Baba Vanga Prediction September 2025: निसर्ग कधी कसा वागेल ते सांगता येत नाही… कधी उन्हाळ्याच्या तडाख्याने जीव हैराण होतो; तर कधी पावसाच्या रौद्र रूपाने सर्वत्र हाहाकार माजतो. यंदाचा मॉन्सून तर अक्षरशः दुप्पट ताकदीने बरसतो आहे. अनेक राज्यांमध्ये पूर, भूस्खलन व ढगफुटी यांमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. अमरनाथ यात्रा, वैष्णोदेवी यात्रा थांबवावी लागली, हिमाचल ते अरुणाचलपर्यंतच्या डोंगराळ भागांतील रस्ते वाहून गेले, तर पंजाबसारख्या राज्यात दशकामधील सर्वांत भीषण पूर आल्याने लाखो लोक बेघर झाले. आणि आश्चर्य म्हणजे अशाच विनाशकारी घटनांचा इशारा बाबा वेंगा यांनी २०२५ साठी आधीच दिला होता.

सातत्याने कोसळणारा पाऊस आणि डोंगरांतून कोसळणाऱ्या दरडी – अशा दोन्ही प्रकारांच्या तडाख्याने उत्तर भारत हदरलाय. हवामान विभागाने रेड अलर्ट दिलाय आणि बाबा वेंगांच्या भविष्यवाणीने लोकांच्या मनात भीतीचे सावट निर्माण झालेय. अखेर सप्टेंबरमध्ये काय होणार?

हिमाचल प्रदेशात पुढील १६–१८ तासांत अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. बिलासपूर, शिमला, सिरमौर, सोलन व ऊना या जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा धोका आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये परिस्थिती बिकट असून, सप्टेंबर महिन्यातही हा उद्रेक कायम राहणार असल्याचे भाकीत हवामान विभाग (IMD) ने केले आहे. सप्टेंबर महिन्यात सरासरी पर्जन्यमानापेक्षा तब्बल १०९ टक्के जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

IMD चे महासंचालक मृत्युंजय महापात्र यांच्या माहितीनुसार, १९८० नंतर सप्टेंबर महिन्यात पावसाचा कल वाढलेला दिसतो. यंदा तर उत्तर भारतात ऑगस्ट महिन्यात २६५ मिमी पाऊस नोंदवला गेला, जो २००१ नंतरचा विक्रम आहे. म्हणजेच सप्टेंबरमध्ये जर परिस्थिती आणखी बिघडली, तर उत्तराखंडसह हिमालयीन राज्यांमध्ये भूस्खलन, अचानक पूर व ढगफुटी अशा दुर्घटनांचा धोका टाळता येणार नाही.

दरम्यान, या अतिवृष्टीचा फटका फक्त उत्तर भारतापुरता मर्यादित न राहता, दिल्ली, हरियाणा, राजस्थानसह छत्तीसगडमधील महानदीच्या जलग्रहण क्षेत्रालाही बसणार आहे. अनेक नद्या तुडुंब वाहण्याची चिन्हे असून, खालच्या प्रदेशातील गावे-शहरे पूरग्रस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

यंदा आधीच जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांत उत्तर-पश्चिम भारतात ६१४.२ मिमी पाऊस झाला आहे, जो सरासरीपेक्षा तब्बल २७ टक्के जास्त आहे. हिमाचल, उत्तराखंड व जम्मू-काश्मीरसारख्या राज्यांचेऔ आधीच ढगफुटी, पूर, भूस्खलन यांमुळे जीवितहानी आणि प्रचंड आर्थिक नुकसान झालेले आहे.

अशा स्थितीत लोकांचा एकच प्रश्न आहे – बाबा वेंगांचा इशारा खरा ठरणार का? सप्टेंबर २०२५ खरंच देशासाठी ‘जलप्रलय’ घेऊन येणार का?

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)