समीर नेसरीकर

सर्वसाधारणपणे चर्चेत नसणाऱ्या अशा म्युच्युअल फंडांमधील एका वेगळी वाटेची ही ओळख.. पुढे जाऊन गुंतवणूकदार स्वत:हून अधिक माहिती घेऊन, ही वाट निश्चितच अनुसरतील..

मागच्या शुक्रवारी रात्री आम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेलेलो. बाजूच्याच टेबलवर एका कॉलेजवयीन मुलाचं वाढदिवसाचं अभीष्टचिंतन चालू होतं.

‘डॅशिंग, स्मार्ट दिसतो आहेस या लुकमध्ये’, त्याच्या एका मित्राचा हा स्तुतीपर संवाद इराने (माझी मुलगी) लक्षात ठेवलेला.

जेवण आटपून घरी जाताना ती हळूच मला म्हणाली, ‘बाबा, अरे हा ‘स्मार्ट’ शब्द नक्की कुठे कुठे वापरतात? तू फोनवर कोणाशी तरी बोलताना हा शब्द यूज केलेलास, म्युच्युअल फंड रिलेटेड काही तरी होतं ना ते?’ त्यावर तिचे समाधान होईपर्यंत गप्पा रंगवत नेल्या. नंतर मनात विचार आला की हाच विषय आपण लेखातून मांडूया, म्हणून हा लेखप्रपंच, ‘स्मार्ट बीटा म्युच्युअल फंडां’विषयी. 

सर्वसाधारणपणे गुंतवणूकदारांना लार्ज कॅप फंड, मिड कॅप फंड, फ्लेक्झी कॅप या म्युच्युअल फंडांच्या श्रेणी माहिती झाल्या आहेत, परंतु ‘पॅसिव्ह इन्व्हेिस्टग’ प्रकारातल्या या ‘स्मार्ट बीटा’ फंडांविषयी अजून फारशी माहिती नाही. ‘स्मार्ट बीटा’ फंड हे ‘फॅक्टर इन्व्हेिस्टग’ या संकल्पनेच्या अंतर्गत येतात.

एक उदाहरण घेऊन स्पष्ट करतो, जेव्हा आपण ‘निफ्टी ५०’ किंवा ‘सेन्सेक्स’ या निर्देशांकांचा विचार करतो तेव्हा ते मार्केट कॅप (बाजार भांडवल मूल्य) या सर्वश्रुत ‘फॅक्टर’ (निकष) यावर आधारित असे निर्देशांक असतात. मार्केट कॅप म्हणजे ‘कंपनीचे समभाग’ गुणिले ‘समभागांची चालू किंमत.’ ज्या कंपनीचे ‘मार्केट कॅप’ जास्त, त्या कंपनीचा निर्देशांकातील बलभार जास्त. एप्रिल २०२२ च्या तपशिलानुसार ‘निफ्टी ५०’ मधील सर्वात मोठय़ा पाच कंपन्यांमध्ये प्रमाणानुसार अनुक्रमे, रिलायन्स, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी यांचा समावेश आहे.

‘मार्केट कॅप’ या घटकाच्या व्यतिरिक्त एका विशिष्ट निकषावर आधारित किंवा एका वेळेस दोन/तीन निकष घेऊन इंडेक्स / निर्देशांक बनविले जातात, त्यांना ‘स्ट्रॅटेजी इंडेक्स’ असे संबोधले जाते. ‘लो व्होलॅटॅलिटी, क्वालिटी, मोमेंटम, व्हॅल्यू’ अशा वेगवेगळय़ा निकषांवर आधारित असे हे इंडेक्स.

