सुधीर जोशी sudhirjoshi23@gmail.com

मात्र खरेदीची संधी साधताना समभागांची निवड चोखंदळ हवी..

सरलेल्या सप्ताहाच्या सुरुवातीलाच रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँकेच्या जाहीर झालेल्या दमदार निकालांनी भांडवली बाजाराची सुखद सुरुवात झाली. मात्र नंतरच्या दिवसांत कंपन्यांचे निकाल जाहीर झाल्यावर कंपन्यांनी उत्पादन आणि सेवांच्या विक्रीत वाढ नोंदवली असली तरी बऱ्याचशा कंपन्यांची घटलेली नफा क्षमता पाहून गुंतवणूकदार निराश झाले. परदेशी गुंतवणूकदारांचे विक्रीचे धोरण, काही देशांत करोनाचा पुन्हा सुरू झालेला संसर्ग यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारात नफावसुलीला प्राधान्य दिले. वायदे बाजारासाठी महिन्याचा शेवटचा सप्ताह असल्यामुळे बाजारात अस्थिरतेचे प्रमाण अधिक राहिले. आणखी एका आठवडय़ाची अखेर सेन्सेक्स व निफ्टीमध्ये अडीच टक्कय़ांच्या घसरणीने निराशाजनक झाली.

कोफोर्ज – माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील या कंपनीने दुसऱ्या तिमाहीत प्रति समभाग वीस रुपयांचे उत्पन्न (ईपीएस) मिळविले आहे, जे गेल्या वर्षांतील तिमाहीच्या तुलनेत तिप्पट आहे. युरोपातील काही कंत्राटी मिळकत पुढील तिमाहीत विचारात घेतली जाणार असल्याने येत्या तिमाहीचे निकाल आणखी चांगले असतील. व्यवस्थापकीय मंडळाने मिळकतीत ३५ टक्कय़ांचा वार्षिक वाढीचा अंदाज वर्तवला आहे. या सप्ताहात बाजारभावात झालेली ९ टक्क्यांची घसरण ही सहा महिन्यांच्या उद्दिष्टासाठी गुंतवणुकीची संधी आहे.

कॉनकॉर – कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने मागील वर्षांतील तिमाहीच्या तुलनेत या वर्षांतील दुसऱ्या तिमाहीत उत्पन्नात २१ टक्के, तर नफ्यात ४१ टक्के वाढ साधली आहे. कंपनीने चार रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. रेल्वेने होणाऱ्या कंटेनर वाहतुकीमध्ये मक्तेदारी असल्यामुळे कंपनी वाढता खर्च वाहतुकीचे दर वाढवून वसूल करू शकते. मालवाहतुकीच्या इतर पूरक क्षेत्रांतही कंपनी व्यवसाय वाढवीत आहे. रेल्वेने वाहतूक करण्यासाठी समर्पित मार्ग तसेच कंटेनरची दुमजली वाहतूक योजना यामुळे वेळेची बचत होऊन मालाच्या रेल्वेने होणाऱ्या वाहतुकीस व्यावसायिकांकडून प्राधान्य मिळत आहे. वर्षभरात कंपनीच्या खासगीकरणाच्या प्रयत्नांना वेग येईल. सध्याचा भाव वर्षभराच्या गुंतवणुकीसाठी आकर्षक आहे.

ओरिएंट इलेक्ट्रिक – कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीत संचित मागणीमुळे विक्रीत ३७ टक्के वाढ झाली आहे. मात्र उत्पादन घटकांच्या वाढत्या किमतीमुळे नफ्यात तिने फक्त सात टक्केच वाढ नोंदविली आहे. पुढील तिमाहीत सणासुदीच्या मागणीचा व गृह उद्योगातील वाढीचा कंपनीला फायदा मिळेल. कंपनीचा उत्पादित मालाचा साठा वाढला असला तरी कंपनीच्या रोकड सुलभतेवर त्याचा परिणाम झालेला नाही. याच क्षेत्रातील हॅवेल्स व क्रॉप्टनच्या तुलनेत कंपनीचे समभाग आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत.

