सुधीर जोशी

आधीच्या सप्ताहातील क्षणिक माघारीनंतर सरल्या सप्ताहात बाजाराने उत्तुंग भरारी घेतली. कंपन्यांच्या पहिल्या तिमाहीचे उत्साहवर्धक निकाल, इंधनाचे दर कमी झाल्यावर केंद्र सरकारने तेल शुद्धीकरण कंपन्यांवरील ‘विंडफॉल करा’त केलेली कपात, माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांमधील खरेदी, अन्नधान्य व खाद्यतेलाच्या किमतीतील घसरण व त्यामुळे एफएमसीजी कंपन्यांमध्ये झालेली खरेदी अशी अनेक कारणे या मागे आहेत. पण परदेशी गुंतवणूकदारांचे भारतीय बाजारात पुन्हा केलेले पदार्पण लक्षवेधी ठरले. शुक्रवारचा अपवाद वगळता परदेशी गुंतवणूकदारांनी सरल्या सप्ताहात प्रत्येक दिवशी खरेदी केली. औषध निर्मिती सोडता सर्वच क्षेत्रांत व्यापक तेजी पाहायला मिळाली. बाजाराचे प्रमुख निर्देशांक चार टक्क्यांनी वर गेले.

एचडीएफसी बँक : नव्या आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीचे बँकेने दमदार निकाल जाहीर केले. वार्षिक तुलनेत पहिल्या तिमाहीत तिने १९ टक्के जास्त नफा कमावला. कर्जामधील व ठेवींमधील वाढीने व्याजामधील नक्त वाढ १४ टक्के झाली. बँकेच्या क्रेडिट कार्ड व्यवसायावरील बंधने हटल्यामुळे त्या व्यवसायातही वृद्धी झाली. एकूण १२ लाख नवी कार्डे वितरित केली गेली. बँक शाखांची संख्या पंधराशे तो दोन हजाराने वाढवणार आहे. वाढत्या व्याजदरांमुळे बँकेच्या गंगाजळीतील रोख्यांच्या मूल्यात घट झाल्यामुळे नफ्यावर परिणाम झाला. एचडीएफसी लिमिटेड या पालक कंपनीबरोबरचे एकत्रीकरण बँकेच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा असेल. त्या दिशेने व्यवस्थित वाटचाल सुरू आहे. दीर्घ मुदतीच्या पोर्टफोलियोमध्ये ठेवण्यासारखा हा समभाग आहे. बाजाराच्या घसरणीत ते जरूर जमवावेत.

हिंदूस्थान युनिलिव्हर :  ग्राहकोपयोगी (एफएमसीजी) क्षेत्रातील या कंपनीने पुन्हा एकदा बाजारातील आपले नेतृत्व सिद्ध केले. पहिल्या तिमाहीतील वस्तूंच्या विक्रीत पाच टक्यांची घट होऊनही किमती वाढविण्याच्या ताकदीमुळे कंपनीने उत्पन्नामध्ये ७ टक्के व नफ्यामध्ये ११ टक्क्यांची वाढ साध्य केली. पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीला इंधन व पाम तेलाच्या वाढलेल्या किमतींचा सामना करावा लागला. या किमती आता आटोक्यात येत आहेत ज्याचा कंपनीला फायदा होईल. बाजारातील प्रत्येक घसरणीत हे समभाग दीर्घ मुदतीच्या पोर्टफोलियोसाठी खरेदी करता येतील.

आयसीआयसीआय लोम्बार्ड : विमा कंपन्यांसाठी गेल्या दोन वर्षांचा काळ कठीण होता. आरोग्य विम्याचे वाढलेले दावे, वाहन विक्रीतील मंदी यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. आता परिस्थिती बदलत आहे. आयसीआयसीआय लोम्बार्डला पहिल्या तिमाहीत ३४९ कोटी रुपयांचा नफा झाला जो आधीच्या वर्षांतील याच तिमाहीपेक्षा ८० टक्के जास्त आहे. भारती अक्साच्या अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम या आर्थिक वर्षांत दिसतील. भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने मोटार विम्याचे प्रीमियम ग्राहकानुरूप बदलते ठेवण्याची मुभा दिली आहे. त्याचा फायदा कंपनीला घेता येईल. कंपनीची या व्यवसायातील आघाडीची जागा, आयसीआयसीआय बँकेचे पाठबळ, उत्तम तंत्रज्ञानावर आधारित सेवा यामुळे दीर्घ मुदतीसाठी हा समभाग लाभदायक आहे.

