श्रीकांत कुवळेकर ksrikant10@gmail.com

ऑगस्ट महिन्यामध्ये या स्तंभातून ‘सिल्व्हर ईटीएफ’, अर्थात चांदीमध्ये गुंतवणुकीसाठी समभागसदृश युनिट संदर्भात चर्चा केली होती. त्या वेळी निमित्त होते भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने ‘सिल्व्हर ईटीएफ’साठी मान्यता देण्यासाठी चालू केलेली चाचपणी. मागील आठवडय़ामध्ये ‘सेबी’ने या गुंतवणुकीच्या लोकप्रिय प्रकाराला मान्यतादेखील दिली आणि त्याबद्दल मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम प्रसारित केले आहेत. म्हणजे आता चांदी या कमॉडिटीमध्ये सामान्य गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून सहज आणि सोप्या पद्धतीने पैसे गुंतवणे शक्य होईल. त्यामुळे ‘सिल्व्हर ईटीएफ’ बाजारात येणे ही केवळ औपचारिकता राहिली असून हे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी या पद्धतीच्या निदान एक-दोन योजना येणे अपेक्षित आहे.

तसे पाहता सोने िंकंवा चांदी याबद्दल भारतीय नागरिकांचे प्रेम जगप्रसिद्ध आहे. जगातील द्वितीय क्रमांकाचा सोने आयातदार असलेला भारत दरवर्षी ६००० ते ८००० टन चांदीदेखील आयात करीत असतो. तरुण वर्गामध्ये सोने-चांदी यांच्या दागिन्यांबद्दल मागील पिढीएवढे प्रेम नसले तरी गुंतवणुकीसाठीचे माध्यम किंवा पाश्चिमात्य गुंतवणूकदारांप्रमाणेच त्याकडे कमॉडिटी म्हणून पाहण्याचे प्रमाण वाढत जात आहे. तर ६० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामीण आणि निम्न-ग्रामीण भागात आजही वित्तीय गुंतवणुकीच्या साधनांची अनुपलब्धता मोठय़ा प्रमाणावर असल्यामुळे सोने आणि चांदी यात मोठय़ा प्रमाणावर पैसे गुंतवले जातात. सोन्यात गुंतवणुकीसाठी ईटीएफची सुरुवात होऊन आज दशकाहून अधिक काळ लोटला असून त्यात अपेक्षित यश मिळालेले नाही हे सत्य आहे. या पार्श्वभूमीवर आता चांदीसाठी ईटीएफ येणार असल्यामुळे त्याची विस्तृत माहिती घेऊ  या.

सामान्य गुंतवणूकदाराला सिल्व्हर ईटीएफचे फायदे 

चांदी हे गरिबांचे सोने असे म्हटले जाते. परंतु दुकानातून छोटय़ा-छोटय़ा तुकडय़ात चांदी घेणे किंवा चांदीच्या वस्तू घेणे यामध्ये गुंतवणूक म्हणून आर्थिक फायदा क्वचितच होतो. याला अनेक कारणे आहेत. एकतर दुकानातून मिळणारी चांदी किती शुद्ध असेल, त्याची लावलेली किंमत आणि एकदा ती विकत घेतल्यावर बाळगण्याची जोखीम अधिक त्यावरील खर्च, शिवाय चांदीचे विशिष्ट कालावधीनंतर काळे पडणे आणि बाजारात विकण्याची वेळ आली तर प्रचलित बाजारभावावर लावली गेलेली घट हे पाहता गुंतवणुकीचे साधन म्हणून चांदीकडे पाहणे कठीण होते. या सर्व समस्यांवर एकच उत्तर म्हणजे कागदी स्वरूपात तसेच प्रचलित बाजार-भावामध्ये चांदी खरेदी विक्री करण्याची मुभा. या दृष्टीने ‘सिल्व्हर ईटीएफ’हून अधिक चांगला पर्याय नाही. एकदा त्यात गुंतवणूक केली की,वर दिलेल्या सर्व समस्या ही त्या म्युच्युअल फंडाची जबाबदारी असते. त्यासाठी तुलनेने अतिशय क्षुल्लक शुल्क आकारून संबंधित फंड व्यवस्थापक ही जबाबदारी पार पाडत असतो.

