मिरॅ अॅसेट इंडिया अपॉच्र्युनिटी फंड
फंडाची सुरुवात ४ एप्रिल २००८ रोजी म्हणजे जागतिक भांडवली बाजारातील घसरणीपूर्वी झाली हे विशेष दखल घेण्यायोग्य आहे. अशासाठी की या फंडाने आठ वर्षे पूर्ण केली असून एक आर्थिक आवर्तन अनुभवले आहे. या आठ वर्षांत भांडवली बाजारातील चढ-उतारांना सामोरे जात फंडाने परताव्याच्या दरात सातत्य राखले आहे. असामान्य दीर्घकालीन परतावा देत आपले गुंतवणुकीतील स्थान अबाधित असल्याचे फंडाने सिद्ध केले आहे.
‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रमात म्युच्युअल फंडांच्या भारंभार योजनांतून आपल्याला साजेशा योजनेची निवड कशी करावी, हा प्रश्न श्रोत्यांकडून हटकून विचारला जातो. याचे कारण एकाच फंड घराण्याच्या अनेक योजनांच्या गुंतवणूक धोरणांत साधम्र्य असते. सांगण्यापुरते पोटभेद असलेल्या योजना असतात. आयसीआयसीआय प्रु. म्युच्युअल फंडाने व्हॅल्यू सिरीज या नावाने मालमत्ता वाढविण्यासाठी मुदतबंद योजनांचे असेच पेव फोडले. यापैकी आयसीआयसीआय प्रु. व्हॅल्यू फंड सिरीज-१ ची मुदतपूर्ती येत्या आठवडय़ात होणार आहे. या मुदतबंद योजना गुंतवणूकदारांना किती फायद्याच्या ठरल्या व हे जाणून घेणे गरजेचे आहे. यापूर्वी ‘लोकसत्ता अर्थवृत्तान्त’च्या २१ ऑक्टोबरच्या २०१३च्या अंकात आयसीआयसीआय प्रु. म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निमेश शहा यांचा ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग एक अनोखे तंत्र’ हा लेख व या लेखातील मुद्दय़ांना आक्षेप घेणारा ‘व्हॅल्यू ती किती’ हा १८ नोव्हेंबर २०१३ रोजी लेख प्रकाशित झाला होता. या लेखांचे सद्य:स्थितीत वाचन आवश्यक ठरते. दरम्यान, आलेल्या सर्वच मुदतबंद योजनांनी (क्लोज एंडेड) गुंतवणूकदारांना किती परतावा दिला ही साशंक गोष्ट असली तरी म्युच्युअल फंड वितरकांना मात्र त्या फायद्याच्याच राहिल्या. या योजनांपेक्षा कितीतरी अधिक परतावा गुंतवणुकीसाठी कायम खुल्या असलेल्या (ओपन एंडेड) योजनांनी दिला आहे. मिरॅ अॅसेट इंडिया अपॉच्र्युनिटी फंडाच्या पहिल्या दिवशी म्हणजे ४ एप्रिल २००८ रोजी गुंतविलेल्या १ लाख गुंतवणुकीचे ४ नोव्हेंबर २०१६ रोजी ३.६८ लाख झाले असून परताव्याचा वार्षिक दर १६.४१ टक्के आहे.
२०१५ची दिवाळी ते २०१६ची दिवाळी या कालावधीत मल्टी कॅप फंड गटात सर्वाधिक (१९ टक्के) परतावा देलेला हा फंड आहे. या फंडाची सुरुवात ४ एप्रिल २००८ रोजी म्हणजे जागतिक भांडवली बाजारातील घसरणी पूर्वी झाली हे विशेष दखल घेण्यायोग्य अशासाठी की या फंडाने एक आर्थिक आवर्तन अनुभवले आहे. नोव्हेंबर २००८ मध्ये फंडाची एनएव्ही ५.८४ गेली होती व ऑक्टोबर २०१६ मध्ये ३६.८४ झाली आहे. प्रथम एनएव्हीमध्ये घसरण व नंतर वृद्धी अनुभवलेला हा म्युच्युअल फंड आहे. ३, ५ आणि ८ वर्षे परताव्याच्या दरात सातत्य राखल्याने क्रिसिलने consistent performer (Rank 2) ही पत निश्चित केली आहे. वार्षिक व चलत परताव्याच्या दरातील सातत्य क्रिसिलच्या पत निश्चितीवर शिक्कामोर्तब करते.
