विमा क्षेत्रातील अनेक उत्पादने आज हायब्रीड प्रकारातील आहेत. त्यातील विविध लाभ हेही गुंतवणूकदारांना भुरळ पाडणारे आहेत. या योजनांच्या तळटिपेकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. तरुण वयात केलेली निवृत्तीसाठीची गुंतवणूक ही पश्चातापाची ठरता कामा नये. तर ती अधिक परतावा देणारी असावी, असेच कुणालाही वाटणे स्वाभाविक आहे.
‘रिटायर अॅण्ड फन’ हे कोणत्याही विमा कंपनीच्या पॉलिसीचे नाव नाही. हे आहे एका विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या सुपिक मेंदूमधून (की प्रगत सॉफ्टवेअरपासून) तयार झालेले, त्या कंपनीच्या अनेक पॉलिसींची सरमिसळ करून बनविलेले एक हायब्रिड प्रॉडक्ट. (अशाप्रकारची अनेक उत्पादने सध्या बाजारात उपलब्ध आहेत.) यामधील विविध प्रकारचे लाभ कोणत्याही गुंतवणूकदाराला भुरळ घालतील असेच आहेत.
१. आयुष्यभरासाठीचे – शंभरीपर्यंतचे विमाछत्र.
२. अपघाती मृत्यूच्या संभावनेमध्ये वाढीव विमाछत्र.
३. पारंपरिक निवृत्तीवेतनची सुविधा.
४. प्राप्तीकरमुक्त निवृत्तीवेतन योजना वगैरै वगैरै.
या हायब्रीड उत्पादनांच्या माहिती पत्रकामध्ये गुंतवणूकदारांच्या सवज्ञ समस्यांची इतकी बारकाईने काळजी घेतली आहे की ‘बस्स. माझे आर्थिक ध्येय साध्य करण्यासाठी आयुष्यात मला दुसऱ्या कशाचीही गरज नाही’, असा समज होतो.
१. प्रत्येकजण केव्हातरी निवृत्त होत असतो.
२. निवृत्ती म्हणजे कामाचा शेवट असतो आणि घरकामाची सुरुवातही असते.
३. निवृत्ती म्हणजे तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, तुमच्या कुटुंबियांसाठी आणि मित्र परिवाराला देण्यासाठीचा भरपूर वेळ. तुमच्या नोकरीच्या कालावधीत जे करू शकलो नाही त्याची भरपाई करण्याची ही संधी.
४. तुम्ही तुमच्या नोकरीमधील किंवा व्यवसायामधून निवृत्त होता. परंतू आयुष्यातून नाही.
५. बहुतांश लोक निवृत्तीच्या जवळपास पोहोचले की जागे होतात आणि नियोजन सुरू करतात.
६. वाढलेल्या ‘लाईफ एक्स्पेक्टन्सी’मुळे प्रत्येकाच्या निवृत्तीकाळही वाढला आहे.
७. प्रत्येकाला पुढील गोष्टींचा सामना करणे अपरिहार्य आहे –
अ. दिवसेंदिवस वाढच चाललेली भाववाढ.
ब. वाढत चाललेला महिन्याचा खर्च.
क. कमी होत चाललेले बँकांचे व्याजदर.
ड. आकाशाला भिडलेला वैद्यकीय उपचारांचा खर्च.
८. तुमच्या निवृत्तीनंतरचा २५ ते ३० वर्षांचा काळ आताच्या ‘स्टॅण्डर्ड ऑफ लिव्हिंग’मध्ये व्यतीत करायचा असेल तर कमाईच्या काळामध्ये बचतीची पूर्ण रक्कम कोणत्याही ठोस परताव्याच्या पर्यायामध्ये गुंतवणूक करून चालणार नाही. अशाप्रकारे जमा केलेली पूंजी ७ ते ८ वर्षांमध्ये संपून जाते.
९. तुमच्या आजोबांपेक्षा तुम्ही जास्त काळ जगणार आहात आणि तुमची निवृत्ती मात्र त्यांच्यापेक्षा लवकर होणार आहे. थोडक्यात, तुमच्या बाबतीत बिनकमाईमध्ये व्यतीत करण्याचा काळ तुमच्या आजोबांपेक्षा जास्त असणार आहे.
१०. सर्वसाधारणपणे नवरा हा बायकोपेक्षा वयाने जास्त असतो आणि आजारपण किंवा मृत्यू या दोन्ही गोष्टींची संभावना त्याच्याबाबत जास्त असते. अशा परिस्थितीत जेव्हा तुमचे कुटुंब तुमच्यापेक्षा जास्त काळ जगणार आहे तेव्हा त्यांच्या आर्थिक गरजांची पूर्तता कोण करणार?
