scorecardresearch

Margashirsha Guruvar Vrat: मार्गशीर्ष गुरुवारी ‘या’ महालक्ष्मी व्रतकथेचे पठण मानले जाते शुभ; लक्ष्मी देते धनप्राप्तीची संधी

Margashirsha Mahina Guruvar Vrat Katha: महालक्ष्मी व्रतकथा ऑनलाईन स्वरूपात वाचण्यासाठी आपण हा लेख जतन करू ठेवू शकता.

Margashirsha Guruvar Vrat: मार्गशीर्ष गुरुवारी ‘या’ महालक्ष्मी व्रतकथेचे पठण मानले जाते शुभ; लक्ष्मी देते धनप्राप्तीची संधी
महालक्ष्मी व्रतकथा ऑनलाईन स्वरूपात वाचण्यासाठी आपण हा लेख जतन करू ठेवू शकता.

Margashirsha Mahina Guruvar Vrat Katha: हिंदू धर्मियांमध्ये व विशेषतः महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी वैभव लक्ष्मी व्रत करण्याची मान्यता आहे.. महालक्ष्मीचे पूजन करून घट मांडण्याची पद्धत प्रचलित आहे. या महिन्यात सवाष्णींना वाण देण्याला तसेच कन्या पूजेला विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिना यंदा २४ नोव्हेंबर पासून सुरु होत आहे. यंदा मार्गशीर्षाचा पहिलाच वार गुरुवार आल्याने या मासात पाच गुरुवार येणार आहेत. मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी घटपूजनानंतर महालक्ष्मी व्रताच्या कथेचे पठण करण्याची पद्धत आहे. महालक्ष्मी व्रतकथा ऑनलाईन स्वरूपात वाचण्यासाठी आपण हा लेख जतन करू ठेवू शकता.

मार्गशीर्ष गुरुवार २०२२ तारीख

यंदा २४ नोव्हेंबर, १ डिसेंबर, ८ डिसेंबर, १५ डिसेंबर व २२ डिसेंबर या दिवशी मार्गशीर्ष गुरुवार आहेत.

मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रतकथा

द्वापार युगात सौराष्ट्रचा राजा भद्रश्रवा हा शूर, दयाळू ,प्रजादक्ष, चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे यांचा ज्ञानी म्ह्णून ओळखला जात होता. भद्रश्रवाची राणी सुरतचंद्रिका रूपाने सुंदर, सुलक्षणी व पतिव्रता होती. भद्रश्रवा व सुरतचंद्रिकेला सात पुत्र आणि व एक कन्या अशी एकूण आठ अपत्ये होती. कन्येचे नाव होते शामबाला. एकदा माता महालक्ष्मीला राजमहालात राहण्याचा विचार आला. राजप्रासादी राहिल्यास राजा स्वतः सह इतरांचंही भलं करू शकेल. ही संपत्ती राजा गरिबांच्या हितासाठी वापरू शकेल असा महालक्ष्मीचा मानस होता. मात्र त्याआधी राजा आपल्या निवासास पात्र आहे का हे पाहण्यासाठी लक्ष्मी माता वृद्ध महिलेच्या रूपात महालात पोहोचली.

सुरतचंद्रिका राणीच्या महालाच्या दाराशी येताच वृद्ध महिलेची फाटकी वस्त्रे आणि काठी पाहून दासीने तिला अडवले. या दासीला आपली ओळख सांगताना देवीने, “माझं नाव कमलाबाई. द्वारकेला राहते, असे सांगितले. यासोबतच आपल्या येणायचे औचित्य सांगताना “तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्‍नी होती. त्या जोडप्यात नेहमी भांडणे व्हायची. कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात भटकू लागली. तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला श्रीमहालक्ष्मी-व्रताची माहिती सांगितली. तिने ते व्रत करताच तिचे दारिद्र्य संपले व घरात समृद्धीने व आनंद मृत्यूनंतर लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघे पती-पत्‍नी लक्ष्मी-लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे, मात्र आता तिला व्रताचा विसर पडला आहे याची आठवण करून येण्यासाठी मी येथे आले आहे, असेही सांगितले”. हा संवाद राणीच्या कानी पडताच तिने संतापून वृद्ध रूपातील महालक्ष्मीलाच तिथून निघून जाण्यास सांगितले.

