प्रवीण देशपांडे
भांडवली नफा आणि करपात्र उत्पन्नावर ठरलेल्या दराने कर भरावा लागतो, हे सर्वाना ठाऊकच आहे. पण करदात्याला तोटा झाल्यास त्याचा करदात्याच्या करदायित्वावर काय परिणाम होतो हे बऱ्याच जणांना माहीत नाही, त्याबद्दलच जाणून घेऊ या..

आर्थिक व्यवहार हे फायद्याच्या किंवा नफ्याच्या उद्देशाने केले जातात. अशा आर्थिक व्यवहारात जसा नफा होऊ शकतो तसाच तोटादेखील होऊ शकतो. नफा झाल्यास आणि ते उत्पन्न करपात्र असल्यास ते उत्पन्नाच्या प्रकारानुसार उत्पन्नाच्या स्रोतात गणले जाते आणि त्यावर कर भरावा लागतो. करदात्याला तोटा झाल्यास त्याचा करदात्याच्या करदायित्वावर काय परिणाम होतो हे जाणून घेतले पाहिजे. करदात्याला तोटा झाल्यास हा तोटा करदात्याचे सध्याचे किंवा भविष्यातील करदायित्व कमी करू शकते. त्यासाठी कोणत्या अटी-शर्ती आहेत याची माहिती या लेखात दिली आहे.

loksatta satire article on arvind kejriwal mango eating controversy
उलटा चष्मा : पुन्हा आंबापुराण
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Gold Hits All Time High, 2400.35 doller an Ounce, global market gold price, global market gold high, all time gold high in world, Global Economic Uncertainty , gold,finance news, finance article, marathi news, vietnam, america,
सोन्याची विक्रमी तेजीची दौड कायम, जागतिक बाजारात प्रति औंस २,४००.३५ डॉलरचा उच्चांक
hepatitis disease (1)
‘हेपिटायटिस’ या संसर्गजन्य आजारामुळे दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू; हा आजार काय आहे? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय

एकसारख्याच उत्पन्नाच्या स्रोतातून प्रथम वजावट :
जसे करदात्याचे उत्पन्न पाच उत्पन्न स्रोतात विभागले जाते त्याचप्रमाणे तोटादेखील याच स्रोतात विभागला जातो. करदात्याला ज्या उत्पन्नाच्या स्रोतामध्ये तोटा झाला असेल तर तो प्रथम त्याच उत्पन्नाच्या स्रोतामध्ये झालेल्या नफ्यामधून तो वजा करता येतो. तथापि, याला काही अपवाद आहेत :अ) सट्टा व्यवहारातील (ज्या व्यवहारात मालाचा ताबा घेतला जात नाही) तोटा हा इतर उद्योग-व्यवसायातील उत्पन्नातून वजा करता येत नाही, तो फक्त सट्टा व्यवहारातील नफ्यामधूनच वजा करता येतो.
आ) घोडय़ाच्या व्यवसायातील तोटा हा फक्त घोडय़ाच्या व्यवसायातील उत्पन्नातूनच वजा करता येतो,
इ) लॉटरी, शब्दकोडे, पत्ते खेळ किंवा जुगार, बेटिंगमधील तोटा इतर कोणत्याही उत्पन्नातून वजा करता येत नाही.
ई) दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा हा फक्त दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो, अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येत नाही. अल्प मुदतीचा भांडवली तोटा मात्र दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून किंवा अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येतो.

इतर स्रोतातील उत्पन्नातून वजावट :
एका उत्पन्नाच्या स्रोतामध्ये झालेला तोटा त्याच स्रोतामधून वजा होत नसेल तर तो इतर स्रोतामधील उत्पन्नामधून वजा करता येतो. याला अपवाद खालीलप्रमाणे :
अ) भांडवली तोटा हा इतर स्रोताच्या उत्पन्नातून वजा करता येत नाही,
आ) उद्योग-व्यवसायातील तोटा पगाराच्या उत्पन्नातून वजा करता येत नाही,
इ) ‘घराच्या उत्पन्नातील’ तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येतो, परंतु फक्त २ लाख रुपयांपर्यंतचाच तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येतो,
ई) कोणत्याही उत्पन्नाच्या स्रोतामधील तोटा हा लॉटरी, शब्दकोडे, पत्तेखेळ किंवा जुगार, बेटिंगमधील उत्पन्नातून वजा करता येत नाही,
उ) कोणत्याही उत्पन्नाच्या स्रोतामधील तोटा हा घोडय़ाच्या व्यवसायातील उत्पन्नातून वजा करता येत नाही,
ऊ) करदात्याने नवीन करप्रणालीचा विकल्प (कोणतीही वजावट न घेता सवलतीच्या दरात कर भरण्याचा) निवडल्यास ‘घरभाडे उत्पन्न’ या सदरातील तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येत नाही.
ऋ) आभासी चलनाच्या व्यवहारात झालेला तोटा हा इतर उत्पन्नातून वजा करता येत नाही.

