scorecardresearch

करावे कर-समाधान : घर विक्री आणि करबचत..

मागील लेखात आपण घराच्या विक्रीवर होणाऱ्या भांडवली नफ्यासंबंधी माहिती घेतली. घर विक्रीतून होणाऱ्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात विविध तरतुदी आहेत.

करावे कर-समाधान : घर विक्री आणि करबचत..

प्रवीण देशपांडे

मागील लेखात आपण घराच्या विक्रीवर होणाऱ्या भांडवली नफ्यासंबंधी माहिती घेतली. घर विक्रीतून होणाऱ्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात विविध तरतुदी आहेत. जेणेकरून करदात्याला लहान घर विकून मोठे घर घेणे, दुसऱ्या शहरात स्थलांतर होणे, वगैरेसाठी कराचे दायित्व कमी होऊन रोकड सुलभता वाढेल.

प्राप्तिकर कायद्यानुसार घर विक्रीच्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी प्रामुख्याने दोन पर्याय आहेत. एक म्हणजे नवीन घरात गुंतवणूक आणि दुसरा पर्याय रोख्यांमध्ये गुंतवणूक. या पर्यायानुसार करदात्याला गुंतवणूक करावयाची असल्यास ती किती?, कधी?, कशी करावयाची? याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. यासाठी या दोन्ही कलमांमध्ये गुंतवणुकीची मुदत ठरवून दिली आहे आणि ती कशी करायची यासाठीदेखील तरतूद आहे. या मुदतींचे पालन न केल्यास वजावट रद्द होऊ शकते आणि करदात्याला कर भरावा लागू शकतो.

नवीन घरात गुंतवणूक :
करदाता घर विक्रीवर झालेल्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्याएवढी किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम नवीन घरात गुंतवून संपूर्ण कर वाचवू शकतो. गुंतवणूक कलम ५४ नुसार ठराविक कालावधीमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. घर विक्रीच्या एक वर्षपूर्वी किंवा पुढील दोन वर्षांत (नवीन घर विकत घेतल्यास) किंवा तीन वर्षांत (नवीन घर बांधल्यास) नवीन घरात गुंतवणूक करावी लागते. ज्या आर्थिक वर्षांत करदात्याने जुने घर विकले त्या वर्षीचे विवरणपत्र भरण्याच्या मुदतीपूर्वी (म्हणजेच ३१ जुलैआधी) नवीन घरासाठी पैसे न गुंतविल्यास भांडवली नफ्याएवढी रक्कम दीर्घकालीन भांडवली नफा योजना (कॅपिटल गेन स्कीम) १९८८ नुसार बँकेत बचत किंवा मुदत ठेवीच्या स्वरूपात नवीन खाते उघडून जमा करावी लागते आणि या खात्यातून आपल्याला नवीन घर खरेदी किंवा बांधण्यासाठी खर्च करावा लागतो. वरील मुदतीत भांडवली नफ्याएवढय़ा रकमेची गुंतवणूक किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम नवीन घरात केल्यास करदात्याला कर भरावा लागत नाही. या मुदतीत दीर्घकालीन भांडवली नफा योजनेमध्ये पैसे न ठेवल्यास करदात्याला कलम ५४ नुसार सवलत मिळत नाही. नवीन घर घेण्यासाठी दोन (विकत घेतल्यास) किंवा तीन (बांधल्यास) वर्षांची मुदत आहे. या कलमानुसार जुने घर विकून होणाऱ्या भांडवली नफ्यातून एकाच नवीन घरातील गुंतवणुकीची वजावट घेता येते. याला अपवाद आहे. जुन्या घरावरील दीर्घमुदतीचा भांडवली नफा दोन कोटी रुपयांपेक्षा कमी असेल तर करदात्याला एका घराच्या खरेदीऐवजी दोन घरांच्या खरेदीचा पर्याय उपलब्ध आहे. हा पर्याय करदात्याला आपल्या जीवनात केवळ एकदाच घेता येतो. आपल्या जुन्या घरावरील दीर्घ मुदतीचा भांडवली नफा दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्यास फक्त एकाच घरातील गुंतवणूक वजावटीस पात्र असेल.

रोख्यांमध्ये गुंतवणूक :
करदाता घर विक्रीवर झालेल्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्याएवढी रक्कम कॅपिटल गेन बॉण्डमध्ये गुंतवू शकतो. या गुंतवणुकीची कमाल मर्यादा ५० लाख रुपये आहे. म्हणजेच करदाता ५० लाख रुपयांपर्यंतची वजावट कलम ५४ ईसी या कलमानुसार घेऊ शकतो. ही गुंतवणूक घराची विक्री केल्या तारखेपासून ६ महिन्यांच्या आत केली तरच ती वजावटीस पात्र आहे. या मुदतीत बॉण्डमध्ये पैसे न गुंतविल्यास करदात्याला वजावट मिळत नाही. नुकतेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) ने २०२२-२३ या आर्थिक वर्षांसाठी या कलमासाठी बॉण्ड बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक :
करदाता घराच्या विक्रीवर झालेल्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून वरील गुंतवणूक करून कर पूर्णपणे वाचवू शकतो किंवा करदायित्व कमी करू शकतो, असे असले तरी करदात्याला हा भांडवली नफा आणि कलम ५४ आणि ५४ ईसी नुसार केलेली गुंतवणूक वजावटीच्या स्वरूपात विवरणपत्रात दाखवावी लागते. या वजावटी घेण्यापूर्वी करदात्याचे उत्पन्न कमाल करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास (अतिज्येष्ठ नागरिकांसाठी ५ लाख, ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ लाख आणि इतर नागरिकांसाठी २,५०,००० रुपये) करदात्याला विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. उदा. करदात्याला दीर्घ मुदतीचा २५ लाख रुपयांचा भांडवली नफा झाला आणि त्याचे इतर उत्पन्न २ लाख रुपयेच आहे. त्याने नवीन घरात २५ लाख रुपये गुंतवणूक केली आहे. त्याचे करपात्र उत्पन्न २ लाख रुपये असले आणि करदायित्व नसले तरी वजावटीपूर्वीचे उत्पन्न २७ लाख रुपये असल्यामुळे त्याला विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे.

आता प्रश्नोत्तराकडे वळू या :
प्रश्न : मी तीन वर्षांपूर्वी माझे घर विकले होते आणि त्याच्या विक्रीवर होणाऱ्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून कलम ५४ नुसार वजावट घेतली होती. ही रक्कम मला तीन वर्षांत नवीन घरात गुंतवायची होती. परंतु मी गुंतवू शकलो नाही. आता मला काय करावे लागेल? – एक वाचक, पुणे
उत्तर : आपल्याला तीन वर्षांत नवीन घर बांधणे शक्य झाले नसल्यामुळे तिसऱ्या वर्षी भांडवली नफ्याएवढी रक्कम उत्पन्नात दाखवून त्यावर कर भरावा लागेल. कॅपिटल गेन स्कीम १९८८ नुसार खात्यात जमा असलेले पैसे काढण्यासाठी आपल्याला प्राप्तिकर अधिकाऱ्याने प्रमाणित केलेला ‘‘फॉर्म जी’’ बँकेला सादर करावा लागेल.

प्रश्न : मी नवीन घर घेण्यासाठी माझ्या वडिलांनी पूर्वी खरेदी केलेले सोने विकले. या सोन्याच्या विक्रीवर झालेल्या भांडवली नफ्यावर मला कर भरावा लागेल का? मला कर कसा वाचविता येईल? – किरण सावंत, मालाड
उत्तर : कोणत्याही दीर्घ मुदतीच्या संपत्तीच्या (जसे सोने, जमीन, समभाग वगैरे) विक्रीवर झालेला भांडवली नफा करपात्र आहे. नवीन घरात गुंतवणूक केल्यास (आणि काही अटींची पूर्तता केल्यास) कलम ५४ एफ नुसार कर सवलत घेता येते. या कलमानुसार संपत्तीची संपूर्ण विक्री रक्कम (विक्री खर्च वजा जाता) नवीन घरात गुंतवावी लागते. संपूर्ण विक्री रकमेपेक्षा (विक्री खर्च वजा जाता) कमी रक्कम नवीन घरात गुंतविल्यास त्या प्रमाणात वजावट मिळते. या कलमानुसारदेखील कलम ५४ प्रमाणे मुदतीत गुंतवणूक करावी लागते. शिवाय या कलमानुसार अतिरिक्त अट आहे की करदात्याकडे एका घरापेक्षा जास्त घरे (नवीन घर सोडून) नसावीत.

लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार
pravin3966 @rediffmail. Com

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या