सिल्व्हर ईटीएफचे स्वरूप कसे असेल?

‘सिल्व्हर ईटीएफ’देखील फंड ऑफ फंडस् अशा प्रकारची चांदीत गुंतवणूक करणारी म्युच्युअल फंड योजना असेल किंवा थेट युनिट्सच्या स्वरूपात शेअर बाजारात सूचिबद्ध करून समभागाप्रमाणेच देवाण-घेवाण करता येईल अशा प्रकारचा फंड असून शकेल. फंड मॅनेजरला गुंतवणूकदारांचा निधी हा ‘लंडन बुलियन मार्केट असोसिएशन’ या विश्वमान्य संस्थेच्या मानकानुसार तयार केलेल्या ३० किलोच्या चांदीच्या विटेमध्ये गुंतवणे गरजेचे असून त्याची शुद्धता ९९.९ इतकी असणे बंधनकारक आहे. भारतात हिंदुस्थान झिंक ही एकच कंपनी अशा प्रकारची सुमारे ६००-७०० टन चांदी दरवर्षी उत्पादित करीत असून त्याला ‘लंडन बुलियन मार्केट असोसिएशन’ची मान्यतादेखील आहे. फंड व्यवस्थापकांना प्रत्यक्ष चांदीबरोबरच चांदीच्या फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टस किंवा तत्सम साधनांमध्ये गुंतवणुकीची परवानगी देण्यात आली असली तरी त्याबाबत काही शर्ती आहेत.

प्रत्यक्ष चांदीतील गुंतवणूक आणि ‘सिल्व्हर ईटीएफ’मधील गुंतवणूक यावरील परताव्यामध्ये असलेला फरक, ज्याला ‘ट्रॅकिंग एरर’ असेही म्हणतात, तो दोन टक्क्यांहून अधिक राहणार नाही याची जबाबदारीदेखील फंड मॅनेजरची राहील. हा फरक बरेचदा प्रत्यक्ष चांदीतील गुंतवणुकीमधील समस्या निराकरण करण्यासाठी आणि फंड व्यवस्थापनासाठी लागणारे खर्च यांच्यामुळे होत असतो. त्याविषयी विस्तृत माहिती त्या त्या फंडांच्या संकेतस्थळावरून उपलब्ध करून दिली जाईल.

‘सिल्व्हर ईटीएफ’चे दैनंदिन निव्वळ मालमत्ता मूल्य याची माहितीदेखील बाजाराच्या संकेतस्थळावर कायम उपलब्ध केली जाईल. तसेच ती ‘लंडन बुलियन मार्केट असोसिएशन’च्या दरांवर आधारित असेल. अधिक माहिती ‘सेबी’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एक गोष्ट नक्की की, गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण डोळ्यापुढे ठेवूनच ‘सेबी’ने यासाठी नियमावली तयार केली असून कमॉडिटीकडे उपभोग्य साधनच नव्हे तर मालमत्ता किंवा गुंतवणुकीचे साधन म्हणून पाहण्याच्या वृत्तीला उत्तेजन मिळेल अशा प्रकारे तयार केली गेली आहे. त्याबद्दल ‘सेबी’ला १०० टक्के गुण द्यायलाच लागतील. तरीही फंड व्यवस्थापनाच्या दृष्टीने त्यात काही त्रुटी राहिल्या असाव्यात. त्यापैकी महत्त्वाची म्हणजे फंडांना गुंतवणूकदारांचे पैसे चांदीत गुंतवताना ते फ्युचर्समध्ये ठेवण्यासाठी १० टक्क्यांची मर्यादा. म्युच्युअल फंडांकडे अनेक साधने उपलब्ध असल्यामुळे तसेच त्यांच्याकडे बाजारतज्ज्ञांची फौज असल्यामुळे शिस्तबद्ध तरीही वैविध्याचा वापर करून उपलब्ध पैशावर अधिक परतावा कसा मिळवावा याबद्दल अनेक मार्ग ते काढू शकतात.  ‘सिल्व्हर ईटीएफ’चे पैसे जर विनाशर्त १०० टक्के फ्युचर्समध्ये ठेवण्याची मुभा दिली गेली, तर उपलब्ध पैशांपैकी फक्त १० टक्के मार्जिन आणि १०-१५ टक्के पैसे मार्क-टू-मार्जिनसाठी बाजूला ठेवून उर्वरित ७५-८० टक्के निधी इतर लिक्विड फंडांमध्ये ठेवू शकतील. त्यातून वार्षिक ४ टक्के परतावा मिळेल त्यातून ‘ट्रॅकिंग एरर’मधील फरक भरून काढणेदेखील शक्य होऊ न गुंतवणूकदारांचा परतावा वाढू शकेल यात शंका नाही. तसेच फ्युचर्स आणि हजर बाजार यामध्ये बरेचदा भावात असलेल्या फरकाचा अथवा आर्ब्रिटाजचा फायदा घेण्यासाठी ‘सिल्व्हर ईटीएफ’ व्यवस्थापकांना लवचीकता असण्याची गरज आहे. गुंतवणूकदारांना अधिक परतावा मिळण्याच्या दृष्टीने या गोष्टीकडे सेबीचे लक्ष वेधणे गरजेचे आहे.

