सुधीर जोशी – sudhirjoshi23@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवाळीच्या सप्ताहाची बहारदार सुरुवात करत मुंबई शेअर बाजार निर्देशांक – सेन्सेक्स व राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक – निफ्टीने पहिल्याच दिवशी अनुक्रमे ८३१ व २५८ अंशांची आघाडी घेतली. परिणामी बाजारात चैतन्य निर्माण झाले. वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) माध्यमातून ऑक्टोबर महिन्यातील १.३० लाख कोटींचे महसुली उत्पन्न, गृह निर्मिती क्षेत्राकडून मिळणारे सकारात्मक संकेत तसेच निर्मिती क्षेत्राच्या पीएमआय निर्देशांकात सप्टेंबरच्या ५३.७ च्या तुलनेत ऑक्टोबरमधे ५५.९ गुणांपर्यंत वाढला असा सकारात्मक घडामोडींमुळे बाजाराला बळ मिळाले. आधीच्या दोन आठवडय़ांच्या घसरणीनंतर हा सप्ताह गुंतवणूकदारांना दिलासा देणारा ठरला.

एचडीएफसी – भारतातील सर्वात मोठय़ा गृह वित्त कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणे दमदार आले. लहान तसेच मोठय़ा घरांसाठीच्या कर्जाच्या मागणीत वाढ झाली आहे. कंपनीने सरलेल्या सप्टेंबर तिमाहीत नफ्यात ३२ टक्कय़ांनी वाढ नोंदविली. थकित कर्जाचे प्रमाणदेखील खाली आले आहे. गृह निर्मिती क्षेत्रातील वाढीचा थेट फायदा या कंपनीला मिळतो. एक चांगले प्रवर्तक लाभलेल्या या कंपनीचे समभाग बाजाराच्या कुठल्याही मोठय़ा घसरणीत जरूर घ्यावेत.

देवयानी इंटरनॅशनल – केएफसी, पिझ्झाहट, कोस्टा कॉफी या खाद्यपदार्थ विक्रेत्या कंपन्यांची फ्रँचायझी असलेल्या देवयानी इंटरनॅशनल लिमिटेडने दुसऱ्या तिमाहीत नफा कमावून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. या क्षेत्रातील कंपनीला एवढया लवकर फायदा मिळू लागेल अशी कुणाची अपेक्षा नव्हती. सध्या ४०० सेवा दालने असणाऱ्या कंपनीला व्यवसाय वृद्धीसाठी भरपूर वाव आहे. समव्यावसायिक ज्युबिलंट फूडवर्क्‍सपेक्षा या कंपनीचे समभाग तुलनेने कमी किमतीत घेता येतील.

जेएसपीएल – नवीन जिंदाल समूहातील जिंदाल स्टील अँड पॉवर या कंपनीने आणखी एका तिमाहीत चांगले निकाल जाहीर केले. कंपनीचा नफा गेल्या वर्षांतील या तिमाहीच्या तुलनेत तिपटीने वाढत २,५८४ कोटींवर पोहोचला आहे. इंधन कोळशाच्या पुरवठय़ासाठी कंपनी ६० टक्के स्वावलंबी आहे. त्यामध्ये आणखी वाढ करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. स्टील उत्पादनांच्या वाढत्या किमती व लोह खनिज व कोळशाच्या किमतीमध्ये नुकतीच झालेली घट कंपनीच्या फायद्याची ठरणार आहे. पुढील वर्षभरात कंपनीचा ऊ र्जा व्यवसाय वेगळा केल्यावर कंपनीला आणखी कर्जफेड करता येईल. धातू क्षेत्रातील व्यापारचक्रात सहभागी होण्यासाठी या समभागाची खरेदी करता येईल.

पेटीएम – ‘वन९७ कम्युनिकेशन्स’ ही भारतातील पेटीएम या ऑनलाईन पैशाच्या देवाणघेवाणीचे व्यवहार सुलभ करणाऱ्या लोकप्रिय अ‍ॅपची प्रवर्तक कंपनी सोमवारपासून (८ नोव्हेंबर) प्रारंभिक समभाग विक्री करणार आहे. कंपनीने जाहीर केलेली समभागाची विक्री किंमत अधिक असल्यामुळे सध्याच्या सुस्त बाजारात समभाग सूचिबद्ध झाल्यावर मर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे.

स्टेट बँक –  देशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेने सरलेल्या सप्टेंबर तिमाहीत ७६२७ कोटींचा विक्रमी नफा कमावून बँकिंग क्षेत्राला चांगले दिवस येत असण्याच्या भाकितावर शिक्कामोर्तब केले. कंपनीच्या कर्जवाटपात २५ टक्के हिस्सा असणाऱ्या गृहकर्ज वाटपात ११ टक्क्यांची वाढ गृह निर्मिती क्षेत्राची प्रगती अधोरेखित करते. बँकेच्या उपकंपन्यांचे व्यवसायही चांगली प्रगती करीत आहेत. बँकेच्या समभागात आता घसरणीचा धोका कमी झाला आहे. या सप्ताहात जाहीर होणाऱ्या बँक ऑफ बडोदाची तिमाही आर्थिक कामगिरी अशीच दमदार राहण्याची अपेक्षा आहे. उत्सवी सप्ताहात बाजार जरा थकल्यासारखा वाटत असला तरी, या सप्ताहात मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांकात झालेली वाढ बाजारात पुढील काळासाठी आशा कायम असल्याचे दर्शविते. काही आठवडय़ांच्या विक्रीच्या माऱ्यानंतर परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या तीन दिवसात पुन्हा नक्त खरेदी केली. यामुळे बाजारात मोठय़ा पडझडीची अपेक्षा नाही. मात्र बाजाराला पुन्हा तेजीवर स्वार होण्यासाठी सबळ कारणांची प्रतीक्षा आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Last week stock market update weekly stock market update zws
First published on: 08-11-2021 at 01:07 IST