११. वैद्यकीय उपचारांच्या बाबतीत म्हणाल तर तो खर्च १५ वर्षांमध्ये सुमारे चौपट होतो. तुमचे वय जस जसे वाढत जाणार त्यानुसार तुमच्या डॉक्टरकडच्या फेऱ्याही वाढत जाणार. त्यामुळे तुमची पुंजी घटत जाणार.
या माहितीपत्रकाचा शेवट केला आहे ५ प्रश्न विचारून –
अ. तुम्ही तुमच्या निवृत्ती कालावधीसाठी नियोजन केले आहे काय?
ब. तुमच्यानंतर तुमच्या कुटुंबाची आर्थिक कुचंबणा होऊ नये म्हणून तुम्ही पुरेशी काळजी घेतली आहे का?
क. तुमच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी पुरेशी पुंजी आहे का?
ड. वाढत जाणाऱ्या आकस्मिक खर्चासाठी आपण काही तरतूद केली आहे का?
इ. हे सर्व साध्य करण्यासाठी तुम्ही काही उपाययोजना केली आहे का?
माहितीपत्रकात जे काही नमूद केले आहे तो प्रयत्न खरोखरच स्तुत्य आहे. खरे तर खुद्द माझ्या आई-वडिलांनी तरी माझ्या भविष्याबद्दल इतक्या बारकाईने विचार केला असेल का, अशी शंकाही मनात येऊ शकते. इतपत खोलात जाऊ या ठिकाणी भविष्यातील सर्व प्रकारच्या समस्यांच्या बाबतीत आगाऊ खबरदारी घेतलेली आहे. परंतू ते सर्व काही साध्य करण्यासाठी जो मार्ग दाखविला आहे तो अतिशय अंधुक आहे. प्रत्यक्षात ‘लाईफ ऑफ अॅक्शन’ काय असणार आहे त्याचे विवरण कोठेही केलेले नाही.
२४ वर्षे वय असलेल्या व्यक्तीला हे ‘इलेस्ट्रेशन’ दिलेले आहे. त्यात ठळक शब्दांमध्ये लिहिलेले आहे की, हे प्रेझेन्टेशन ८.१८%चा परतावा गृहित धरून बनविलेले आहे’. त्याचबरोबर प्रत्येक पानाच्या शेवटी छोटय़ा ‘फॉण्ट’मध्ये एक ‘नोट’ छापली आहे –
* रिटायर अॅण्ड फन हा एलआयसीचा प्लॅन नाही. हे एलआयसीच्या अनेक स्कीमचे कॉम्बिनेशन आहे. त्यामध्ये निवृत्तीनंतर प्राप्तीकरमुक्त, हाय रिटर्न्स आणि हाय रिस्क कव्हर प्राप्त करून देण्याची सुविधा आहे.
* यामधील आकडेवारी काही गृहित गोष्टींवर आधारित आहे. सरकार किंवा कंपनीच्या धोरणांमध्ये भविष्यात काही बदल झाला तर ही आकडेवारी बदलू शकते.
या सूचनेनंतर ‘रिटायर अॅण्ड फन’ या पर्यायामध्ये प्रत्यक्षात एलआयसीच्या कोणत्या विम्याचा कशाप्रकारे समावेश केलेला आहे त्याचा तपशील दिला असता तर गुंतवणूकदाराला आपण प्रत्यक्षात कोणकोणत्या विमा योजनांमध्ये पैसे गुंतवितो आहे त्याची कल्पना आली असती. आणि दुसऱ्या कुणा तज्ञांचे ‘सेकंड ओपिनिअन’ घेता आले असते. कोणत्याही वित्तीय योजनांमध्ये पारदर्शकता असणे आवश्यक आहे. या ‘रिटायर अॅण्ड फन’मध्ये हे अजिबात जाणवत नाही.
त्यानंतर या ‘इलस्ट्रेशन’मध्ये गुंतवणूकदाराने किती गुंतवणूक केली तर काय लाभ मिळण्याची शक्यता आहे त्याची आकडेवारी दिलेली आहे.
