Chanakya Niti: प्राचीन भारतातील एक महान व्यक्तींपैकी एक म्हणजे आचार्य चाणक्य. आचार्य चाणक्य यांना कौटिल्य किंवा विष्णुगुप्त म्हणून सुद्धा ओळखले जाते. ते एक उत्तम तत्त्वज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ज्ञ आणि राजकारणी होते. मौर्य साम्राज्य पुढे नेण्यास त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी जीवनातील विविध पैलूंवर मार्गदर्शन केले आहे. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले.
‘चाणक्य नीती’ हा त्यांनी लिहिलेला एक नीतिशास्त्र ग्रंथ आहे. यात त्यांनी जीवनातील प्रत्येक समस्येला तोंड कसे द्यावे, सामना कसा करावा, याविषयी सांगितले आहे. त्यांच्या या नीती आजही लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देतात तर कधी जीवन कसे जगावे, यासाठी मार्गदर्शन करतात.
चाणक्य यांनी त्यांच्या नीतिमध्ये काही खास लोकांविषयी सांगितले, ज्यांच्यापासून आपण नेहमी दूर राहायला पाहिजे. कारण चाणक्य यांच्या मते, हे लोक सापापेक्षा जास्त धोकादायक असतात. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
एक वाईट व्यक्ती आणि सापामध्ये फक्त एवढाच फरक आहे की साप तेव्हा चावा घेतो जेव्हा त्याचे आयुष्य धोक्यात असते पण वाईट व्यक्ती क्षणोक्षणी आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करते.
चाणक्य सांगतात, मूर्ख लोकांबरोबर मैत्री करू नये. त्यांना लगेच दूर करणे कधीही चांगले आहे.
मूर्ख विद्यार्थ्याला सल्ला देणे कधीही व्यर्थ आहे कारण ते तेच करतात जे त्यांच्या मनात असते. मूर्खांच्या मागे वेळ घालवणारे नेहमी अडचणीत येतात. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहावे
चाणक्य यांच्या मते, ज्या महिला फक्त आपल्या मनाप्रमाणे चालतात आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष करतात त्यांच्यापासून नेहमी दूर राहावे.
जे लोक फक्त धन आणि पैशांच्या मागे धावतात त्यांच्यापासून नेहमी दूर राहायला पाहिजे. अशा लोकांना नात्यांची काळजी नसते. त्यांच्यामध्ये संवेदनशीलता नसते.
जे लोक नेहमी छोट्या छोट्या अडचणींमध्ये रडतात आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी तक्रार करतात, अशा नकारात्मक लोकांपासून नेहमी दूर राहावे.
जे लोक नेहमी खूप खोटं बोलतात, त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये. अशा लोकांपासून नेहमी दूर राहावे. हे लोक आपल्याला फसवू शकतात, ज्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो.