सुधीर जोशी
सरलेल्या सप्ताहात मंगळवारच्या सुट्टीमुळे चारच दिवस झालेल्या व्यवहारात गुंतवणूकदारांचा नफावसुलीवर अधिक भर होता. ब्रिटानिया, पी आय इंडस्ट्रीज, स्टेट बँक आदी कंपन्यांनी तिमाहीत चांगली कामगिरी बजावल्यामुळे समभागातील अकस्मात वाढीने नफावसुलीची संधी मिळाली तर डिव्हीज लॅब, बाटा, व्होल्टास, गोदरेज कन्झ्युमर अशा कंपन्यांनी निराशा केल्यामुळे गुंतवणूकदारांनी त्यामधील गुंतवणूक कमी करण्याकडे लक्ष दिले. अमेरिकेतील चलनवाढीचा दर कमी झाल्याच्या परिणामी जागतिक बाजारात आलेल्या तेजीमुळे सप्ताहातील व्यवहारांना कलाटणी मिळाली. शुक्रवारच्या सत्रात त्याचे पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटत प्रमुख निर्देशांकांनी ५२ आठवडय़ातील उच्चांकी पातळी गाठली.
स्टेट बँक:
भारतातील सर्वात मोठय़ा बँकेच्या दुसऱ्या तिमाहीतील निकालाने सर्वानाच अचंबित केले. बँकेचा नफा ७४ टक्क्यांनी वधारून १३ हजार कोटी रुपयांवर पोहोचला. गुंतवणुकीवरील उत्पन्नातील वाढ आणि कुठलाही अनपेक्षित तोटा वर्ग करावा न लागल्यामुळे नफ्याने विक्रमी उच्चांक गाठला. गेली काही वर्षे कर्ज बुडविणारे मोठे उद्योग ओळखून त्यांच्या वसुलीची पावले उचलणे आणि त्यासाठी तरतूद करणे याचा फायदा आता निदर्शनास येतो आहे.
बँकेच्या किरकोळ कर्जाबरोबर कार्पोरेट कर्जानादेखील आता मागणी वाढते आहे. बँकेच्या कार्पोरेट कर्जाचा हिस्सा ३६ टक्के आहे, ज्यात गेल्या तिमाहीत बँकेने २१ टक्के वाढ साधली आहे. सरकारच्या उत्पादन निगडित प्रोत्साहन योजनेचा लाभ बँकेला मिळत आहे. बँकेचा कासा रेशो (बचत व चालू खात्यामधील ठेवीचे प्रमाण) चांगला असल्यामुळे पुढील काही महीने बँकेला कर्जावरील व्याजदर वाढीचा फायदा मिळेल. निकालांनंतर बँकेच्या समभागाने मोठी झेप घेतली. सध्याच्या ६०० रुपयांच्या पातळीवरून थोडी घसरण झाल्यावर गुंतवणुकीचा विचार करता येईल.
कॉरोमंडल इंटरनॅशनल :
खते, वनस्पती संरक्षण आणि पोषक रसायने या क्षेत्रातील ही अग्रेसर कंपनी आहे. कंपनीचे १६ उत्पादन प्रकल्प आणि देशभरात ७५० विक्री दालने पसरलेली आहेत. सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत कंपनीच्या विक्रीत ६४ टक्के वाढ होऊन, तिने दहा हजार कोटींचा टप्पा पार केला आणि नफा ४२ टक्क्यांनी वाढून ७४० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सध्या युरियाला पर्यायी खते वापरण्यास सरकार प्रोत्साहन देत आहे. ज्याचा कंपनीला आगामी काळात लाभ मिळेल. त्याशिवाय पीक संरक्षण क्षेत्रातही कंपनी आगेकूच करीत आहे. कंपनीने कच्च्या मालाबाबत स्वयंपूर्ण होण्याच्या योजना आखलेल्या आहेत. निकालांनंतर समभागात झालेल्या घसरणीमुळे ९२० रुपयांच्या पातळीवर या समभागात खरेदीची संधी निर्माण झाली आहे.
