scorecardresearch

‘अर्था’मागील अर्थभान : प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (फिफो)

सध्या बारकोडिंगसारख्या अत्याधुनिक पद्धतीमुळे कंपन्यांना प्रथम येणाऱ्या मालाची नोंद ठेवणे सहज शक्य बनले आहे.

डॉ. आशीष थत्ते ashishpthatte@gmail.com

प्रथम येणाऱ्याला प्राधान्य दिले जाते हे आपण बऱ्याच ठिकाणी बघतो. तसे यात काही विशेष असेल असे वाटत नाही. ‘फिफो’ (फस्र्ट इन, फस्र्ट आऊट) ही जरी लेखा पद्धत असली तरी प्रत्यक्षातदेखील कंपन्या आपल्या कच्चा किंवा पक्का माल आणि त्यांचा वापर ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या आधारावरच करतात. यामुळे अर्थातच जुना माल टाकाऊ किंवा अप्रचलित होण्यापासून वाचविला जातो. रसायने किंवा मोठय़ा प्रमाणात जेथे उलाढाल होते तेथे व जुन्या-नव्या खरेदीची सरमिसळ होते तेथे ‘फिफो’ ही लेखा पद्धत म्हणूनच वापरली जाते.

सध्या बारकोडिंगसारख्या अत्याधुनिक पद्धतीमुळे कंपन्यांना प्रथम येणाऱ्या मालाची नोंद ठेवणे सहज शक्य बनले आहे. म्हणजे लेखा पद्धतीत व प्रत्यक्ष वाटप असे दोन्हींमध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाते. जेव्हा चलनवाढ सतत चालू असते तेव्हा जुन्या कच्च्या मालाचे दर नवीन बनवलेल्या पक्क्या मालाच्या विक्री भावाला लावले जातात आणि नफा कमावला व दाखवलासुद्धा जातो. पक्का माल बनल्यानंतरसुद्धा जो पहिला बनवला जातो तो आधी विक्रीला पाठवला जातो. नाशवंत वस्तूंच्या बाबतीत हे प्राधान्याने दिसते. लेखा पद्धतीत प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य किंवा सरासरीने पद्धतीने कच्च्या/ पक्क्या साठय़ाचे मूल्यांकन केले जाते. इतर पद्धती सध्या उद्योगधंद्यांमध्ये प्रचलित नाहीत. कंपनीचा ताळेबंद मांडताना या मूल्यांकनावर नफादेखील अवलंबून असतो.

घरात आपण औपचारिक मूल्यांकन करत नाही किंवा ताळेबंदही मांडत नाही; पण पहिले विकत घेतलेले किंवा बनवलेले पदार्थ पहिले वापरण्याला प्राधान्य देतो. वर सांगितल्याप्रमाणे नाशवंत वस्तू नक्कीच जसे दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ. समाजमाध्यमांमध्ये फिरणाऱ्या संदेशाप्रमाणे कढीपत्ता पहिले वापरला जातो आणि पदार्थ बनवून झाल्यानंतर पहिले बाहेर काढला जातो! ज्या वस्तूंना कालबाह्यतेची तारीख असते त्यांना पहिले वापरण्यात पर्याय नसतो; पण फळे, भाज्या दोन वेगळय़ा दिवसांना आणल्या असतील तर निर्णय थोडासा कठीण होऊ शकतो. चिरलेली भाजी, मोड आलेले कडधान्य, शिजवलेले मांस, सील उघडलेले पदार्थ यांना निश्चितच पहिले प्राधान्य मिळते.

चित्रपटात दाखविल्याप्रमाणे किंवा पूर्वी कुटुंबातही प्रथम जन्मलेल्यांना विवाहातही प्राधान्य मिळायचे. थोडक्यात काय, तर नियम म्हणून पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य दिले पाहिजे; पण खरी मजा ही नियम पाळण्यात नाही तर मोडण्यात किंवा त्याचे अपवाद करण्यास असते. अर्थात उद्योगात नाही; पण घरात नक्की. त्याविषयी पुढील लेखात बघू या.

* लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत /

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: First in first out method fifo zws

ताज्या बातम्या