scorecardresearch

‘करूया अर्थनिग्रह’ : भय इथले संपत नाही!

आर्थिक उद्दिष्टांवर आधारित गुंतवणुकांचे नियोजन करताना चलनवाढीच्या दरानुसार गणिते मांडावी लागतात.

भक्ती रसाळ bhakteerasal@gmail.com

म्युच्युअल फंडातील गुंतवणुका दीर्घकालीन असाव्यात हे तत्त्व गुंतवणूकदारांनी अनुसरलेच पाहिजे. मात्र ते अमलात आणताना, गुंतवणुका प्रदीर्घ काळ दुर्लक्षित किंवा वार्षिक आढावा न घेता चालू ठेवणेही तितकेच धोकादायक..

रुपयाचे ऐतिहासिक अवमूल्यन झाल्याने गेल्या पंधरवडय़ात भारतीय बाजारपेठेत आणखी एका अस्थिरतेला पूरक घटनेची भर पडली. युद्धाचे सावट, इंधन दरवाढ, चलनवाढ अशा दुष्टचक्रात बाजार अडकला आहे. जागतिक महामारीने आरोग्य आणीबाणीमध्ये आरोग्यविम्याचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून दिले. बाजारातील विक्रमी घोडदौडीनंतर, मागील सहा महिन्यांतील अनिश्चितता पाहता जोखीम व्यवस्थापनाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आर्थिक उद्दिष्टांवर आधारित गुंतवणुकांचे नियोजन करताना चलनवाढीच्या दरानुसार गणिते मांडावी लागतात.

चलनवाढीवर दीर्घमुदतील भांडवली बाजारच मात करू शकतो, हे सूत्र वादातीत असले, तरीही बाजारातील जोखमींचे मूल्यमापन न करता केलेली गुंतवणूक गुंतवणूकदाराच्या मानसिक ताणास कारणीभूत ठरू शकते. गेल्या सहा महिन्यांतील निर्देशांकांतील पडझड दहा ते पंधरा टक्के तोटय़ास कारणीभूत ठरली आहे. दीर्घकालीन गुंतवणूक चलनवाढीच्या वाईट प्रभावावर मात करू शकते, तसेच अस्थिर बाजारांतील चढ-उतारांवरही मात करू शकते, अशा ऐतिहासिक नोंदी उपलब्ध आहेत. परंतु चालू गुंतवणुकांचे अस्थिर वातावरणात पुनरावलोकन करणे क्रमप्रात असते. गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडातील गुंतवणुका दीर्घकालीन असाव्यात हे तत्त्व अमलात आणताना गुंतवणुका प्रदीर्घ काळ दुर्लक्षित किंवा वार्षिक आढावा न घेता चालू ठेवणे धोकादायकच आहे. गुंतवणुकांचे ठरावीक काळानंतर सातत्याने – परीक्षण करणे, त्यात बदललेल्या आर्थिक धोरणांनुसार आवश्यक सुधारणा करणे, स्वत:च्या जोखीम घेण्याच्या क्षमतांचा मागोवा घेणे अशा सर्वमान्य, शास्त्रशुद्ध आर्थिक नियमांना बगल देणे महागात पडू शकते.

गुंतवणूकदारांनी कारोनाकाळात अभूतपूर्व परतावा कमावला. मात्र जर निर्देशांकातील सकारात्मक झेप गृहीत धरून ‘अवास्तव परताव्यांची अपेक्षा’ ठेवून स्वत:च्या जोखीम क्षमतेपेक्षा जास्त जोखीम घेत वाढीव गुंतवणुका केल्या असतील तर येणारा काळ अशांचे मनोबल – खच्ची करणारा ठरणार आहे, असा आगाऊ इशारा द्यावासा वाटतो.

