करावे कर-समाधान : सोन्यातील गुंतवणूक आणि प्राप्तिकर कायदा

सोन्यातील गुंतवणूक खालील प्रकारांत करता येते, या प्रत्येक प्रकारामध्ये धोके, फायदे, तोटे आहेत.

प्रवीण देशपांडे pravin3966@rediffmail.com

सोने, चांदी, हिरे, दागिने वगैरेमध्ये गुंतवणुकीची परंपरा प्राचीन काळापासून भारतात अस्तित्वात आहे. दागिन्यांचा साज हा घराण्याच्या श्रीमंतीचे प्रतीक ठरत असे. आज लग्न वगैरे कार्यात दागिने घालून मिरविणे हे समृद्धीचे लक्षण मानले जाते. काळानुसार गुंतवणुकीच्या पद्धती आणि साधने बदलत गेली. सोने हे मूर्त स्वरूपात बाळगणे धोक्याचेदेखील आहे. त्यामुळे सोन्यामधील गुंतवणूक ही फक्त दागिन्यांच्या स्वरूपात न करता सोन्याच्या इतर प्रकारांत करण्याकडे कल वाढत आहे. या लेखात सोन्याच्या विविध प्रकारच्या गुंतवणुकीच्या विक्रीवर होणाऱ्या भांडवली नफ्यावर प्राप्तिकर कसा आकारला जातो याविषयी माहिती बघू या :

सोन्यातील गुंतवणूक खालील प्रकारांत करता येते, या प्रत्येक प्रकारामध्ये धोके, फायदे, तोटे आहेत. त्याच्या विक्रीवर होणाऱ्या भांडवली नफ्यावरील करदायित्व काही प्रकारांमध्ये वेगळे आहे :

मूर्त स्वरूपातील सोने : सोने हे दागिने किंवा चिपच्या स्वरूपात खरेदी केले जाते. सोने खरेदी करताना ते ज्या व्यक्तीकडून खरेदी केले आहे त्याचे बिल घेणे गरजेचे आहे. यामुळे विक्री करताना यावर किती भांडवली नफा झाला हे गणणे सोपे जाते. शिवाय प्राप्तिकर खात्याकडून सोने खरेदी केल्याचा स्रोत विचारला जाऊ  शकतो. विवाहित स्त्रीकडून ५०० ग्रॅम, अविवाहित स्त्रीकडून २५० ग्रॅम आणि पुरुषाकडून १०० ग्रॅम या प्रमाणापर्यंत सोने प्राप्तिकर खात्याकडून जप्त केले जाणार नाही, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने स्पष्ट केले आहे. करदात्याकडे सोने खरेदी केल्याचा किंवा वारसा हक्काने मिळाल्याचा पुरावा असेल आणि त्याचा स्रोत स्पष्ट करू शकत असेल तर सोने धारण करणाऱ्याला काही मर्यादा नाही. बऱ्याच जणांकडे वडिलोपार्जित सोन्याचे दागिने असतात. हे दागिने कधी खरेदी केले, किती रुपयांना खरेदी केले याविषयी माहिती नसते. असे सोने विकले तर त्यावर कर कसा भरावा, असा प्रश्न करदात्याला पडतो.

सोने खरेदी केल्या तारखेपासून ३६ महिन्यांनंतर विकले तर ती संपत्ती दीर्घ  मुदतीची होते अन्यथा ती अल्प मुदतीची असते. दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर २० टक्के इतका कर (अधिक ४ टक्के शैक्षणिक कर) भरावा लागतो आणि अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर करदात्याच्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागतो. सोने १ एप्रिल २००१ पूर्वी खरेदी केले असेल तर भांडवली नफा गणताना १ एप्रिल २००१ रोजीचे वाजवी बाजार मूल्य विचारात घ्यावे. या मूल्यावर महागाई निर्देशांकाचा फायदादेखील घेता येतो. सोने १ एप्रिल २००१ नंतर खरेदी केले असेल तर प्रत्यक्ष खरेदी मूल्य विचारात घेऊन महागाई निर्देशांकानुसारच्या मूल्याप्रमाणे भांडवली नफा गणावा. 

करदात्याने सोन्यामध्ये गुंतवणूक करताना त्याचा उद्देश विचारात घेऊन गुंतवणूक करावी आणि गरज पडल्यास गुंतवणूक सल्लागाराचीदेखील मदत घ्यावी.

वाचकांकडून आलेल्या प्रश्नांचे निरसन..

* प्रश्न : मला माझ्या वडिलांकडून वारसाहक्काने काही सोने मिळाले. हे सोने मी मागील महिन्यात विकले. या विक्रीवर मला कर भरावा लागेल का?    सुधा चव्हाण

उत्तर : वारसाहक्काने मिळालेले सोने, वडिलांनी १ एप्रिल २००१ पूर्वी खरेदी केले असेल तर भांडवली नफा गणताना १ एप्रिल २००१ रोजीचे वाजवी बाजार मूल्य विचारात घ्यावे. या मूल्यावर महागाई निर्देशांकाचा फायदादेखील घेता येतो. वडिलांनी सोने १ एप्रिल २००१ नंतर खरेदी केले असेल तर प्रत्यक्ष खरेदी मूल्य विचारात घेऊन महागाई निर्देशांकानुसारच्या मूल्याप्रमाणे भांडवली नफा गणावा लागेल. वडिलांनी सोने मागील तीन वर्षांत घेतले असेल तर संपत्ती अल्प मुदतीची होईल आणि त्यावर महागाई निर्देशांकाचा फायदा मिळणार नाही. नफा दीर्घ मुदतीचा असेल तर २०% (अधिक ४% शैक्षणिक कर) आणि अल्प मुदतीचा असेल तर उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे कर भरावा लागेल.    

*प्रश्न : मी माझे एक घर २.५० कोटी रुपयांना विकले. या घरावर मला १.५० कोटी रुपयाचा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा झाला. मी दोन स्वतंत्र घरे घेण्याचा विचार करीत आहे. मला दोन्ही घरांच्या गुंतवणुकीची वजावट घेता येईल का? एक वाचक

उत्तर : मागील वर्षांपासून दोन घरांमधील गुंतवणूक ‘कलम ५४’मध्ये ग्राह्य़ धरली जाते. याला अट अशी आहे की घराच्या विक्रीवरील दीर्घ मुदतीचा भांडवली नफा २ कोटी रुपयांपेक्षा कमी असला पाहिजे. आपल्या बाबतीत तो १.५० कोटी रुपये असल्यामुळे आपल्याला कलम ५४ नुसार दोन घरांत गुंतवणूक करता येईल. ही वजावट जीवनकाळात एकदाच घेता येते.

* प्रश्न : माझी मुलगी एका कंपनीत नोकरी करते. मी माझ्या मुलीच्या वैद्यकीय विम्याचा (मेडिक्लेम) हप्ता या वर्षी भरला. मला या विम्याच्या हप्त्याची वजावट घेता येईल का?  प्रकाश वैद्य

उत्तर : आपली मुलगी आपल्यावर अवलंबून नसल्यामुळे आपल्याला या विमा हप्त्याची वजावट घेता येणार नाही.

गोल्ड ईटीएफ

यामध्ये गुंतवणूकदार स्वत: प्रत्यक्ष सोने खरेदी न करता म्युच्युअल फंडरूपात सोने खरेदी करतो. एक्स्चेंज ट्रेडेड फंड –  ईटीएफच्या काही फंडांनी एका युनिटची किंमत ०.०१ ग्रॅमनुसार ठेवली आहे. त्यामुळे यात ५० रुपयांपासून गुंतवणूक करता येते. या ईटीएफच्या युनिट्सची किंमत सोन्याच्या किमतीप्रमाणे ठरविली जाते. त्यामुळे सोन्याचे दर वाढले तर मूर्त स्वरूपातील सोन्यासारखे या फंडातील युनिट्सची किंमतपण वाढते. या फंडातील युनिट्सची शेअर बाजारात खरेदी-विक्री करता येते. या फंडातील सोन्याची गुंतवणूक ९९५ शुद्धतेचे असते. सोन्याच्या मूर्त स्वरूपातील गुंतवणुकीच्या भांडवली नफ्यावर ज्याप्रमाणे कर भरावा लागतो. त्याचप्रमाणे सोने  ईटीएफच्या युनिट्सच्या विक्रीवर झालेल्या भांडवली नफ्यावर भरावा लागतो.     

डिजिटल सोने

डिजिटल सोने हे ऑनलाइन ई-वॉलेट किंवा अ‍ॅपद्वारे परवानाधारक डिजिटल सोने विक्रेत्याकडून विकले जाते. यामध्ये किमान गुंतवणुकीची मर्यादा नाही. एक रुपयासुद्धा गुंतवणूक करता येते. मूर्त स्वरूपातील सोने/दागिने खरेदी करताना घडणावळीचा खर्च, बाळगण्याचा धोका या डिजिटल सोन्यामध्ये नाही. डिजिटल सोने खरेदीदारातर्फे तिजोरीत ठेवले जाते. हे ऑनलाइन असल्यामुळे याच्या खरेदी-विक्रीला वेळेचे बंधन नाही. याच्या विक्रीवर होणाऱ्या भांडवली नफ्यावरदेखील मूर्त स्वरूपातील सोन्याप्रमाणे कर भरावा लागतो.

सार्वभौम सुवर्ण रोखे (जीएसबी)

हे बाँड सरकारतर्फे जारी केले जातात. याचे खरेदी आणि विक्री मूल्य सोन्याच्या मूल्याशी निगडित असते. हे बाँड आठ वर्षांसाठी असतात. पाच वर्षांनंतर ते शेअर बाजारात विकले जातात. हे शेअर बाजारातूनसुद्धा खरेदी करता येतात. या बाँडवर २.५ टक्के इतके वार्षिक व्याजदेखील मिळते त्यावर उद्गम कर कापला जात नाही;परंतु हे व्याज करपात्र आहे. मुदतीनंतर त्या वेळी असणाऱ्या सोन्याच्या किमतीनुसार बाँड रिडीम केले जातात. त्यामुळे सोन्याचे भाव वाढल्यास त्याचा फायदा गुंतवणूकदाराला मिळतो आणि मुदतीनंतर बाँड रिडीम केल्यास त्यावर होणारा भांडवली नफा हा करमुक्त आहे. गुंतवणूकदाराने पाच वर्षांनंतर, मुदतीपूर्वी याची विक्री केल्यास मात्र त्यावर होणारा भांडवली नफा हा करपात्र आहे आणि त्यावर होणाऱ्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर २० टक्के इतका कर (अधिक ४ टक्के शैक्षणिक कर) भरावा लागतो.  

लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gold investment and income tax act zws

ताज्या बातम्या