एस अँड पी बीएसई २०० हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक असून एकूण गुंतवणुकीच्या किमान ६५ टक्के गुंतवणूक या निर्देशांकातील कंपन्यांतून केलेली असणे बंधनकारक आहे. सध्या विद्यमान गुंतवणुकीच्या ७५ टक्के गुंतवणूक संदर्भ निर्देशांकानुसार केलेली आहे. फंडाच्या गुंतवणुकीत विविध क्षेत्रांतील उमद्या कंपन्यांच्या समभागांचा समावेश केला जातो. या कंपन्यांच्या उमदेपणाचे मोजमाप या कंपन्यांच्या नफा क्षमतेवरून केले जाते. ज्या कंपन्या व्यावसायिक परिचालनातून रोकड तयार करू शकतात अशा आणि ज्या कंपन्या त्यांच्या भांडवलावर १४ टक्क्यांहून अधिक परतावा कमावतात अशाच कंपन्यांचा समावेश गुंतवणुकीत केला जातो. अर्थपरिमाणांचा विचार करून विशिष्ट उद्योगांच्या समभागात गुंतवणूक कमी-अधिक केली जाते. निर्देशांकांच्या मूल्यांकनानुसार लार्ज कॅप आणि मिड कॅपचे गुणोत्तर ठरते. सप्टेंबरच्या गुंतवणूक विवरणानुसार, फंडाच्या गुंतवणुकीत ८१.२१ टक्के लार्ज कॅप, १४.५२ टक्के मिड कॅप व २.१४ टक्के स्मॉल कॅप समभागांचा समावेश आहे. समभाग गुंतवणुकीचे हे निकष असल्याने हा फंड निर्देशांकापेक्षा अधिक (अल्फा) किमान ४ ते कमाल ८ टक्के परतावा वेगवेगळ्या कालावधीत गुंतवणूकदारांना देऊ शकला. हा फंड समभागांची निवड ‘बॉटम अप अप्रोच’ पद्धतीने करीत असल्याने समभागाचे मूल्यांकन, भविष्यातील नफा वृद्धी या बाबी लक्षात घेऊनच समभागांची निवड होते. विद्यमान गुंतवणुकीत सर्वाधिक पसंती खासगी बँका (२१.२८ टक्के), वाहन उद्योग (१३.३९ टक्के), तेल व वायू (१०.८२ टक्के), आरोग्य निगा (८.१० टक्के) व माहिती तंत्रज्ञान (७.१० टक्के) या पाच उद्योगक्षेत्रांना दिली आहे. आघाडीच्या पाच गुंतवणुका एकू ण गुंतवणुकीच्या २६ टक्के असून एचडीएफसी बँक (७.७४ टक्के), आयसीआयसीआय बँक (५.४५ टक्के), स्टेट बँक (४.४४ टक्के), मारुती (४.१७ टक्के), इंडसइंड बँक (४.१६ टक्के) या समभागांत फंडाने सर्वाधिक गुंतवणूक केली आहे.
मिरॅ अॅसेट इंडिया अपॉच्र्युनिटी फंडाच्या एनएव्हीत होणारे चढ-उतार डायव्हर्सिफाइड फंडाच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी आहेत. अन्य फंडाच्या तुलनेत कमी जोखीम व सरासरीहून अधिक परतावा असल्याने या फंडाचा शार्प रेशो डायव्हर्सिफाइड फंडांच्या सरासरीहून अधिक आहे. नजीकच्या काळात अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक निकालानंतर बाजारातील संभाव्य चढ-उतारांचा विचार करता हा फंड सद्य परिस्थितीत गुंतवणुकीसाठी आदर्श पर्याय ठरतो. या फंडाने लाभांश वाटपात सातत्य राखले असून २०११चा अपवाद वगळता फंडाने गुंतवणूकदारांना ८ ते ११ टक्क्यांदरम्यान करमुक्त लाभांश दिला आहे.
मिरॅ अॅसेट इंडिया अपॉच्र्युनिटी फंडाने आठ वर्षे पूर्ण केली असून या आठ वर्षांत भांडवली बाजारातील चढ-उतारांना सामोरे जात फंडाने परताव्याच्या दरात सातत्य राखले आहे. फंडाने असामान्य दीर्घकालीन परतावा देत आपले गुंतवणुकीतील स्थान अबाधित असल्याचे सिद्ध केले आहे. हा फंड सेवानिवृत्तीपश्चात करावयाची तरतूद, मुलांची शिक्षण यासारख्या दीर्घकालीन वित्तीय ध्येयांची पूर्तता करण्यासाठी उत्तम गुंतवणूक साधन आहे. फंडाचा लाभांशाचा दर समाधानकारक असल्याने जे गुंतवणूकदार नियमित उत्पन्न मिळवू इच्छितात असे गुंतवणूकदार या फंडाचा समावेश आपल्या गुंतवणुकीत वित्तीय सल्लागारांच्या मदतीने करू शकतात.
वसंत माधव कुलकर्णी
shreeyachebaba@gmail.com
(अस्वीकृती: या स्तंभात वापरलेली माहिती व आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)