भारतात आजघडीला अनेक ‘गोल्ड ईटीएफ’ उपलब्ध असले तरी निप्पॉन सेट मॅनेजमेंट, स्टेट बँक, आयसीआयसीआय आणि कोटक यांच्या योजनांनाच बाजारात मागणी आहे. यापैकी निप्पॉन आणि आयसीआयसीआय यांचा ‘सिल्व्हर ईटीएफ’मध्ये लवकरच प्रवेश होणे अपेक्षित आहे.

जागतिक बाजारामध्ये ‘सिल्व्हर ईटीएफ’मध्ये २०,००० टनांहून अधिक गुंतवणूक झालेली दिसते. सिल्व्हर इन्स्टिटय़मूटने २०२१ वर्षांसाठी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटल्याप्रमाणे भारतात चांदीला कायम प्रचंड मागणी असली तरी २०२० मध्ये करोना प्रकोपाच्या काळात गुंतवणुकीमध्ये ८५ टक्के घट झाली होती. याला मुख्य कारण इलेक्ट्रॉनिक किंवा ऑनलाइन स्वरूपामध्ये चांदीशी निगडित गुंतवणूक साधनांची अनुपलब्धता. या पार्श्वभूमीवर भारतात ‘सिल्व्हर ईटीएफ’च्या यशाचे गणित मांडता येऊ  शकेल.

हायब्रीड ईटीएफचीही प्रतीक्षा

ऑगस्टमधील लेखामध्ये आपण ‘हायब्रीड ईटीएफ’, म्हणजे सोने आणि चांदी असा विशिष्ट प्रमाणात परंतु एकत्रित ईटीएफबद्दल चर्चा केली होती. याबाबत ‘सेबी’च्या नियमावलीमध्ये कुठलीच नोंद नसली तरी फंड व्यवस्थापकांना ‘गोल्ड ईटीएफ’ आणि ‘सिल्व्हर ईटीएफ’वरील नियमांच्या अधीन राहून असे साधन ‘सेबी’कडून मान्य करून घेणे कठीण जाणार नाही. मागील आठवडय़ाअखेरीस जागतिक भांडवली आणि कमॉडिटी बाजारामध्ये झालेली जोरदार घसरण आली आहे. करोनाच्या नव्या प्रकाराचे भय सर्व जगात पाहायला मिळत असल्यामुळे अनिश्चिततेच्या वातावरणात मोठी वाढ पाहायला मिळेल. त्या पार्श्वभूमीवर सोन्याला परत एकदा झळाळी येणे शक्य आहे. सोने वाढते तेव्हा कमी प्रमाणात का होईना चांदीदेखील वाढते हा इतिहास आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या ईटीएफची बाजाराला आणि गुंतवणूकदारांना आवश्यकता आहे.

* अस्वीकरण : कमॉडिटी बाजार हा मुख्यत: जोखीम व्यवस्थापनासाठी असून वरील लेख या गोष्टीचे महत्त्व आणि त्यातील गणित विशद करून सांगण्यासाठी आहे, लेखाला गुंतवणुकीचा सल्ला मानण्यात येऊ नये.

लेखक वस्तू बाजार विश्लेषक