गुंतवणूक भांडारातील एक तरी समभाग बहुप्रसवा (मल्टी बॅगर) असावा असे प्रत्येक गुंतवणूकदाराला वाटत असते. बाजारातील तळच्या व मधल्या फळीतून अर्थात स्मॉल व मिड कॅपमधून असे बहुप्रसवा समभाग हुडकण्यात कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या काही मोजक्या निधी व्यवस्थापकांमध्ये डीएसपी म्युच्युअल फंडाचे समभाग गुंतवणूक विभागाचे प्रमुख विनीत सांबरे यांचा उल्लेख अग्रक्रमाने होतो. परतावा कामगिरी ऐन बहरात असताना, दोन वर्षांपूर्वी त्यांनी त्यांचा स्मॉल कॅप फंड नव्या गुंतवणुकीसाठी बंद केला आणि अलिकडे पुन्हा खुला केला. ज्यायोगे पुढे बाजारात झालेल्या स्मॉल व मिड कॅप समभागांच्या निष्ठूर पडझडीपासून गुंतवणूकदारांचे संरक्षण केले गेले. सांबरे यांच्याशी, सरत्या २०१९ सालाचा पुनर्वेध आणि आगामी २०२० सालातील बाजाराविषयक दृष्टिकोनासंबंधी झालेल्या संवादाचा हा गोषवारा..

*  भारतीय भांडवली बाजाराला प्रभावित करू शकणारी म्हणजेच गुंतवणूकदारांनी चिंतित व्हावे अशी सध्या कोणती आव्हाने समोर दिसतात?

– भारतीय अर्थव्यवस्थेचे मंदावलेपण हे अर्थातच सध्याच्या काळातील सर्वात गहन चिंतेचा विषय निश्चितच आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दराने तळ गाठला आहे. अलीकडे प्रसिद्ध झालेल्या अनेक स्थूल-अर्थ संकेतांकांना लक्षात घेतल्यास यात सुधाराच्या दृष्टीने उत्साहदायी चित्र नाही. विविध उद्योग क्षेत्रात मंदी बराच काळ सुरू राहिल्याच्या परिणामी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील वाढ खुंटलेली आहे. नोकर कपातही सुरू आहे, तर अनेकांवर नोकऱ्या गमावण्याची टांगती तलवार आहे. यातून एकंदर गुंतवणूकविषयक मनोबलाला धक्का लावला जात आहे. अर्थव्यवस्थेच्या उभारीसाठी सरकारने हात सल सोडून भांडवली खर्च करणे आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांचे अपेक्षेपेक्षा खूप कमी होत असलेले संग्रहण पाहता, सरकारला वित्तीय तुटीवर लक्ष ठेवून खर्च करण्यावरही बंधने आहेत.

भांडवली बाजारात मात्र निर्देशांकाकडून नवनवीन शिखरांची चढाई सुरू आहे. काही मोजक्या समभागांचा माग घेत मातब्बर गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या पशाचा ओघाचा हा परिणाम आहे. अर्थात अर्थवृद्धीच्या दिशेने सरकारकडून योग्य ती पावले टाकली जातील असा आशावादही यामागे आहेच.

*  प्राप्त परिस्थितीत गुंतवणुकीच्या कोणत्या संधी दिसून येतात काय?

– गुंतवणुकीचा दृष्टिकोन दीघरेद्देशी असेल तर सध्याच्या वातावरणातही गुंतवणुकीच्या संधी खूप आहेत. त्या नेमक्या ओळखून पावले टाकायला हवीत. कंपन्यांच्या महसुलात अल्प-स्वल्प वाढीचा सध्याचा काळ आणि ताणली गेलेली बाजाराची पातळी पाहता, अल्प तसेच मध्यम कालावधीसाठी परताव्याचा स्तरही माफक राहील, हेही सामान्य गुंतवणूकदारांनी ध्यानात घेतले पाहिजे.

आम्ही अशा कंपन्यांकडे आशेने पाहत आहोत, ज्या व्यापक उद्योग क्षेत्राच्या वाढीच्या दरापेक्षा सरस कामगिरीची धमक राखतात आणि भांडवली कार्यक्षमतेच्या निकषावरही त्या उत्कृष्ट आहेत. वाढ क्षमता आणि भांडवली दमदारपणा या दोन्ही कसोटय़ा उत्तीर्ण करणाऱ्या काही सुयोग्य संधी बाजारात जरूर उपलब्ध आहेत. परंतु वर म्हटल्याप्रमाणे ही गुंतवणूक दीर्घ मुदतीची (किमान पाच वर्षे) कालावधीसाठी असायला हवी.

विशिष्ट थीम / सेक्टरविषयी बोलायचे तर वाहन उद्योग, बँकिंग, आरोग्य निगा, सीमेंट, बांधकाम सामग्री वगैरे क्षेत्रातील सशक्त ऐतिहासिक पूर्वकामगिरी असणाऱ्या, दीर्घ कालावधीसाठी निरंतर वाढ दृश्यमान असलेल्या आणि वाजवी मूल्यांकन असलेल्या चांगल्या कंपन्या गुंतवणुकीसाठी हेरता येऊ शकतील.

*  बाजाराचे मूल्यांकन सध्या महागडे आहे म्हटले जाते, तुम्ही याकडे कसे पाहता?

