विमा गरजेनुसार ठेवा. भविष्यात होणाऱ्या मोठय़ाा खर्चाची यादी काढा आणि त्यावर महागाईचा आढावा घ्या. तुमचा जर घटस्फोट झाला असेल आणि नियमित कमाई नसेल तर पोटगीच्या रकमेतून खर्च कसे भागणार आहेत हे व्यवस्थित समजून घ्या. पसे कसे, किती आणि कधी मिळणार आणि खर्च किती, कशासाठी आणि कधी होणार याचं समीकरण लवकरात लवकर जुळवून घ्या. कर्ज घेताना आपली खरी गरज ओळखा. चनीसाठी कर्ज घेऊ नका.
  2. नियमित आढावा घ्या – पैशाची गुंतवणूक करताना आर्थिक ध्येय, जोखीम, रोकडसुलभता, कर आणि गुंतवणूक काळ नीट तपासा व त्याचा वेळोवेळी आढावा घ्या. तसेच, मागील अर्थसंकल्प आणि त्याच्यासमोर आपली वास्तविक कमाई आणि खर्च यांचे विश्लेषण करा. कुठे काही कमी पडले असेल तर पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये अनुरूप बदल करा. सर्वात महत्त्वाचे, तुमच्या सगळ्या गुंतवणुकींची अद्ययावत माहिती एखाद्या विश्वासू व्यक्तीकडे असू द्या.
  3. ‘नाही’ म्हणायला शिका – सर्वसाधारणपणे असं दिसतं की,एकेरी पालक आपल्या मुलांचे लाड जरा जास्त करतात. यामागे कदाचित आपण कमी पडू नये ही भावना असेल. परंतु त्याचा तुमच्या आर्थिक भविष्यावर कदाचित नकारात्मक परिणाम होऊ शकेल. म्हणून आपल्या मुलाला किंवा मुलांना वेळोवेळी आपल्या आर्थिक परिस्थितीची जाणीव करून देणं हे खूप महत्त्वाचं आहे. मुलांच्या सगळ्या गरजा नेहमीच विकतच्या वस्तूंनी भागू शकत नाही हे या पालकांनी आधी स्वतला आणि नंतर मुलाला/मुलांना समजावणं आहे. त्यांना नियम आणि मर्यादेच्या चौकटीची जाणीव करून द्या. क्रेडिट कार्ड आणि मासिक हफ्त्यांवर होणाऱ्या खरेदीपासून स्वतला आणि मुलांना लांब ठेवा. मुलांना अर्थसाक्षर करा.
  4. अनपेक्षित गोष्टींसाठी सज्ज राहा – एकेरी पालक म्हणजे विमानाचा एकटा पायलट. त्याच्या एकटय़ाच्या खांद्यांवर कुटुंबाचं भवितव्य! म्हणून अशा पालकांना आर्थिक नियोजन करताना स्वतचा मजबूत ‘इमर्जन्सी फंड’ हा ठेवावाच लागतो. हा फंड इतर नियमित खर्चासाठी नसून फक्त अनपेक्षित खर्चाची सोय करण्यासाठी आहे. शिवाय जर कधी काही कारणवश नोकरी गेली, तर पुढील १० महिन्यांचे खर्च निभावतील इतका पैसा या फंडामध्ये असला पाहिजे.
  5. स्वतची निवृत्तीनंतरची सोय करा – कुठलाही पालक पहिल्या आपल्या मुलाच्या गरजा बघतो आणि मग आपल्या. परंतु असं करताना कुठे आपलं निवृत्ती नियोजन तर चुकत नाही ना हेही पाहा. मुलांच्या उच्च शिक्षणाचा खर्च करताना शिष्यवृत्ती आणि कर्ज हे पर्याय आहेत. परंतु निवृत्ती फंड जर कमी पडला तर अशी कोणतीही सोय करता येत नाही. म्हणून पहिलं प्राधान्य निवृत्ती निधीला आणि मग इतर गरजांना.
  6. इच्छापत्र हे हवंच – एकेरी पालकासाठी इच्छापत्र हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला काही झालं तर तुमच्या मुलांना आर्थिक मनस्ताप होऊ नये यासाठी ही तरतूद योग्य वेळी करा. या इच्छापत्रामध्ये तुमच्यापश्चात कोणत्या पद्धतीने तुमच्या संपत्तीतून तुमच्या मुलांचे खर्च निभावले जातील, संपत्तीचं विभाजन केलं जाईल व कोण ही सोय बघेल हे नमूद करा. इच्छापत्र जर नसेल तर तुमच्या मुलांना कदाचित तुमच्या संपत्तीचा परिपूर्ण उपभोग घेतं येणं अशक्य होईल. तेव्हा वारसाहक्काचा कायदा समजून घ्या. तुम्ही जर काही कारणामुळे आर्थिक व्यवहार करण्यात अक्षम झालात तर मुखत्यारपत्र कुणाच्या नावे असेल व त्यामध्ये कोणते अधिकार असतील हे ठरवणे महत्त्वाचे आहे. तुमच्या प्रत्येक गुंतवणुकीमध्ये नामनिर्देशन आहे का हेही तपासा.
  7. माहिती मिळवा – एक चांगला आर्थिक आराखडा बनवायला आणि नंतर व्यवस्थित सांभाळायला तुम्हाला स्वतला त्याबाबत सजग असणं अनिवार्य आहे. तेव्हा तुमची आर्थिक साक्षरता वाढवा. फक्त सल्ल्यावर आणि त्यात करून फुकटच्या सल्ल्यावर आंधळा विश्वास न ठेवता सगळे व्यवहार समजून मग निर्णय घ्यायला शिका.

पालक असणं हे स्वतच एक आव्हान आहे, त्यात एकटय़ाने ही जबाबदारी घेणं हे त्याहूनही मोठं आव्हान आहे. सगळ्या बाजूंनी एकटा लढा देणाऱ्या अशा पालकांना मी हाच सल्ला की, तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आर्थिक समाधान जर अनुभवायचं असेल तर आजच नियोजनासाठी पाऊल उचला.

trupti_vrane@yahoo.com

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार)

सूचना  

  • जोखीम क्षमता तपासून, सल्लागाराची मदत घेऊन आणि संपूर्ण माहिती मिळवून मग गुंतवणूक करा. तुमच्या फायद्याची किंवा तोटय़ाची जबाबदारी ही तुमचीच असेल.
  • या सदरात गुंतवणुकीसाठी वापरलेले म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे उदाहरण म्हणून आहेत. कोणत्याही म्युच्युअल फंडाची किंवा शेअरची शिफारस इथे केली जात नाहीये.
  • सर्व नमूद म्युच्युअल फंड रेग्युलर ग्रोथ प्लानचे असून, यातील काही म्युच्युअल फंड आणि शेअर्स हे माझ्याकडे असतील किंवा घेतले/विकले जातील; परंतु त्यांचा या सदरातील पोर्टफोलिओंच्या कामगिरीशी काहीही संबंध नाही.
  • म्युच्युअल फंडांचे एक्झिट लोड, शेअर खरेदी/विक्रीवर होणारा खर्च आणि कर यांचा विचार या सदरात केलेला नाही. कोणतीही गुंतवणूक करताना या खर्चाचा आणि कर नियमांचा आढावा घ्या.
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Financial planning
First published on: 18-03-2019 at 00:06 IST