प्रासंगिक : ‘आयपीओ’ची मोहक लाट : अविश्वास नको, पण सजगता आवश्यक!

गेल्या वर्षभरात भांडवली बाजारासह, नवखे आणि सरावलेले गुंतवणूकदारही जोशात आहेत.

गौरव मुठे

गेल्या वर्षभरात भांडवली बाजारासह, नवखे आणि सरावलेले गुंतवणूकदारही जोशात आहेत. जानेवारीपासून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत भांडवली बाजाराने १०,००० अंशांहून अधिक कमाई केली आहे. जानेवारी २०२१ मध्ये सेन्सेक्सने ४७,७५१ अंशानी सुरुवात केली होती तर ऑक्टोबर महिन्यात ६२,२४५.४३ अंशांची ऐतिहासिक सर्वोच्च पातळीला स्पर्श केला. करोनामुळे अर्थचक्रावर प्रतिकूल परिणाम झाल्याने अनेकांनी चालू वर्षांत एक-अंकी परताव्याची भविष्यवाणी केली होती. मात्र सर्व अंदाज चुकीचे ठरवत सेन्सेक्सने सुमारे २३ टक्कय़ांहून अधिक परतावा दिला आहे.

चालू वर्षांत देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूकदारांनी एकत्र येऊ न बाजाराला विक्रमी पातळीवर नेले. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २०२१ मध्ये ५०,००० कोटींहून अधिक गुंतवणुकीचा ओघ भांडवली बाजाराकडे वळविला, तर म्युच्युअल फंडांनी भांडवली बाजारात २०,००० कोटींहून अधिक खरेदी केली. याशिवाय, गेल्या १८ महिन्यांत विक्रमी संख्येने दाखल झालेल्या नवीन गुंतवणूकदारांनी आक्रमक पद्धतीने भांडवली बाजारात गुंतवणूक केली. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्राथमिक बाजारात प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) माध्यमातून कंपन्यांनी चालू वर्षांत शंभरहून अधिक लहान मोठय़ा कंपन्यांनी १ लाख कोटी रुपयांहून अधिक भांडवल उभारणी केली आहे. चालू वर्षांत प्रारंभिक समभाग विक्री करणाऱ्या कंपन्यांमध्ये मुख्यत: तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांचा समावेश आहे. काही कंपन्यांनी गुंतवणूकदारांच्या मत्तेत दुपटीने वाढ केली आहे. यामुळे गेल्या काही महिन्यांमध्ये बाजारात नव्याने प्रवेश केलेले गुंतवणूकदारांचे कळप मोठय़ा प्रमाणावर या प्रारंभिक समभाग विक्रीला हातभार लावत आहेत. झिरोधा, अपस्टॉक किंवा ग्रो सारख्या स्मार्टफोनच्या माध्यमातून नगण्य दलाली आकारून समभाग खरेदी विक्रीची सोय उपलब्ध करून देणाऱ्या भांडवली बाजारातील दलालांमुळे  महानगरेच काय पण छोटी शहरे आणि गावांमधील लोक देखील बाजारातील जोखमीचा अभ्यास न करता किंवा जोखीम समजून न घेता बाजारातील तेजीचा वाटेकरी होण्यासाठी मेंढय़ाच्या कळपाप्रमाणे एकामागे एक चालले आहेत. मात्र तेजीमध्ये ‘आयपीओ’ म्हटल्यावर जोरदार गाजावाजा होतो. मग डिमॅटसाठी धावपळ सुरू होते. गुंतवणूकदारांच्या या मानसिकतेमुळेच अनेक आयपीओंना अपेक्षेपेक्षा उदंड प्रतिसाद लाभला आहे. भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’कडून गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेऊ न यावर चाप लावण्याची वेळ आली आहे.

