|| तृप्ती राणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझ्या लेखामधील निरनिराळे पोर्टफोलिओ आणि त्यात म्युचुअल फंड व शेअर असलेल्या पोर्टफोलिओंची कामगिरी पाहून एका वाचकाने त्यांची एक शंका विचारली. त्याने सरळ असं म्हटलं – ‘‘अहो, तुमचे लेख मी गेले काही महिने वाचतोय. त्यातील म्युचुअल फंड आणि शेअर्समध्ये असलेली गुंतवणूक तर तोटय़ात दिसतेय. मग म्युचुअल फंड आणि शेअर्समध्ये गुंतवणूक का करायची?’’

त्यांचा प्रश्न हा अगदी स्वाभाविक आहे आणि त्यांचासारखे अनेक जण असतील ज्यांना हा प्रश्न पडला असेल की शेअर बाजाराशी निगडित गुंतवणूक जर तोटा देते तर मग या फंदात न पडलेलं बरं! आपले जुने गुंतवणूक पर्याय (मुदत ठेव, विमा) बरे! आजचा हा लेख या शंकेच्या समाधानासाठी..

त्याआधी एक खुलासा करू इच्छिते की, हे पोर्टफोलिओ बनविताना एका सर्वसामान्य गुंतवणूकदाराचा विचार केलेला आहे – म्हणजे, सामान्यांकडून कशा प्रकारे गुंतवणूक केली जाते. यामध्ये वापरलेले म्युचुअल फंड किंवा शेअर्स हे प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत हे मी प्रत्येक वेळी सांगतेय. आणि यातून मी हे म्युचुअल फंड किंवा शेअर्स घेतले पाहिजेत असेही म्हणत नाहीय. कारण एखाद्या गुतंवणूकदाराचा पोर्टफोलिओ हा त्याच्या गरजेनुसार आणि जोखीम क्षमतेनुसार असायला हवा. लेखातील पोर्टफोलिओमार्फत फक्त हे दर्शवू इच्छिते की, आज जरी ‘म्युचुअल फंड सही है’चा गाजावाजा सारखा होत असला तरी त्यातील जोखीम काय आहे ते सामान्य गुंतवणूकदाराने समजून मगच निर्णय घ्यायचा आहे.

तर आता वळूया आपल्या मूळ प्रश्नाकडे. जोखीम असणाऱ्या शेअर बाजाराशी निगडित असलेली गुंतवणूक का करावी? शिवाय जोखीम जास्त आणि नुकसान हे समीकरण काही पटत नाही! तर आपण प्रथम हे समजून घेऊया की जोखीम फक्त शेअर बाजारातील गुंतवणुकीतच असते असं अजिबात नाही. आपल्याला वरकरणी सुरक्षित वाटणाऱ्या गुंतवणुकाही जोखीम बाळगून असतात बरं का.

वर दिलेल्या तक्त्यातून आपण त्यांचा थोडक्यात आढावा घेऊया.

तक्ता पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेलच की गुंतवणूक म्हटल्यावर कुठली न कुठली जोखीम ही आलीच. तेव्हा पोर्टफोलिओ बनवताना आणि त्याचा वेळोवेळी आढावा घेताना जोखीम व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे आहे. पोर्टफोलिओमध्ये तातडीच्या गरजेसाठी रोकड सुलभता हवी, नजीकच्या आर्थिक ध्येयांसाठी मुद्दल सुरक्षितता हवी, मधल्या काळासाठी माफक जोखमेतून परतावा हवा आणि दीर्घकाळासाठी जोखमीच्या अनुषंगाने वाढ हवी.

तेव्हा शेअर बाजाराशी निगडित कुठलीही गुंतवणूक करताना या सर्व बाबींचा विचार झाला पाहिजे. फक्त किंमत कमी-जास्त होत आहेत म्हणून या गुंतवणूक पर्यायाकडे पाठ फिरवणे योग्य नाही. खरं सांगायचं तर कुठलीही गुंतवणूक करताना तिच्यात काय नुकसान होऊ शकतं हे आधी बघावं आणि त्यानुसार आपल्या पोर्टफोलिओचं जोखीम व्यवस्थापन करावं आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे गुंतवणूकदाराचं स्वतचं मानसिक व्यवस्थापन!

(लेखिका सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

trupti_vrane@yahoo.com

Web Title: What is risk management in finance mpg
First published on: 19-08-2019 at 00:04 IST