बजाज फायनान्स – कंपनीने तिमाही नफ्यात गेल्या वर्षांच्या तुलनेत ५३ टक्के, तर आधीच्या तिमाहीच्या तुलनेत ४८ टक्के वाढ साध्य केली आहे, जी अतिशय आकर्षक आहे. कंपनीचे नवे कर्ज वितरणाचे प्रमाण जवळजवळ दुप्पट झाले आहे. गेल्या वर्षांत कंपनीच्या समभागांत १३१ टक्के वाढ झाली होती. अनेक वित्तीय संशोधन व दलाली पेढय़ांनी कंपनीच्या समभागांचे पुढचे लक्ष्य नऊ  हजार वर्तविले आहे. सध्याच्या घसरणीत दीर्घ मुदतीसाठी खरेदी करता येईल.

एमजीएल – महानगर गॅस लिमिटेड या मुंबई व आसपासच्या भागांत इंधन वायुपुरवठय़ावर मक्तेदारी असणाऱ्या कंपनीच्या तिमाही निकालांवर वाढलेल्या गॅस किमतीचा परिणाम झाला. त्यामुळे गॅसविक्री करोनापूर्व काळाच्या पातळीत आली तरी नफ्याचे प्रमाण कमी झाले. शाळा, कार्यालये व पर्यटन पूर्ववत सुरू झाले की सीएनजी बसेसचा वापर वाढेल. कंपनीला देशातील इतर कंपन्यांकडून मिळणाऱ्या गॅसमध्येही वाढ होईल व कंपनीची नफा क्षमता पूर्वीसारखी होईल, असा कंपनीच्या संचालकांना विश्वास वाटतो. सध्याच्या भावामध्ये विरोधाभासी गुंतवणूक म्हणून कंपनीचा विचार करता येईल.

एसबीआय लाइफ – कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे दमदार निकाल जाहीर केले. कंपनीचा व्यवसाय खासगी क्षेत्रातील तुल्यबळ कंपन्यांपेक्षा चांगला झाला. नवीन विमा पॉलिसींमध्ये ७१ टक्के वाढ झाली. तसेच त्यावरील नफ्याचे प्रमाणही चांगले होते. अधिक नफा देणाऱ्या बचत विमा (युलिप) योजनांमध्येदेखील ६७ टक्के वाढ झाली. मात्र करोनामुळे आलेल्या जास्तीच्या दाव्यांमुळे निव्वळ नफ्यात घट झाली. पुढील काळात दाव्यांचे प्रमाण कमी होईल व त्यासाठी तरतूदही केलेली आहे. वर्षभराच्या मुदतीसाठी सध्याचा भाव खरेदीसाठी आकर्षक आहे.

आयआरसीटीसी – आयआरसीटीसीच्या बाबतीत सरकारी कंपन्यांच्या गुंतवणुकीतील जोखीम पुन्हा एकदा अधोरेखित झाली. सुविधा फीचा ५० टक्के वाटा रेल्वेला देण्याच्या रेल्वे मंत्रालयाच्या ताज्या आदेशामुळे गुंतवणूकदार नाराज झाले व कंपनीच्या समभागात पुन्हा एकदा विक्रीची लाट आली. मात्र लगेचच निर्णय मागे घेण्यात आला. कंपन्यांच्या तिमाही निकालाबाबतची नाराजी, अर्थव्यवस्थेमधील रोकड तरलता कमी करण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडून होणारी रोखे खरेदी व अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हची व्याज दरांबाबत होणारी घोषणा यामुळे पुढील वाटचाल थोडी सावध असायला हवी. आघाडीच्या समभागांच्या खरेदीची संधी घेताना चोखंदळपणे निवड करायला हवी. क्षेत्रीय विचार करता पायाभूत सुविधा, माहिती-तंत्रज्ञान व बँकिंग क्षेत्रावर भर असायला हवा. या सप्ताहात पहिले तीन दिवसच बाजाराचे व्यवहार होतील व ४ तारखेला संध्याकाळी मुहूर्ताचे सौदे पार पडतील.