गेली अनेक वर्षे जगभरात परतावा कोणत्या कारणांमुळे येतो याचा अभ्यास चालू होता. १९६० च्या दशकात जॅक ट्रेनर, विल्यम शार्प आदींनी कॅपिटल अ‍ॅसेट प्रायसिंग मॉडेल (सीएपीएम) आणलं, त्यात असं म्हटलं होतं की, परताव्यास ‘एकच घटक’ कारणीभूत असतो. यावर संशोधन चालूच होतं आणि पुढे जाऊन स्टीफन रॉस या अमेरिकन अर्थशास्त्र पंडिताने १९७६ मध्ये ‘आर्बिट्राज प्रायसिंग थिअरी’वरील संशोधन अहवाल सादर करताना असं म्हटलं की, समभागातील परतावा या ‘वेगवेगळय़ा घटकांमुळे’ येतो, त्याचवेळेस खरं तर ‘फॅक्टर इन्व्हेिस्टग’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर जगभरात ही संकल्पना अधिक सुधारत गेली. भारतातही काही वर्षांपासून याबद्दल बोललं जातंय. एनएसई आणि बीएसई यांनी अशा प्रकारचे वेगवेगळय़ा फॅक्टर्सवर आधारित ‘स्ट्रॅटेजी इंडेक्स’ बाजारात आणले आहेत. म्युच्युअल फंड व्यवस्थापन कंपन्या अशा प्रकारच्या ‘स्ट्रॅटेजी इंडेक्स’वर आधारित इंडेक्स / एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) बाजारात आणतात, त्या फंडांना स्मार्ट बीटा इंडेक्स फंड/ स्मार्ट बीटा ईटीएफ असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, आपल्याला ‘लो व्होलॅटॅलिटी’ (कमी अस्थिरता) हा फॅक्टर आपल्या गुंतवणुकीत महत्त्वाचा वाटत असेल तर तुम्ही या फॅक्टर इंडेक्सवर आधारित फंडामध्ये गुंतवणूक करू शकता. 

मागील काही वर्षांचा मागोवा घेतला तर असं दिसतं की कोणताही एक ‘फॅक्टर’ नेहमीच पुढे राहील असं दिसत नाही, आळीपाळीने अग्रक्रम बदलत राहतोय. तेव्हा या श्रेणीतील गुंतवणूक तुमच्या जोखीम क्षमतेवर, आर्थिक उद्दिष्टांवर आणि अधिक अभ्यासाअंती करावी लागेल.

यूटीआय निफ्टी २०० मोमेंटम ३० इंडेक्स फंड, आयसीआयसीआय निफ्टी लो व्होल ३० ईटीएफ, कोटक निफ्टी अल्फा ५० ईटीएफ यासारखे अनेक स्मार्ट बीटा फंड आज बाजारात आहेत. काही ‘सिंगल फॅक्टर’ तर काही ‘मल्टी फॅक्टर’ स्मार्ट बीटा फंड आहेत. सर्वसाधारणपणे हे फंड जास्त चर्चेत नसतात, तरी ‘लोकसत्ता – अर्थ वृत्तान्त’च्या वाचकांना म्युच्युअल फंडांमधील एक वेगळी वाट कळावी आणि त्याबद्दल पुढे जाऊन स्वत:हून अधिक माहिती घेता यावी, यासाठीच हा शब्दसंचय. स्मार्ट फोन, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट बीटा म्युच्युअल फंड, या स्मार्ट शब्दाचा ‘प्रत्यय’ आपल्याला पुढे जाऊन आणखी कोणकोणत्या विषयात येईल या विचारासहितच तूर्त थांबू या.

अ‍ॅक्टिव्ह  पॅसिव्ह

स्ट्रॅटेजी इंडेक्सची काही उदाहरणे  – 

’ ‘निफ्टी २०० मोमेंटम ३०’ यात ‘नॉर्मलाइज्ड मोमेंटम स्कोर’ हा निकष घेऊन निफ्टी २०० निर्देशांकामधील पहिल्या ३० कंपन्यांवर (जास्त मोमेंटम असणाऱ्या) आधारित इंडेक्स बनविला जातो.

’ ‘निफ्टी १०० लो व्होलॅटॅलिटी’ ३०’ हा इंडेक्स, निफ्टी १०० निर्देशांकामधील ३० अशा कंपन्या निवडतो की ज्यांची ‘व्होलॅटॅलिटी’ (मागील एका वर्षांचा विचार करता अस्थिरता) सर्वात कमी आहे.

’ ‘निफ्टी अल्फा लो व्होलॅटॅलिटी ३०’ हा इंडेक्स बनवताना ‘अल्फा’ आणि ‘व्होलॅटॅलिटी’ या दोन निकषांचा आधार घेतला जातो. हे ३० समभाग, निफ्टी १०० निर्देशांक आणि निफ्टी मिडकॅप ५० निर्देशांकातून घेतले जातात.

साधारण अंदाज यावा म्हणून, स्ट्रॅटेजी इंडेक्स आणि निफ्टी ५०, निफ्टी २०० निर्देशांकांचा एप्रिल २०२२ अखेरीस ‘परतावा आणि जोखीम’ यांचा तुलनात्मक तक्ता देत आहे.

* (लेखक मुंबईस्थित गुंतवणूकविषयक अभ्यासक)

*  sameernesarikar@gmail.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.)