प्रत्येक कमावत्या व्यक्तीने आयुर्विमा आणि आरोग्यविम्याचे कवच जरूर घेतले असेल, पण त्या बरोबरीने त्यांनी आणखी एक विमाछत्र मिळविणे अतिशय आवश्यक आहे. वैयक्तिक अपघात विमा (पर्सनल अॅक्सिडेंट इन्श्युरन्स) गरजेचे तर आहेत, पंरतु त्याचबरोबर ते अतिशय स्वस्तही आहे.
आकस्मिक दुर्घटना एखाद्या कुटुंबाची आíथक घडी उद्ध्वस्त करू शकते. या कायमस्वरूपी धोक्यावर मात करण्याचे एकमेव साधन म्हणजे वैयक्तिक अपघात विमा (पर्सनल अॅक्सिडेंट इन्श्युरन्स) होय. या प्रकारचे विमाछत्र प्रत्येक कमावत्या व्यक्तीजवळ असणे अतिशय आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे फार कमी लोकांना याच्या गांभीर्याची कल्पना असते. आज परिस्थिती अशी आहे की भारत देश हा अपघातांच्या बाबतीत जगात क्रमांक एकवर आहे. आपल्या देशात सरासरी दीड मिनिटाला एक अपघाती मृत्यू होतो. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या नोंदीनुसार भारतात २०१२ साली अपघातामुळे ३.४ लाख मृत्यू झाले.
जीवन विम्याच्या पॉलिसीमध्ये अपघाती मृत्यूच्या संभावनेमध्ये विमाछत्राची रक्कम त्या व्यक्तीच्या वारसाला दिली जाते. स्वास्थ्य विम्यामध्ये हॉस्पिटलचा खर्च वगरेची तरतूद केलेली असते. परंतु अपघातामध्ये व्यंगत्व आले किंवा विकलांगतेमुळे कमाई करण्याची क्षमता गमविण्याची वेळ आली तर काय? या पाश्र्वभूमीवर वैयक्तिक अपघाती विमा हे एक अनन्यसाधारण असे विमाछत्र आहे. अर्थात जीवन विम्याच्या काही पॉलिसींमध्ये अशा प्रकारच्या घटनांसदर्भात वेगळे रायडर्स असतात. परंतु त्या पॉलिसी फार खर्चीक असतात. सर्वसाधारणपणे अपघाती मृत्यूपेक्षा अपघातांमध्ये विकलांग झालेल्यांची संख्या चौपट आहे. २०१० मध्ये आपल्या देशामधील अपघाती मृत्यूंची आकडेवारी आहे १.३ लाख आणि गंभीर जखमी किंवा कायमचे विकलांग झालेल्यांची संख्या आहे सुमारे ५ लाख. २०१२ मधील माहितीनुसार अपघातांमध्ये मृत्यू झालेल्यांपकी सुमारे ६० टक्के व्यक्ती १५ ते ४० या वयोगटांतील आहेत. या वयोगटामध्ये गंभीर आजारपणापेक्षा अपघाती मृत्यूंची संख्या जास्त आहे.
ही वस्तुस्थिती असूनही अशा प्रकारच्या विमाछत्राबाबत ग्राहक उदासीन असतात. मोठी शहरेच नव्हे तर लहान गावातही चार पावले चालत जाण्याऐवजी स्कूटर किंवा मोटारसायकलचा सर्रास वापर केला जातो. पुण्यासारखे शहर तर चारही बाजूंनी वाढत आहे. परंतु रस्त्यावरील दुचाकींचे प्रमाण काही कमी झालेले दिसत नाही आणि प्रत्येक जण कायम घाईतच असतो. यापकी १० टक्के लोकांकडेही वैयक्तिक अपघाती विमाछत्र असेल की नाही याबाबत शंका आहे. दुचाकींच्या बाबतीत वाहकापेक्षा मागे बसणाऱ्या व्यक्तीला जास्त धोका संभावतो, त्यांच्या बाबतीत तर हे प्रमाण फारच कमी असावयास हवे. केवळ जिज्ञासा म्हणून आजूबाजूला विचारणा करून पाहा म्हणजे या प्रकारच्या विमाछत्राबाबत किती मोठय़ा प्रमाणात उदासीनता आहे याची कल्पना येईल. आजारपणाच्या बाबतीत पूर्वसूचना मिळते आणि त्यानुसार योग्य ती खबरदारी घेतली जाऊ शकते. परंतु अपघात हा कोणत्याही प्रकारच्या पूर्वसूचनेशिवाय अचानकपणे होत असतो.