२४ वर्षांच्या प्रकाश या तरुणाने त्याच्या ५० व्या वर्षांपर्यंत (२७ वर्षे) दरवर्षी ६१,१४८ रुपये गुंतविले तर त्याला २६,१७,५०० रुपयांपासून ७०,२२,५०० रुपयांपर्यंतचे दरवर्षी वाढत जाणारे विमाछत्र प्राप्त होणार आहे. त्यानंतर ५१ व्या वर्षांपासून त्याच्या ७४ व्या वर्षांपर्यंत ५७,४५० रुपयांच्या वार्षिक प्रिमियमपासून घटत जाणारे वार्षिक प्रिमियम (शेवटचे १,७६१ रुपये) कंपनीकडे जमा केले तर प्रकाशचे विमाछत्र ७२,१८,४०० रुपयांपासूून वाढत जाऊन ६१ वर्षी सर्वात जास्त म्हणजे ८५,००,४०० रुपये इतके होते. त्यानंतर ते कमी कमी होत जाऊन ७४ व्या वर्षांपर्यंत ३०,३९,७०० रुपयांपर्यंत खाली येते. ७५ वर्षांपासून विमाछत्र २,५०,००० रुपये होते आणि प्रकाशच्या ९९ व्या वर्षांपर्यंत कायम राहते. त्याच्या खाली ‘जीवन आनंद’ या एलआयसीच्या विमा योजनेचा उल्लेख आहे. म्हणजे या हायब्रिड उत्पादनामध्ये २४ वर्षांच्या प्रकाशला देऊ केलेल्या ५१ वर्षांच्या कालावधीच्या २५ लाख रुपयांच्या विमाछत्राच्या ‘जीवन आनंद’ विमा योजनेचा समावेश तर नक्कीच आहे. इतर कोणकोणत्या विमा योजनांचा त्यामध्ये समावेश आहे त्याची कल्पना मात्र येत नाही.
टिप्पणी
विमाछत्राचा मूळ उद्देश हा पैसै कमाविणे हा नसून कमावत्य व्यक्तीच्या आकस्मिक मृत्यूच्या संभावनेमध्ये घरात येणाऱ्या पैशाचा स्त्रोत बंद होणाऱ्या ‘इनहस्ट रिस्क’चा सामना करण्यासाठी असतो. त्यामुळे सर्वसाधारणपणे ६० व्या वर्षांनंतर म्हणजे निवृत्तीनंतर जेवहा त्या व्यक्तीचे आर्थिक मूल्य शून्य होते तेव्हा विमाछत्र्याचीही गरज नसते. या विम्यामध्ये ७५ व्या वर्षांनंतर २५ लाख रुपयांच्या विमाछत्राला व्यावहारिकदृष्टय़ा काही किंमत नाही. वार्षिक १०% भाववाढ गृहित धरली तर प्रकाशच्या ७५ व्या वर्षांच्या मृत्यूच्या संभावनेमध्ये त्याच्या नामनिर्देशकाला मिळणाऱ्या २५ लाख रुपयांच्या रकमेची आजची किंमत होते १७,६०० रुपये आणि ९९ व्या वर्षांच्या २५ लाख रुपयांची आजची किंमत होते १,६२४ रुपये.
विश्लेषण
प्रकाश २४ व्या वर्षांपासून ५० व्या वर्षांपर्यंत म्हणजे एकंदर २७ वर्षे दरवर्षी ६१,१४८ रुपयांप्रमाणे एकूण १६,५०,९९६ रुपये प्रिमियमच्या स्वरुपात एलआयसीकडे जमा करतो. त्यामध्ये जीवन आनंदच्या वार्षिक ३८,७६३ रुपयांचा समावेश आहे. त्याची २७ वर्षांंची एकूण रक्कम होते ९,९२,६०१ रुपये म्हणजे त्या २७ वर्षांच्या काळात इतर विम्यासाठीच्या एकूण प्रिमियमची रक्कम होते ६,५८,३९५ रुपये (वार्षिक २४,३८५ रुपये.) सदर माहितीपत्रकामध्ये ८.१८% चा परतावा गृहित धरला आहे. म्हणजे त्या इतर विमा योजनांमध्ये ‘यूलिप’ या प्रकारच्या विमा योजनांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तसे जर असेल तर तो परतावा शेअर बाजारातील चढउतारावर अवलंबून आहे; म्हणजे त्याबाबतीत खात्री देता येत नाही. प्रकाशच्या ५१ व्या वर्षांनंतर त्याला स्वत:च्या खिशातून एक छदामही खर्च करण्याची गरज नाही. त्याच्या इतर विमा योजनांमधून मिळणाऱ्या मॅच्युरिटी किंवा परताव्यामधून त्याच्या ५१ ते ७४ वर्षांपर्यंतचे प्रिमियम भरण्याची सोय होणार आहे.
