नव्या सरकारचे गुंतवणुकीवर, प्रामुख्याने भांडवली बाजारावरील सुपरिणाम सुस्पष्टच आहेत, पण सोन्याच्या झळाळीसाठी ‘मोदी इफेक्ट’ कामी येईल काय? १६ मेच्या निकालापर्यंतच्या सप्ताहभरात, केंद्रात स्थिर सरकारच्या अपेक्षेने ‘सेन्सेक्स’ने ४.९ टक्क्य़ांनी झेप घेतली, तर सोने जेमतेम ०.२ टक्के लकाकले. परंतु सोने मूळातच एक आयातीत जिन्नस असल्याने, देशापेक्षा जागतिक अर्थव्यवस्था आणि भू-राजकीय घडामोडीतून त्याच्या किमतीतील चढ-उतार ठरत असतात. युरोप व अमेरिका मंदीच्या फेऱ्यातून बाहेर येत आहेत. जागतिक आíथक परिस्थिती सुधारल्यावर ‘स्थिर चलन’ म्हणून असलेली सोन्याची मागणी कमी होईल. तसेच नवीन सरकार स्थापनेनंतर भारतात महागाई कमी झाल्यास सोन्याच्या किमती वर जाण्यास कारण उरणार नाही, असे सांगणारे हे विश्लेषण..
भारतीय लोक सोने हा दुर्मीळ धातू म्हणून गुंतवणुकीचे साधन न समजता, दागिन्यांच्या स्वरूपात गरज म्हणून खरेदी करतात. सोन्याचे प्रेम इतके आपल्या रक्तात भिनले आहे की, अन्न, वस्त्र, निवारा यानंतर सोन्याचा दागिना येतो. वैदिक वाङ्मयापासून आजपर्यंत पाहिल्यास एखाद्या चांगल्या गोष्टीला आपण सोन्याची उपमा देतो.
अडचणीच्या वेळेला काम येईल म्हणून सोने (दागिने) खरेदी होते. परंतु आता अडचणी इतक्या मोठय़ा झाल्या आहेत की सोने विकून त्या भागतीलच असे नाही. तसेच, आता मध्यमवर्गीय सोने विकून गरज भागविण्याच्या वरच्या पट्टीत गेले आहेत. म्हणजे एखादा दागिना मोडून दुसरा करावा असे पत्नीने सुचवले तर नवरा सांगतो, ‘‘मोडून कशाला? आपण नवीनच करू या.’’
सोने हे गुंतवणुकीचे साधन म्हणून बघण्याचा दृष्टिकोन श्रीमंत लोकांत जास्त होता. याचे मुख्य कारण काळा पसा जमा करून ठेवण्यासाठी. म्हणजे रु. ३,००,००० रोख सांभाळण्यापेक्षा एक शंभर ग्रॅमचे बिस्कीट सांभाळणे खूप सोपे. नोटा खराब होतात त्याचे मूल्य वाढत नाही तर सोन्याचे वाढू शकते व धातू खराब होत नाही. याला श्रीमंत देवस्थानेही अपवाद नाहीत.
सोने डिमॅट स्वरूपात आणि त्याआधी म्युच्युअल फंडाच्या युनिट्समध्ये मिळायला लागल्यावर सर्वसामान्य मध्यमवर्गीय याकडे गुंतवणूक म्हणून पाहू लागले. गुंतवणूक म्हटली की योग्य वेळी विकणे महत्त्वाचे नाहीतर नफा कागदावरच उडून जायचा. इंग्रजीत एक वाक्प्रचार आहे, what wise do in the beginning, fools do in the end. म्हणजे हुशार माणसे जे निर्णय सुरुवातीस घेतात, तेच निर्णय सर्वसामान्य शेवटी शेवटी घेतात.
मित्रहो, सोन्यातील सट्टा संपला आहे. तेजी निघून गेली आहे. याच्यापुढे सोन्यासारखे सोने गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देणार नाही. मोठे गुंतवणूकदार यातून नफा कमावून बाहेर पडले आहेत, पण आपण डिमॅट स्टेटमेंट कवटाळून बसलो आहोत का?
सोन्याच्या किमती महागाई व डॉलरच्या किमतीवर अवलंबून असतात. मागील काही वष्रे महागाईचा भडका उडाला होता. डॉलरच्या किमती वर जात होत्या. स्वाभाविकत: सोने वर जात होते. २०१२ नंतर अमेरिकेत सोन्याच्या किमती उतरू लागल्या आहेत. एका आउंसला (अंदाजे ३१.२ ग्रॅम) १७०० डॉलरवरून १२५० डॉलपर्यंत खाली आल्या आहेत. याच काळात रुपयाचे अवमूल्यन झाल्याने, त्या प्रमाणात भारतात सोन्याची किंमत कमी झाली नाही.