‘रिलायन्स पॉवर’कडून धडा

यापूर्वी खूप गाजावाजासह रिलायन्स पॉवरचा ‘आयपीओ’ जानेवारी २००८ मध्ये खुला झाला होता. त्याआधीच्या आठवडय़ात गुंतवणूकदारांनी डिमॅट खाती उघडण्यासाठी गर्दी केली. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात एकूण पाच लाखांवर डिमॅट अकाऊंट उघडली गेली. प्रत्यक्षात सूचिबद्धतेला या ‘आयपीओ’ने गुंतवणूकदारांचा भ्रमनिरास केला. बाजारात गेली कित्येक वर्षे चांगला परतावा मिळवून दिलेले अनेक नामांकित कंपन्यांचे समभाग उपलब्ध आहेत. मात्र या कंपन्यांकडे सर्वसामान्य गुंतवणूकदार दुर्लक्ष करतात, लहान कालावधीत मोठा नफा पदरी पाडून घेण्यासाठी कंपन्यांबद्दल अधिक माहिती नसताना देखील त्यात गुंतवणूक केली जाते.

सेबी’चा स्वागतार्ह प्रस्ताव

भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने प्राथमिक बाजारात अधिक पारदर्शकता आणि गुंतवणूकदारांच्या प्रति उत्तरदायित्व आणण्यासाठी ‘आयपीओ’संबंधी नियमांमध्ये बदल करून ते अधिक कठोर करण्याचा प्रस्ताव आणला आहे. चालू वर्षांत कंपन्यांकडून ‘आयपीओ’द्वारे आतापर्यंत सुमारे एक लाख कोटींचा निधी उभारण्यात आला आहे. तंत्रज्ञानाधारित नवउद्यमी (स्टार्टअप) उपक्रम अर्थात झोमॅटो किंवा पेटीएमसारख्या कंपन्या तोटय़ात असतानाही मोठा निधी उभारतात. कंपन्यांची भविष्यातील कामगिरी उल्लेखनीय राहील याबाबत आपण सर्व आशावादी राहूया. मात्र कंपन्यांकडून ‘आयपीओ’साठी दाखल करण्यात येणाऱ्या मसुदा प्रस्तावात अर्थात ‘डीआरएचपी’मध्ये निधीचा विनियोग भविष्यातील अधिग्रहण, नवीन व्यवसाय उपक्रमांमध्ये गुंतवणूक आणि धोरणात्मक भागीदारी यासाठी करण्याचा उल्लेख असतो. मात्र कंपन्यांकडून निश्चित उद्दिष्ट मांडले जात नाही. शिवाय नवउद्यमी कंपन्यांचे विद्यमान गुंतवणूकदार ‘आयपीओ’च्या माध्यमातून स्वत:चा हिस्सा बाजारात सामान्य गुंतवणूकदारांकडे सोपवून अल्पावधीत कैकपट फायदा मिळवितात. यामुळे अल्पावधीत मोठा नफा मिळविण्याच्या आमिषाने भांडवली बाजाराकडे वळणारे हे गुंतवणूकदारांचे कळप रोखण्यासाठी ‘सेबी’ची पावले वळली आहेत.

खेळण्याच्या दुकानात गेलेल्या लहान मुलाला प्रत्येक खेळणे स्वत:कडे असावे असे वाटत असते. त्याचप्रमाणे तेजीत असलेल्या भांडवली बाजाराकडे बघून प्रत्येकाला आपण देखील प्रत्येक नवीन ‘आयपीओ’मध्ये गुंतवणूक केली पाहिजे असे वाटते. मात्र प्रत्येक ‘आयपीओ’ चांगला नफा देईल असे नाही. शेवटी अल्पकाळात मोठी जोखीम घेण्यापेक्षा प्रथितयश चांगल्या कंपन्यांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करून हमखास नफा पदरी पाडण्याचे सूत्र स्वीकारणे श्रेयस्कर. राष्ट्रीय शेअर बाजाराने सुचविल्याप्रमाणे – सोच कर, समझ कर, इन्व्हेस्ट कर! 