पुढील वर्षांसाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ :
एका उत्पन्नाच्या स्रोतामध्ये झालेला तोटा त्याच स्रोतामधून वजा होत नसेल आणि तो इतर स्रोतामधील उत्पन्नामधून वजा होत नसेल तर तो पुढील वर्षांसाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ करता येतो. यासाठीसुद्धा काही नियम आहेत. ज्या वर्षीचा तोटा पुढील वर्षांसाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ करावयाचा आहे त्या वर्षीचे विवरणपत्र मुदतीत दाखल करणे बंधनकारक आहे. याला अपवाद घरभाडे उत्पन्न या स्रोतातील तोटा हा आहे. विवरणपत्र मुदतीत दाखल केले नसले तरी या स्रोतातील तोटा पुढील वर्षांत ‘कॅरी-फॉरवर्ड’ करता येतो.

किती वर्षांसाठी आणि कसा वजा करता येतो :
‘घर भाडे उत्पन्न’, ‘उद्योग-व्यवसायातील उत्पन्न’, ‘भांडवली नफा’ या स्रोतातील तोटा त्याच स्रोतातील उत्पन्नातून किंवा इतर उत्पन्नातून वजा न झाल्यास पुढील ८ वर्षांसाठी ‘कॅरी फॉरवर्ड’ करता येतो. पुढील वर्षांमध्ये हा तोटा फक्त त्याच स्रोताच्या उत्पन्नातूनच वजा करता येतो, परंतु दीर्घ मुदतीचा भांडवली तोटा हा पुढील वर्षी फक्त दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातूनच वजा करता येतो. अल्प मुदतीचा भांडवली तोटा हा पुढील वर्षी दीर्घ आणि अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करता येतो.‘सट्टा व्यवसायातील तोटा’ हा त्याच वर्षीच्या सट्टा व्यवसायाच्या नफ्यातून वजा न झाल्यास पुढील ४ वर्षांसाठी तो ‘कॅरी फॉरवर्ड’ करता येतो, परंतु पुढील वर्षांमध्येसुद्धा हा तोटा फक्त सट्टा व्यवसायाच्या उत्पन्नातूनच वजा करता येतो.

वाचकांकडून आलेल्या प्रश्नांची उत्तरे :
प्रश्न : माझ्याकडे दोन घरे आहेत. एका घरात मी राहतो आणि दुसरे मी भाडय़ाने दिले आहे. या दोन्ही घरांवर मी गृहकर्ज घेतले आहे. मला गृहकर्जाच्या व्याजाची किती वजावट मिळेल? – सुरेश काळे, पुणे</p>

उत्तर : आपल्याकडील दोन घरांपैकी जे घर आपले राहते घर आहे त्यावर आपल्याला कमाल २ लाख रुपयांपर्यंत गृहकर्जावरील व्याजाची वजावट मिळेल. जे घर भाडय़ाने दिले आहे त्या घराच्या गृहकर्जावरील प्रत्यक्ष व्याजाची वजावट आपल्याला मिळेल. राहत्या घराचे उत्पन्न शून्य समजून व्याजाची वजावट आणि दुसऱ्या घराचे उत्पन्न, मालमत्ता कर, प्रमाणित वजावट आणि व्याजाची वजावट विचारात घेऊन आलेले उत्पन्न (किंवा तोटा) हे दोन्ही मिळून उत्पन्न नकारात्मक (म्हणजेच ‘तोटा’) असेल तर फक्त दोन लाख रुपयांचा तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येईल आणि तो पूर्ण वजा न झाल्यास पुढील वर्षांसाठी कॅरी-फॉरवर्ड करता येईल.

प्रश्न : मी एका भागीदारी संस्थेत भागीदार आहे आणि माझा वैयक्तिक स्वतंत्र व्यवसायदेखील आहे. भागीदारी संस्थेत तोटा झाला आहे. हा तोटा मी माझ्या वैयक्तिक व्यवसायाच्या नफ्यातून वजा करू शकतो का? – एक वाचक

उत्तर : भागीदारी संस्थेत झालेला तोटा हा फक्त भागीदारी संस्थाच ‘कॅरी-फॉरवर्ड’ करू शकते. हा तोटा भागीदाराच्या उत्पन्नातून वजा करता येत नाही.

प्रश्न : मी ज्येष्ठ नागरिक आहे. मला निवृत्ती वेतन आणि व्याजाचे उत्पन्न मिळते. मी यावर्षी माझे घर आणि काही गुंतवणूक विकली आणि मला साधारण ५० लाख रुपयांचा भांडवली नफा झाला. मला अग्रिम कर भरावा लागेल का? – प्रशांत, ठाणे</p>

उत्तर : आपण ज्येष्ठ नागरिक आहात, आपले करदायित्व १०,००० रुपयांपेक्षा जास्त असले तरी आपल्या उत्पन्नात उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्न्नाचा समावेश नसल्यामुळे आपल्याला उद्गम कराच्या तरतुदी लागू होत नाहीत. ही तरतूद फक्त ज्येष्ठ निवासी भारतीय नागरिकांनाच लागू आहे.

लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार
pravin3966 @rediffmail. Com