स्वातंत्र्यपूर्व काळात १९४६ साली १० ग्रॅम सोन्याची किंमत रु. ८३.८७ होती. ही वाढत जाऊन १९६२ साली (चीन युद्धकाळात) रु. ११९.७५ झाली व पुन्हा १९६६ मध्ये रु. ८३.७५ वर उतरली. म्हणजे २० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत नफा (परतावा) शून्य. तसेच १९९१-९२ मध्ये १० ग्रॅमची किंमत रु. ४,२९८/- होती ती वाढून १९९६-९७ मध्ये रु. ५,०७१/- झाली व पुन्हा २००१-२००२ मध्ये रु. ४,५७९/- पर्यंत खाली आली. म्हणजे १० वर्षांसाठी एकूण फायदा फक्त ६.५% मित्रहो, हीच परिस्थिती पुन्हा २०१२ पासून दहा वर्षांसाठी येऊ शकते.
युरोप व अमेरिका मंदीच्या फेऱ्यातून बाहेर येत आहेत. जागतिक आíथक परिस्थिती सुधारल्यावर ‘स्थिर चलन’ म्हणून असलेली सोन्याची मागणी कमी होईल. तसेच नवीन सरकार स्थापनेनंतर भारतात महागाई कमी झाल्यास सोन्याच्या किमती वर जाण्यास कारण उरणार नाही.
वॉरेन बफे यांनी फेब्रुवारी २०१२च्या फॉच्र्युन नियतकालिकात एक लेख लिहिला होता. शेअर्स गुंतवणुकीचे महत्त्व सांगताना ते म्हणतात, ‘‘परग्रहांवर मानवसदृश समाज अस्तित्वात असेल, तर पृथ्वीवरील मानवाच्या अजब तर्काकडे पाहून, डोके खाजवून म्हणेल की, काय ही माणसे आफ्रिका आणि इतर देशांत या धातूसाठी खोदकाम करतात, काही लोक यावर व्यवसाय करतात आणि आशिया खंडातील काही लोक हे खरेदी करून साठवून ठेवतात, ज्याचे मूल्य अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ‘शून्य’ आहे.’’ २०१२ पूर्वी मोठी तेजी सोन्यामध्ये दिसून आली असूनसुद्धा वॉरेन बफे असे म्हणतात.
१९७९ साली मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १०० ने सुरू झाला आज तो २३ हजारांच्या जवळपास आहे याच काळात एक ग्रॅम सोन्याची किंमत साधारणत: रु. १००/- होती ती आज एका ग्रॅमला फक्त रु. २,९०० आहे. मग शेअर निर्देशांकातील गुंतवणूक (यात लाभांश धरलेला नाही) फायदेशीर की सोन्यातील? मग मुलीच्या लग्नासाठी दरमहा एक ग्रॅम सोने तिच्या जन्मापासून घेणे फायदेशीर की दरमहा एक ‘निफ्टीबीज’ (निर्देशांक) युनिट घेणे फायदेशीर. तुम्हीच विचार करा.
आपल्या परिचयातील खूपसे ज्येष्ठ नागरिक सांगतात, ‘‘आमच्या लहानपणी सोने फक्त रु. १००/- तोळा होते. आता किती महाग झाले आहे. मी या ज्येष्ठांना सांगतो, ‘आजोबा त्या वेळेस तुमच्या वडिलांचे मासिक उत्पन्न काय होते आणि आज सोने प्रति ग्रॅम २,९०० रुपये असताना तुमच्या नातवाचे मासिक उत्पन्न काय आहे? तुलना दोन्हींची एकत्र करा, म्हणजे सोन्याचे अवमूल्यांकन किती झाले हे लक्षात येईल.
संग्रहित लेख, दिनांक 19th May 2014 रोजी प्रकाशित
झळाळी गेली, रया गमावली!
नव्या सरकारचे गुंतवणुकीवर, प्रामुख्याने भांडवली बाजारावरील सुपरिणाम सुस्पष्टच आहेत, पण सोन्याच्या झळाळीसाठी ‘मोदी इफेक्ट’ कामी येईल काय?

First published on: 19-05-2014 at 07:11 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold price