बाजाराचा तंत्र-कल : घडलंय – बिघडलंय!

निफ्टी निर्देशांक हजार अंशांच्या घसरणीतून सावरला हे चांगलं घडलंय,पण निफ्टी निर्देशांक १८,१०० लाच वारंवार का अडखळतोय, कुठे काय बिघडलंय हे समजत नाही.

आशीष ठाकूर

निफ्टी निर्देशांक हजार अंशांच्या घसरणीतून सावरला हे चांगलं घडलंय,पण निफ्टी निर्देशांक १८,१०० लाच वारंवार का अडखळतोय, कुठे काय बिघडलंय हे समजत नाही. तेजीमुळे घडलंय आणि मंदीमुळे बिघडलंय अशा हिंदोळ्यावर सरलेल्या सप्ताहाची वाटचाल होती. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

गुरुवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ५९,६३६.०१

निफ्टी : १७,७६४.८०

आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर १८,१०० हा वळणबिंदू अथवा मैलाचा दगड ठरत आहे. याचे विवेचन आपण गेल्या लेखात विस्तृतपणे केले आहे. आज आपण नोव्हेंबरचा उत्तरार्ध आणि डिसेंबर महिन्यामधील निफ्टी निर्देशांकाची संभाव्य वाटचाल व या कालावधीत निफ्टी निर्देशांकावर तेजीवाल्यांचे प्राबल्य असेल की मंदीवाल्यांचे.. हे आज आपण विस्तृतपणे जाणून घेऊया.

आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकावर ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ अथवा वळणबिंदू हा १८,१०० आहे. येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकाने १८,१०० चा स्तर पार केला आणि या स्तरावर तो सातत्याने पाच दिवस टिकल्यास, १८,४००.. १८,७००.. १९,००० अशी निफ्टी निर्देशांकाची ३०० अंशांच्या परिघातील वरची लक्ष्य असतील.

आता कळीचा प्रश्न..

येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकावर तेजीवाल्यांचे प्राबल्य असेल की मंदीवाल्यांचे?

आता ज्या सुखद आर्थिक घटना घडत आहेत, त्यात या दिवाळीत सव्वा लाख कोटी मालाची विक्री, फार मोठय़ा प्रमाणात आर्थिक उलाढाल होणारे भारतभरातील २५ लाख लग्न सोहळे, बहुतांश कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीतील (जुलै ते सप्टेंबर तिमाहीतील) समाधानकारक वित्तीय निकाल, या सर्व अर्थव्यवस्थेला उभारी देणाऱ्या, सकारात्मक घटना घडत असताना, निफ्टी निर्देशांकाने ३०० अंशांच्या परिघातील परिक्रमा केली पाहिजे. ही अपेक्षा निफ्टी निर्देशांकांने पूर्ण पण केलीही. पण कशी? १८,१०० वरून १७,७०० अर्थात ३०० अंशाहूनही अधिक अशी घसरण. त्यामुळे आर्थिक आघाडीवर सुखद घटना घडत असताना, निफ्टी निर्देशांकावर तेजीच्या ऐवजी मंदी दिसत असल्याने गेल्या लेखातील दुसऱ्या पर्यायाचा, बाजारातील वाक्यप्रचारांचा / म्हणींचा आधार घ्यावा लागेल. ‘भविष्यातील सकारात्मक घटनांच्या नांदीवर खरेदी करून, त्या घटना प्रत्यक्षात आल्यावर विक्री करावी’(‘ऑन रूमर यू हॅव टू बाय,ऑन द न्यूज यू हॅव टू सेल!) तेच आता घडताना दिसत आहे.

येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकावर सुधारणा अपेक्षित असून त्याचे वरचे लक्ष्य हे १८,००० ते १८,१०० असे असेल. हा स्तर पार करण्यास निफ्टी निर्देशांक वारंवार अपयशी ठरल्यास डिसेंबरअखेरपर्यंत निफ्टी निर्देशांकांच्या १७,८००.. १७,५००.. १७,२००.. १६,९०० अशा खालच्या लक्ष्यांची आर्थिक, मानसिक तयारी गुंतवणूकदारांनी ठेवावी.

वरील विवेचनावरून निफ्टी निर्देशांक सातत्याने १८,१०० च्या स्तरावर टिकल्यास निर्देशांकावर तेजीवाल्यांचे प्राबल्य असेल अन्यथा निफ्टी निर्देशांक सातत्याने १८,१०० च्या स्तराखाली टिकल्यास निर्देशांकावर मंदीवाल्यांचं प्राबल्य असेल.    (क्रमश:)

चिकित्सा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ या संकल्पनेची

हिंदुस्थान युनिलिव्हर : निर्देशांक उच्चांकावर असताना,आपली कंपनी ही त्या क्षेत्रातील वलयांकित, तारांकित आणि प्रथितयश कंपनी आहे. त्यामुळे तिमाही वित्तीय निकाल खराब आल्यास, तेजीच्या दिवसांत तिच्या समभागाचा भाव थोडाच खाली येणार? किंबहुना कंपनी कितीही वलयांकित, तारांकित असली तरी जाहीर झालेला तिमाही वित्तीय निकाल सर्वसाधारण, बाजाराचा अपेक्षाभंग करणारा असल्यास, ‘या चुकीला माफी नाही’. याच न्यायाने त्या कंपनीचा बाजारभाव लेखात नमूद केलेले खालच्या लक्ष्यांपर्यंत घसरतो. या दृष्टीने आज आपण हिंदुस्थान युनिलिव्हर या समभागाचा विचार करूया. दैनंदिन वापरातील लक्स, लाईफबॉय, विम, पेप्सोडंट, सर्फ, रीन अशी आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध उत्पादने हिंदुस्थान युनिलिव्हरच्या आधिपत्याखाली येतात. या कंपनीचे निकालपूर्व विश्लेषण १८ ऑक्टोबरच्या लेखात केलेले. त्या समयी समभागाचा बाजारभाव २,६४८ रुपये होता. निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर हा २,६५० रुपये होता. निकालापश्चात हिंदुस्थान युनिलिव्हर महत्वाचा केंद्रबिंदू स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास २,४५० रुपयांचे खालचे लक्ष्य असेल असे  नमूद केले होते. निकालापश्चात हिंदुस्थान युनिलिव्हरने महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर तोडत २८ ऑक्टोबरला २,३६८ रुपयांचा नीचांक मारत खालचे लक्ष्य साध्य केले. सरलेल्या सप्ताहातील गुरुवारचा,१८ नोव्हेंबरचा बंद भाव २,३९७ रुपये आहे, जो आजही महत्त्वाच्या केंद्रबिंदू स्तराखाली आणि नमूद केलेल्या खालच्या लक्ष्यासमीप आहे.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Market techniques happened worked ysh

ताज्या बातम्या