थोडक्यात, त्याला प्राप्त होणारे सर्व लाभ त्याच्या १६,५०,९९६ रुपयांच्या गुंतवणुकीपासून मिळणार आहेत.
पर्याय
प्रकाशने या ‘रिटायर अॅण्ड फन’ नावाच्या हायब्रीड उत्पादनाऐवजी सरळ सोपी ‘प्युअर टर्म पॉलिसी’ घेऊन बाकी रकमेची स्वत: गुंतवणूक केली तर काय लाभ मिळू शकतात ते पाहू –
एलआयसी ही कंपनी आज ९७.१% च्या ‘क्लेम सेटलमेन्ट रेश्यू’मुळे भारतात सर्वात जास्त सुरक्षित विमा कंपनी मानली जाते.
प्रकाशने त्या कंपनीची १ कोटी रुपयांच्या विम्याछत्र्याची ३५ वर्षांची ‘पुअर टर्म पॉलिसी’ घेतली तर त्याला दरवर्षी २८,१०० रुपयांइतकी प्रिमियमची रक्कम भरावी लागेल.
३५ वर्षांच्या एकूण प्रिमियमची रक्कम होते ९,८३,५०० रुपये. ‘रिटायर अॅण्ड फन’च्या तुलनेत प्रिमियमची बचत ६,६५,४९६ रुपयांपैकी १९,०७० रुपये त्याने दरवर्षी भविष्य निर्वाह निधीमध्ये (पीपीएफ) गुंतविले तर त्याच्या वयाच्या ५९ व्या वर्षी ३९,३१,६८३ रुपये इतकी गंगाजळी तयार झाली असती. प्रकाश याने भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या ‘क्लेम सेटलमेन्ट रेश्यू ९५.४४%) विमा कंपनीची ‘प्युअर टर्म पॉलिसी’ घेतली तर काय लाभ मिळाले असते त्याचे गणित –
ही कंपनी ३० वर्षांपेक्षा जास्ट टर्मची अशा प्रकारची विमा योजना देत नाही. प्रकाशने २४ व्या वर्षी १ कोटी विमाछत्राची ३० वर्षांच्या टर्मची आणि ३० व्या वर्षी ५० लाख विमाछत्राची ३० वर्षांच्या टर्मची अशा दोन विमा योजना घेतल्या तर ज्या काळात त्याच्यावर जास्त जबाबदाऱ्या आहेत अशा ३० ते ५४ वर्षांमध्ये त्याच्याकडे दीड कोटी रुपयांचे विमाछत्र तयार झाले असते.
एकूण प्रिमियमची रक्कम होते ५,५८,०८० रुपये. बचत १०,९२,९१६ रुपये (१६,५०,९९६-५,५८,०८०) ही रक्कम ३६,४३० रुपयांप्रमाणे ३० वर्षे भविष्य निर्वाह खात्यात गुंतविली तर प्रकाशच्या वयाच्या ५४ व्या वर्षी त्याच्याकडे ५२,०५,१०८ रुपयांची गंगाजळी तयार होऊ शकते. ती रक्कम प्राप्तीकर वजा जाता ६% परताव्याच्या गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये गुंतविली तर त्याला आयुष्यभर वार्षिक ३,१२,३०० रुपयांची प्राप्ती होऊ शकते.
थोडक्यात, प्रकाशच्या डोक्यावर जेव्हा जबाबदाऱ्यांचा डोंगर असेल तेव्हा त्याचे विमाछत्र असेल १.५ कोटी रुपये आणि जेव्हा त्या कमी होत जातील तेव्हा विमाछत्र असेल ५० लाख रुपये. आणि तो जेव्हा जबाबदाऱ्यांतून जवळजवळ मुक्त होईल तेव्हा त्याच्याकडे प्राप्तीकरमुक्त अशी सुमारे ५२ लाख रुपयांची गंगाजळी असेल.
संग्रहित लेख, दिनांक 17th Dec 2012 रोजी प्रकाशित
विमा विश्लेषण : ‘रिटायर अॅण्ड फन’
विमा क्षेत्रातील अनेक उत्पादने आज हायब्रीड प्रकारातील आहेत. त्यातील विविध लाभ हेही गुंतवणूकदारांना भुरळ पाडणारे आहेत. या योजनांच्या तळटिपेकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.

First published on: 17-12-2012 at 03:12 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retair and fun