युद्धजन्य परिस्थितीमुळे भडकलेली महागाई, बऱ्याच अवधीनंतर वाढलेले व्याजदर, इंधन दरवाढ ही संकटे अल्पावधीत संपुष्टात येणारी नाहीत. सलग दोन वर्षे तेजीनंतर बाजार मंदीच्या दिशेने प्रवास करताना दिसत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर आर्थिक मंदीचे सावट घोंघावताना दिसत आहे. एकंदरीत वातावरण आव्हानात्मक आहे. सामान्य गुंतवणूकदाराने या आर्थिक आव्हानांना सामोरे जाताना, अनावश्यक खर्चावर आवर घालणे, मोठे खर्चीक उद्दिष्टे पुढे ढकलणे, प्रवास खर्चाना पर्यायी व्यवस्था शोधणे असे स्वत:च्या आवाक्यातील उपाय अमलात आणायला हवेत. आज त्याने स्वत:च्या चालू गुंतवणुकांचा डोळस अभ्यास करणेही क्रमप्राप्त आहे.

म्युच्युअल फंडातील चालू मासिक हप्ते, पोर्टफोलिओतील चालू फंडांतील जोखीम आणि परतावा यांचा आढावा घेऊन सदर पोर्टफोलिओ बाजारातील अस्थिरता आणि जोखीम यात समतोल साधत आहे काय याचाही आज फेरविचार त्याने करायला हवा.

म्युच्युअल फंड योजनांतील परतावा आणि जोखमींचे मूल्यमापन करू शकणारे ठोकताळे, आर्थिक सूत्र यांची मदत घेऊन गुंतवणुकांचा अभ्यास करणे सामान्य गुंतवणूकदारांना शक्य आहे. आज इंटरनेटच्या माध्यमांतून अशी अभ्यासपूर्ण माहिती उपलब्ध आहे. आर्थिक गुणोत्तरे, सांख्यिकी माहितीमुळे आर्थिक योजनांची वस्तुनिष्ठ पुनर्बाधणी शक्य आहे.

जोखीम आणि अस्थिरतेचे मूल्यमापन करणारी आर्थिक गुणोत्तरे :

i ) अल्फा

म्युच्युअल फंडांतील ‘अल्फा परतावा’ म्हणजे म्युच्युअल फंड योजनेशी संलग्न त्याच्या संदर्भ निर्देशांकाच्या तुलनेत कमावलेला ‘वाढीव परतावा’ सदर सूत्राद्वारे फंडाची कामगिरी पडताळणे शक्य होते.

ii ) कॅटेगरी स्टँडर्ड डिव्हिएशन (वर्गवारीचे प्रमाणित विचलन) :

एकाच समान वर्गवारीतील फंडांतील सरासरी जोखीमसापेक्ष अस्थिरता यांचा फंडाशी तुलनात्मक विचार करून चालू फंडातील अस्थिरतेचा अभ्यास करता येतो.

३) शार्प रेशो

शार्प रेशो म्हणजेच जोखीम घेतलेल्या फंडांची अस्थिरतेवर मात करताना नोंदविली गेलेली वाढीव कमाई होय. शार्प रेशोद्वारे जोखीम आणि परताव्यांचा अभ्यास करून फंडांच्या जोखीमविरहित परताव्याची तुलना करणे शक्य होते.

४) सोरटिनो रेशो

गुंतवणूकदारांनी घेतलेल्या वाढीव जोखमींतून बाजारातील अस्थिर काळातील लाभ जाणून घेण्यास हे गुणोत्तर उपयुक्त ठरते. जोखीम आणि अस्थिरता यांचे मूल्यमापन करणे या सूत्रामुळे शक्य आहे.

v ) रोलिंग रिटर्न्‍स

ठरावीक मुदत कालावधीतील म्युच्युअल फंडांची कामगिरी ‘रोलिंग रिटर्न्‍स’द्वारे तपासणे शक्य आहे. गुंतवणुकीवरील परतावा अभ्यासण्याकरिता ‘रोलिंग रिटर्न्‍स’ जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.

बाजारातील मंदीच्या काळात गुंतवणूक आणि गुंतवणूकदारांची खरी कसोटी पणाला लागत असते. तेजीपेक्षा हा कसोटी काळ म्युच्युअल फंड योजनांची गुणवत्ता आणि दर्जा ठरविण्यास सुयोग्य काळ आहे. * लेखिका पात्रताधारक वित्तीय नियोजनकार आणि व्यावसायिक विमा सल्लागार

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Returns and risks in mutual fund schemes zws

ताज्या बातम्या