आशीष ठाकूर ashishthakur1966@gmail.com
साठ हजारांपार गेलेला सेन्सेक्स आणि १८ हजाराच्या वेशीवर पोहोचलेला निफ्टी निर्देशांक यांची नजीकच्या काळातील उच्चांक काय असतील? सामान्य गुंतवणूकदारांच्या दृष्टीने कळीच्या असलेल्या या प्रश्नांचे उत्तर आणि त्या उच्चांकांमागील गणिताचीही उकलही..
सरलेल्या सप्ताहातील बुधवारी निफ्टी निर्देशांकावर १७५ अंशांची घसरण झाल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या खऱ्या, पण त्याची भरपाई निफ्टीने गुरुवार आणि शुक्रवारी दररोज शतकी अंशांच्या तेजीची खेळी करत, बाजारात मंदीचा लवलेशही नाही व निफ्टी निर्देशांकाची १८,१०० च्या वरच्या लक्ष्याकडे वाटचाल चालू आहे हे निफ्टी निर्देशांक आपल्या कृतीतून सिद्ध करत आहे. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.
शुक्रवारचा बंद भाव :
सेन्सेक्स : ६०,०५९.०६
निफ्टी : १७,८९५.२०
आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकाचा १७,२०० चा स्तर हा महत्त्वाचा वळणबिंदू (टर्निग पॉइंट) ठरत आहे. या स्तरावर त्या, त्या वेळच्या निराशाजनक घटना, मग त्यात तालिबानचा अफगाणिस्तानवर कब्जा, चीनची बांधकाम क्षेत्रातील एव्हरग्रांड कंपनीची दिवाळखोरीची समस्या, अमेरिकी भांडवली बाजार ‘डाऊजोन्स’ची जवळपास दोन हजार अंशांची घसरण, या सर्व आर्थिक हादऱ्यांमध्येदेखील निफ्टी निर्देशांक १७,२०० चा स्तर राखून होता. या स्तरालाच अधोरेखित करत आणि त्याचा मोठय़ा खुबीने वापर करत निर्देशांकाचा संभाव्य उच्चांक काढू या.
तूर्त निफ्टी निर्देशांकांचा १७,२०० हा भरभक्कम आधार अथवा कोणत्याही पडझडीच्या प्रसंगातील नीचांक मानल्यास, निफ्टी निर्देशांकांचा संभाव्य उच्चांक काय असेल? यासाठी अगोदर विकसित केलेले तेजीच्या दिवसांत उच्चांकापासून १,००० ते १,२०० अंशांच्या घसरणीच्या गृहीतकाचाच आधार येथेही घेऊ या. त्या आधारे, आताच्या संभाव्य नीचांकात.. १७,२०० अधिक १,००० अंश १८,२०० आणि १७,२०० अधिक १,२०० अंश म्हणजे १८,४०० चा उच्चांक असू शकेल. असे नीचांकापासून उच्चांकापर्यंतच उलटे गणित मांडले व या गृहीतकाचा ठोकताळाही (क्रॉस टॅली) करता येऊ शकेल. काळाच्या कसोटीवर उतरलेला निफ्टी निर्देशांकाच्या ३०० अंशांच्या परिघातील संक्रमणाशी म्हणजेच १७,२००.. १७,५००.. १७,८००.. १८,१००.. १८,४०० शी तो साधम्र्य साधत आहे.
उपरोक्त स्तरावरून एक हलकीफुलकी घसरण आल्यास, गुंतवणूकदारांच्या मनातली सततची भीती.. आता आपण उच्चांकी स्तरावर समभाग खरेदी करत आहोत, आपण खरेदी केल्यावर बाजार कोसळला तर? या विवंचनेला ही हलकीफुलकी घसरण हे उत्तर असेल. या घसरणीनंतर सर्वच गुंतवणूकदार खुल्या दिलाने, निर्भयपणे बाजारात काम करतील अशी अपेक्षा ठेवू या.
निकालपूर्व विश्लेषण
१) इन्फोसिस टेक्नॉलॉजीज लिमिटेड
* तिमाही निकाल – बुधवार, १३ ऑक्टो.
* ८ ऑक्टोबरचा बंद भाव- १,७२३.५५ रु.
* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,६५० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,६५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,८०० रु., द्वितीय लक्ष्य १,८५० रु.
ब) निराशादायक निकाल : १,६५०चा केंद्रबिंदू स्तर तोडत १,५५० पर्यंत घसरण.
२) विप्रो लिमिटेड
* तिमाही निकाल – बुधवार, १३ ऑक्टो.
* ८ ऑक्टोबरचा बंद भाव – ६६१.३० रु.
* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ६३० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ६३० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ६७५ रुपये, द्वितीय लक्ष्य ७०० रुपये.
ब) निराशादायक निकाल : ६३० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ५९० पर्यंत घसरण.
३) सेंच्युरी टेक्सटाइल
* तिमाही निकाल – गुरुवार, १४ ऑक्टो.
* ८ ऑक्टोबरचा बंद भाव – ९३६.६० रु.
* निकालोत्तर केंद्रबिंदू स्तर – ९०० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ९०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ९७० रुपये, द्वितीय लक्ष्य १,०२० रुपये.
ब) निराशादायक निकाल : ९०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ८३० पर्यंत घसरण.
४) अॅव्हेन्यू सुपरमार्ट (डी मार्ट)
* तिमाही निकाल – शनिवार, १६ ऑक्टो.
* ८ ऑक्टोबरचा बंद भाव – ४,४०८ रु.
* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – ४,२०० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४,२०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४,६०० रु., द्वितीय लक्ष्य ४,८०० रु.
ब) निराशादायक निकाल : ४,२०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ३,९०० रुपयांपर्यंत घसरण.
५) एचडीएफसी बँक लिमिटेड
* तिमाही निकाल – शनिवार, १६ ऑक्टो.
* ८ ऑक्टोबरचा बंद भाव – १,६०२ रु.
* निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर – १,५५० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,५५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,६५० रु., द्वितीय लक्ष्य १,७५० रु.
ब) निराशादायक निकाल : १,५५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत १,५०० रुपयांपर्यंत घसरण.
लेखक भांडवली बाजार विश्लेषक
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.