एचएफसीएल : हिमाचल फ्युचरिस्टिक कम्युनिकेशन्स दूरसंचार क्षेत्रासाठी लागणाऱ्या विविध केबल्सचे उत्पादन करते. या शिवाय ही कंपनी दूरसंचार उपकरणे व संरक्षण क्षेत्रासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मितीच्या व्यवसायात पाय रोवत आहे. देशात लवकरच प्रचलित होणार असलेले ५ जी सेवेचे जाळे, ब्रॉडबँडचे जाळे, संरक्षण क्षेत्रासाठी सरकारचे देशी बनावटीच्या उत्पादनांना पसंती देण्याचे धोरण याचा कंपनीला फायदा होईल. मार्चअखेर आर्थिक वर्षांत कंपनीच्या नफ्यात ३० टक्के वाढ झाली होती. पुढील दोन ते तीन वर्षे कंपनीकडून अशीच प्रगती अपेक्षित आहे. सध्या ६० ते ७० रुपयांच्या पातळीत कंपनीच्या समभागात गुंतवणुकीची संधी आहे.

इंडसइंड बँक : बँकेने जाहीर केलेल्या तिमाही निकालांचे बाजाराने स्वागत केले. बँकेच्या तिमाही नफ्यात ६१ टक्के वाढ झाली. कर्जाची गुणवत्ता जरी खाली आली असली तरी बँकेने या आधीच पुनर्रचनेसाठी नोंद घेतलेल्या कर्जाचा त्यात समावेश होता. बँकेच्या वाहन कर्ज वाटपात, मोठय़ा उद्योगांना दिलेल्या कर्जात व क्रेडिट कार्डच्या व्यवसायात वाढ झाली. त्यामुळे बाजारातील विश्लेषकांनी बँकेच्या समभागांमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.

इंधन तेलाची दरवाढ आणि अन्नधान्य, खाद्य तेल व इतर कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती या महागाई वाढण्याच्या प्रमुख कारणांतून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. रशिया-युक्रेनमध्ये अन्नधान्य पुरवठय़ासाठी तह होत आहे, त्यामुळे इतके दिवस अडलेला पुरवठा पूर्ववत होऊन महागाई चढलेला पारा ओसरण्याची शक्यता आहे. असे झाले तर व्याजदर वाढदेखील फार तीव्र होणार नाही. शुक्रवारी बाजार बंद झाल्यावर रिलायन्स, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक असे महत्त्वाचे निकाल आले. या सप्ताहातही अनेक मिडकॅप कंपन्यांचे निकाल अपेक्षित आहेत. त्यामुळे बाजारातील उत्साह कायम असेल. परदेशी गुंतवणूकदारांनी खरेदी सुरू ठेवली तर बाजार आणखी मोठी मजल मारेल. बाजारात आलेल्या तेजीमध्ये काही प्रमाणात नफावसुली करणे मात्र जरुरीचे आहे. 

सप्ताहातील या घडामोडींकडे लक्ष ठेवा:

* अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हची व्याजदरासंबंधाने बैठक (२६-२७ जुलै).

* अनुपम रसायन, अ‍ॅस्टेक लाइफ सायन्सेस, अ‍ॅक्सिस बँक, कॅनरा बँक, सेंच्युरी टेक्सटाइल्स, चेन्नई पेट्रोलियम, ज्योती लॅब, ओरिएंट इलेक्ट्रिक, बजाज समूहातील कंपन्या, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, युनायटेड स्पिरिट्स, टाटा पॉवर, रिलॅक्सो फूटवेअर, एशियन पेंट्स, कोलगेट, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, सिप्ला, एचडीएफसी या कंपन्या मार्चअखेर तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

*  टेक मिहद्र, तान्ला प्लॅटफॉम्र्स, केपीआयटी टेक्नॉलॉजी, सोनाटा सॉफ्टवेअर या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या मार्चअखेर तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

*  सोनाटा सॉफ्टवेअर बोनस समभागांची घोषणा करेल.

sudhirjoshi23@gmail.com