– भारतीय भांडवली बाजाराचे सध्या बऱ्यापैकी ध्रुवीकरण झाले आहे. काही अव्वल बडय़ा कंपन्यांचे समभाग पशाचा मोठा ओघ निरंतर आकर्षति करीत आहेत. त्यांच्यावरच अवाच्या सव्वा बोली लावली जात आहे आणि म्हणून त्यांचे मूल्यांकनही महागडे बनले आहे. त्याच वेळी तळच्या भागातील कंपन्या सध्याच्या कमकुवत बाजार चक्रात पिचत चालल्या असून, त्यांचे मूल्यांकन वाजवी अथवा खूपच स्वस्त बनले आहे.

*  ध्रुवीकरणाचा हा प्रभाव कुठवर सुरू राहील आणि आगामी तिमाहीसाठी निफ्टी निर्देशांकाचा संभाव्य स्तर काय असेल?

– हे सांगणे अवघड आहे. किंबहुना अल्पावधीसाठी बाजाराविषयक कोणतेही कयास बांधणे जोखमीचे असून, मी तरी असे कोणतेही अंदाज व्यक्त करण्यापासून अंतर राखून असतो. अर्थात दीर्घावधीचा दृष्टिकोन ठेवून बाजारात आलेल्या गुंतवणूकदारांच्या दृष्टीने ही गोष्ट फार मोलाचीही नाही.

*  म्युच्युअल फंडांकडून अलीकडच्या काळात पोर्टफोलियोतील फेरबदल कशा प्रकारे केले गेले आहेत?

– बाजाराचे सध्याचे एक-ध्रुवीय स्वरूप हे जगातील अनेक अर्थव्यवस्थांमध्ये कमी-अधिक फरकाने अनुभवास येत आहे. गुंतवणूकदारांकडून चांगल्या मिळकत कामगिरीचा माग घेतला जात आहे आणि तुलनेने चांगली कामगिरी असणाऱ्या कंपन्यांना गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंती मिळताना दिसत आहे. अशा स्थितीत म्युच्युअल फंडांकडून केले गेलेले पोर्टफोलियोतील फेरबदल मांडायचे तर मी केवळ डीएसपीमध्ये केल्या गेलेल्या बदलांबद्दलच बोलू शकेन. आमचे लार्ज, लार्ज व मिड कॅप, मिड व स्मॉल कॅप असे वेगवेगळ्या प्रकारचे फंड आहेत. हायब्रीड वर्गवारीत आमचा एक डायनॅमिक अ‍ॅसेट अलोकेशन फंड आहे, जो स्वयंचलितपणे मूल्यांकनाचा स्तर लक्षात घेऊन रोखे आणि समभाग गुंतवणुकीचे कमी-जास्त संतुलन निरंतर स्वरूपात राखत असतो. फंडाच्या गुंतवणूक उद्दिष्टाला आणि निधी व्यवस्थापकाच्या गुंतवणूक तत्त्वाला साजेशा अशा दीर्घ मुदतीत ‘अल्फा’ तयार करण्याची क्षमता असलेल्या कंपन्या व व्यवसायांची निवड आम्ही वेगवेगळ्या फंड प्रकारांसाठी करीत असतो.

*  सरकारने अलीकडे केलेल्या कंपनी करातील कपातीचा परिणाम हा अर्थव्यवस्था आणि बाजारावर कसा राहील?

– कंपनी करात कपातीचे पाऊल स्वागतार्ह असून, भारतीय तसेच विदेशी कंपन्यांकडून भांडवली गुंतवणूक आकर्षति करण्याच्या दृष्टीने ते उपकारक ठरेल. रुतून बसलेले गुंतवणूक चक्र यातून पुन्हा वेग घेईल, परिणामी रोजगार निर्मितीही होऊन मंदावलेल्या ग्राहक मागणीला चालना, पर्यायाने अर्थव्यवस्थेला चालना यातून मिळू शकेल.

*  सध्याच्या बाजार स्थितीत गुंतवणुकीचा आदर्श पोर्टफोलियो काय असावा?

– अर्थव्यवस्थेच्या वाटचालीविषयी अनिश्चितता, बाजार गुंतवणुकीचे ध्रुवीकरण, दर्जेदार समभागांचे महागडे मूल्यांकन वगैरे सध्याच्या बाजारातील विसंगती लक्षात घेता, माझ्य़ा मते डीएसपी डायनॅमिक अ‍ॅसेट अलोकेशन फंड हा सध्याच्या वातावरणात गुंतवणुकीचा आदर्श पर्याय ठरतो. मध्यम जोखीम घेऊ शकणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी या फंडातून रोखे व समभाग गुंतवणुकीचे पारडे चांगल्या प्रकारे संतुलित केले जाते. गुंतवणुकीतील मालमत्ता विभाजन हा जोखीम-संतुलित परताव्याचा पायाच आहे. वर म्हटल्याप्रमाणे दर्जेदार कंपन्या परंतु त्यांचे मूल्यांकन महागडे असल्याने येणारी जोखीमही यामुळे आपोआपच कमी होईल. दीर्घ मुदतीत ‘अल्फा’ तयार करण्याची क्षमता असलेल्या कंपन्या व व्यवसायांची निवड ही त्यांचा सशक्त पाया पाहून केली गेली पाहिजे. अधिक जोखीम सोसण्याची तयारी व क्षमता असलेल्या, त्याचप्रमाणे गुंतवणुकीचा परिघ पाच वर्षे वा अधिक कालावधीचा असलेल्या गुंतवणूकदारांनी शुद्ध समभागसंलग्न योजना, मिड कॅप फंडांकडे आस्थेने पाहण्यास हरकत नाही.

(मुलाखत : सचिन रोहेकर)