भांडवली बाजारात इतिहासातील सर्वात मोठय़ा समभाग विक्रीच्या सफलतेनंतर, गेल्या गुरुवारी (१८ नोव्हेंबर) ‘पेटीएम’च्या समभागांचे पदार्पण मात्र गुंतवणूकदारांसाठी स्वप्नभंग ठरले. मोठय़ा फायद्याच्या आशेने गुंतवणूक करणाऱ्यांना सूचिबद्धतेच्या दिवशी कंपनीचा समभाग २७ टक्कय़ांनी गडगडल्याचे पाहावे लागले. सुमारे तीन हजार कोटींचा व्यावसायिक तोटा नोंदविणाऱ्या कंपनीच्या समभागांची इतक्या चढय़ा मूल्यांकनाने विक्री कशी होऊ  शकली, अशी आता विश्लेषक चिंता व्यक्त करीत आहेत. मात्र त्याआधी घरोघरी खाद्यपदार्थाचा बटवडा करणारे व्यासपीठ असलेल्या झोमॅटोच्या समभागाने गुंतवणूकदारांना पदार्पणाच्या दिवशीच तब्बल ५१ टक्कय़ांची वाढ दाखविली. ‘आयपीओ’त बोली लावणाऱ्या गुंतवणूकदारांनी ७६ रुपयांना मिळविलेला हा समभाग सूचिबद्धतेच्या दिवशी ११५ रुपयांवर गेला.

म्हणजेच प्राथमिक बाजारात दाखल होणाऱ्या सर्वच कंपन्यांकडून गुंतवणूकदारांची निराशा होईल असे नाही. तेव्हा ‘आयपीओं’कडे अविश्वासाच्या नजरेने बघण्याची गरज नसून दक्षता आणि सजगता हवी.

प्राथमिक बाजारात आवश्यक सजगता..

गुंतवणूकदारांनी ‘आयपीओ’साठी अर्ज करताना पुन्हा मूलभूत नियमांची उजळणी करणे गरजेचे झाले आहे. 

* कंपनीचा व्यवसाय कुठला आहे? कुठे आहे? कंपनीचे प्रवर्तक कोण आहेत? कंपनीचा व्यवसाय कुठे चालतो? कंपनीची भूतकाळातील आणि वर्तमानातील कामगिरी कशी आहे? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवायला हवीत.

*  ‘सेबी’ अथवा ‘आयपीओ’चे व्यवस्थापन पाहणाऱ्या कंपन्यांच्या संकेतस्थळावर प्रसृत ‘निर्देश पुस्तिके’त (प्रॉस्पेक्ट्स) वरील माहिती उपलब्ध असते.

*  ‘आयपीओ’च्या वेळी समभाग वाजवी किमतीला मिळतात म्हणून गुंतवणूक करणे चुकीचे आहे. भविष्यात भांडवली बाजारात तो समभाग आणखी कमी किमतीला मिळू शकतो.

*  कंपन्यांकडून ‘आयपीओ’आधी बऱ्याचदा जाहिरातबाजी केली जाते. किंवा कंपनीच्या वस्तू आणि सेवांना किती मागणी आहे याचे चित्र रंगविले जाते. मात्र जाहिरातींतून कंपनीच्या खऱ्या कामगिरीचा अंदाज मिळेलच असे नाही.

*  कंपनीच्या भविष्यातील योजना, आर्थिक स्थिती, त्यातील सातत्य आणि ‘आयपीओ’चा उद्देश बघणे आवश्यक आहे.

* गुंतवणूकदारांकडून ‘आयपीओ’ खुला झाल्यानंतर त्याला प्रतिसाद किती मिळाला आहे यावरून गुंतवणुकीचा निर्णय घेतात. मात्र ‘आयपीओ’ला मोठा प्रतिसाद मिळाला म्हणजे तो गुंतवणूकयोग्य आहे, हा निकषही चुकीचा ठरू शकतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Seductive wave ipo distrust awareness ysh

ताज्या बातम्या