टायटन :
कंपनीची मजबूत घोडदौड सप्टेंबर अखेरच्या तिमाही निकालांमध्येही दिसून आली. कंपनीच्या विक्रीत २२ टक्क्याने वाढ होऊन ८,७३० कोटी झाली आहे. यादरम्यान नफा ३३ टक्कयांनी वाढून ६४१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या तीन वर्षांत कंपनीच्या दागदागिन्यांच्या व्यवसायातील सरासरी २२ टक्के वाढ उल्लेखनीय आहे. सणासुदीच्या काळानंतर त्यात थोडी घट झाली तरी दीर्घ मुदतीचा विचार करता कंपनीच्या व्यावसायिक यशाचे सातत्य कंपनीच्या समभागातील उच्च भावात दिसते. कंपनीची मध्यम आणि लहान शहरांमधील विस्तार योजना, लग्नसराईच्या दिवसांचा फायदा लक्षात घेऊन थोडय़ा घसरणीत प्रत्येक वेळी हे समभाग टप्प्याटप्प्याने जमवले तर मोठी संपत्ती जमा होईल.
गुजरात फ्लोरोकेमिकल्स:
गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी रेफ्रिजरंट उत्पादक व औद्योगिक रसायने उत्पादन करणारी कंपनी आहे. सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत कंपनीच्या विक्रीत ५२ टक्के तर नफ्यात ७३ टक्के वाढ झाली होती. कंपनी गेली काही वर्षे सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. कंपनी लिथियम आयन बॅटरीसाठी रसायने बनविण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. कंपनीला चीनला पर्याय म्हणून मागण्या मिळविण्याची संधी आहे. कंपनीचा सध्याचा भाव दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे.
अमेरिकेची मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्र्हने मागील चार वेळा केलेल्या व्याज दरवाढीनंतर प्रत्येक वेळी भारताच्या भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक वधारले आहेत. परदेशी गुंतवणूकदार नक्त खरेदीदार बनले आहेत. कदाचित भारतीय अर्थव्यवस्था उत्कृष्ट कामगिरी करत नसली तरी इतर देशांच्या तुलनेत ती चांगली कामगिरी करत असल्याचे त्यांचे मत बनले असावे. भारतातील व्यवसाय जोम धरत असण्याचे अनेक संकेत मिळत असताना बाजारावर इतके दिवस जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीच्या सावटाचे आणि अमेरिका व युरोपमधील सततच्या व्याज दरवाढीचे दडपण होते. ते काहीसे दूर होण्याचे संकेत मागच्या सप्ताहात मिळाले. अमेरिकेतील चलनवाढीचा दर अपेक्षेपेक्षा कमी वेगाने वर गेला. त्यामुळे फेडरल रिझव्र्हला व्याजदर वाढ कमी करण्यास मदत होईल. बाजाराने त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. पण उच्चांकी व्याजदर आणि त्यामुळे कमी झालेली मागणी याचे परिणाम आणखी काही काळ जाणवतील. त्यामुळे या तेजीच्या लाटेत थोडी नफावसुली करून पोर्टफोलिओचे संतुलन करता येईल.
येत्या सप्ताहातील महत्त्वाच्या घडामोडी
आरती इंडस्ट्रीज, अपोलो टायर्स, अॅबट, बालकृष्णा इंडस्ट्रीज, भारत फोर्ज, बायोकॉन, दिलीप बिल्डकॉन, इरॉस इंटरनॅशनल, जीएमआर एअरपोर्ट्स, हुडको, आयआरसीटीसी, जिंदाल समूहातील कंपन्या, ज्योती लॅब, एनबीसीसी, पराग मिल्कफूड, सुप्राजित इंडस्ट्रीज, राजेश एक्स्पोर्ट्स आदी कंपन्या आपले सप्टेंबरअखेरचे तिमाही निकाल जाहीर करतील.
ऑक्टोबर महिन्याचे घाऊक व किरकोळ महागाईचे आकडे
sudhirjoshi23@gmail.com