या प्रकारचे विमाछत्र गरजेचे तर आहेत, पंरतु त्याचबरोबर ते अतिशय स्वस्तही आहे. १० लाख रु.च्या मूळ विमाछत्राचे वार्षिक प्रीमियम आहे फक्त ५०० रु. यामध्ये रस्त्यावरील अपघाताबरोबर इतर अनेक गोष्टींची काळजी घेतली जाते. विजेचा शॉक, पायऱ्यांवरून पाय घसरणे, खेळताना झालेली दुखापत अशा अनेक प्रकारच्या घटना या विमाछत्रामधील व्यापक पर्यायामध्ये (ूेस्र्१ीँील्ल२्र५ी स्र्’ंल्ल) कव्हर केलेल्या असतात. मूळ विमाछत्रामध्ये फक्त अपघाती मृत्यूच्या संभावनेचा अंतर्भाव असतो. अपघातामधील व्यंगत्वासाठी थोडे वाढीव प्रीमियम आकारले जाते. यामध्येही कायमस्वरूपी किंवा तात्पुरती विकलांगता असे दोन प्रकार आहेत. पायाचे फ्रॅक्चर हे कायमस्वरूपी परंतु तात्पुरते व्यंगत्व म्हणून गणले जाते. तर हाताची बोटे तुटणे हा प्रकार अंशत: परंतु कायमस्वरूपी व्यंगत्वामध्ये धरला जातो. प्रत्येक प्रादुर्भावामध्ये माणसाच्या कमाई करण्याच्या क्षमतेवर किती परिणाम झाला आहे त्याचा विचार करून त्याप्रमाणे नुकसानभरपाई दिली जाते.
या विमाछत्रामध्ये वैद्यकीय खर्चाचाही समावेश करता येतो. परंतु ते आरोग्य विम्यापेक्षा (मेडिक्लेम) थोडय़ा वेगळ्या प्रकारचे असते. आरोग्य विम्यामधील नुकसानभरपाई ही विमाछत्राच्या १० ते २५ टक्क्यांपर्यंत मर्यादित असते. १० लाख रुपयांचे विमाछत्र असेल तर १ लाख ते २.५ लाख रुपयांपर्यंतची नुकसानभरपाई दिली जाते. इतर प्रकारच्या विमाछत्रांमध्ये वार्षकि प्रीमियम हे विमाइच्छुकाच्या वयावर अवलंबून असते. अपघाती विम्यामध्ये हा प्रकार नाही. विमाइच्छुक कोणत्या प्रकारचे काम करतो त्यावर प्रीमियमची आकारणी केली जाते. टेबलवर्क करणाऱ्यांसाठी कमी प्रीमियम असतो तर अवजड काम करणाऱ्या फॅक्टरीमधील कामगारांसाठी तो जास्त असतो. सर्वसाधारणपणे कमी धोक्याचे काम करणाऱ्या व्यक्तीला १० लाख रुपयांच्या व्यापक विमाछत्रासाठी वार्षकि प्रीमियम साधारण १,५०० रु. आहे तर तेच विमाछत्र धोकादायक काम करणाऱ्यांसाठी सुमारे २,२५० रुपयांपर्यंत आहे.
हे विमाछत्र इतर पॉलिसीबरोबर अतिरिक्क पॉलिसी (ं-िल्ल-स्र्’्रू८) म्हणून घेता येते. उदाहरणार्थ, अपघातामध्ये एक बोट तुटले तर सर्वसाधारणपणे जीवन विमा प्रकारातील पॉलिसी कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई देत नाही. त्यामधील शर्तीनुसार पूर्ण हात तुटला तरच पसे मिळू शकतात. अशा वेळी अतिरिक्त पॉलिसी कामाला येते. प्रत्येकाच्या गरजेनुसार त्यामध्ये वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.
अशा प्रकारच्या पॉलिसींमध्ये तुलनात्मक कमाई (कमिशन) फार कमी असल्याने विक्रेते त्या विकण्यासाठी फार उत्सुक नसतात. काही विक्रेते जीवन विमा किंवा वाहनांच्या विम्यासोबत या पॉलिसी विकतात. बॅकेत खाते उघडताना किंवा क्रेडिट कार्ड देताना या पॉलिसी विकल्या जातात. एकाच प्रकारच्या विमाछत्रासाठी प्रत्येक कंपनीचा प्रीमियम दर वेगळा आहे. त्यामुळे विमाछत्राची निवड करताना फक्त पशाचा विचार न करता इतर अटी आणि शर्ती अभ्यासणे आवश्यक आहे.
माझ्या मते व्यापक विमाछत्रामधील अटींचे विश्लेषण करण्यामध्ये वेळ घालविण्यापेक्षा सुरुवातीला मूळ विमाछत्र घ्यावे आणि इतर अभ्यास करून पुढील वर्षांचे प्रीमियम भरतेवेळी आपल्या गरजेइतपत व्यापक विमाछत्र घ्यावे.
(लेखक गुंतवणूक आणि विमा सल्लागार)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Your preparedness for unexpected medical emergency
First published on: 11-08-2014 at 06:51 IST