राणीचे संतप्त बोल ऐकताच पाहून महालक्ष्मी तिथे न थांबता स्वस्थानी जाण्यास निघाली , वाटेतच तिला एक मुलगी भेटली ही, मुलगी म्हणजे राजकन्या शामबाला. शामबालेने म्हातारीची विचारपूस केली व झाला प्रकार कळताच तिची माफी मागितली. लक्ष्मीने देखील शामबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता.शामबालेने हे व्रत यथासांग पूर्ण केले. यामुळे तिच्या आयुष्यात देखील सुख येऊन तिचा विवाह सिद्धेश्वर राजपुत्र मालाधर याच्याशी झाला. शामबालेचा संसार जरी सुखाने सुरु तरी भद्रश्रवा व राणी सूरतचंद्रिका यांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली.

या परिस्थितीत भद्रश्रवा मुलीला भेटण्यासाठी परराज्यात गेला, हे समजताच शामबाला आणि मालाधर यांनी त्यांचा पाहुणचार केला. तसेच जेव्हा भद्रश्रवा जाण्यास निघाला तेव्हा शामबालाने पित्याला एक हंडा भरून धन दिले. हंडा घेऊन भद्रश्रवा घरी परतताच सुरतचंद्रिकेला भारी आनंद झाला. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. मात्र आता धनाऐवजी फक्त कोळसे होते. एकदा सुरतचंद्रिकेने लेकीच्या घरी जाण्याचे ठरवले, योगायोगाने हा मार्गशीर्षातील शेवटचा गुरुवार होता. सुरतचंद्रिका मालधराच्या राजप्रासादात पोहचताच तिने शामाबालेला व्रताचे उद्यापन करताना पाहिले. शामबालाने आईकडूनही महालक्ष्मी-व्रत करून घेतले.

काही दिवसांनी शामबाला आपल्या माहेरी आली. शामबालेने पित्याला कोळश्याचा हंडा दिला व आपल्याला रिकाम्या हाती पाठवले या रागाने सुरतचंद्रिकेने तिचे स्वागत केले नाही. तरीही शामबालेने याचा राग धरला नाही, सासरी परत निघताना तिने माहेरहून थोडे मीठ घेतले. राणी शामबाला घरी येताच मालाधराने माहेराहून काय आणलेस असे विचारले. त्यावर तिने मी संसाराचे सार आणले आहे.असे सांगते. राणी शामबाला पतीसाठी त्यादिवशी अळणी जेवण बनवते जेवणातील अळणी पदार्थ चाखून नाराज होताच शामबाला पानात थोडसं मीठ वाढते. त्या मीठाने अन्नाला चव येते. तेव्हा शामबाला म्हणते, हेच आहे माहेरुन आणलेले सार. मीठ जीवनाचे अमृत आहे !

अन्नाला चव येते ती मिठानंच ! मीठ नसलेला पदार्थ अळणी. ज्याचं मीठ खावं, त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. शामबालेच्या बोलण्यातील टोमणा ओळखून राजा मालधर निश्चयाने उठतो. आपले सेवक पाठवून भद्रश्रवास बोलवणे धाडतो. दोघांची गुप्त बैठक होते. मग ते भद्रश्रवांचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करतात. आणि भद्रश्रवाला राज्य पुन्हा मिळते. त्यानंतर सुरतचंद्रिका पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेते व आजन्म त्याचे पालन करते.

गुरुवारची महालक्ष्मी व्रताची कथा सुफळ संपूर्ण ॥

ॐ महालक्ष्मी नमः । ॐ शांतिः शांतिः शांतिः शांतिः ।

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या