पत्रिका जुळवताना कोणते ३६ गुण पाहिले जातात? पत्रिका जुळते किंवा जुळत नाही म्हणजे काय?

अनेकदा पत्रिका जुळत नसल्याने लग्न जुळत नाही वगैरे असं आपण ऐकतो. पण नक्की या गोष्टीचा अर्थ काय असतो?

patrika matching marathi
पत्रिका जुळल्यानंतर लग्नाचा विचार केला जातो (प्रातिनिधिक फोटो)

हिंदू धर्मामध्ये विवाह करताना वर आणि वधूची पत्रिका (कुंडली) जुळवली जाते. यामध्ये दोन्ही पक्षातील म्हणजेच वर आणि वधूचे किती गुण जुळतात हे पाहिलं जातं. याच आधारावर त्यांचं लग्न शक्य आहे की नाही हे ठरवलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार लग्न जुळवण्यासंदर्भातील एकूण ३६ गुण आहेत. वर आणि वधूचे लग्न होण्यासाठी कमीत कमी १८ गुण जुळणं आवश्यक आहे. पत्रिकेमधील किमान १८ गुण जळले तरच लग्न होऊ शकतं नाहीतर लग्न लागू शकत नाही असं सांगितलं जातं. दोघांचेही वैवाहिक आयुष्य सुखी, सामाधानी असावं यासाठी पत्रिका जुळवून पाहिल्या जातात. अनेकदा पत्रिका जुळत नसल्याने लग्न जुळत नाही वगैरे असं आपण ऐकतो. पण पत्रिकेमध्ये जुळवण्यात येणारे हे ३६ गुण नक्की असतात तरी काय आणि पत्रिका जुळवताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं जात जाणून घेऊयात…

ते ३६ गुण कोणते?
विवाह जुळवण्यासाठी पत्रिकेमधील अष्टकूट गुण जुळतात की नाही ते पाहिलं जातं. यामध्ये नाडीसंदर्भातील आठ गुण, भटूकचे सात गुण, गण मैत्रीसंदर्भातील सहा गुण, ग्रह मैत्रीसंदर्भातील पाच गुण, योनि मैत्रीसंदर्भातील चार गुण, ताराबलाचे तीन गुण, दोन गुण वश्य आणि एक गुण वर्षाचा असतो. या प्रकारे एकूण ३६ गुणांची तुलना करुन ते जुळतात की नाही हे पाहिलं जातं.

गुण का जुळवले जातात?
लग्नानंतरही वर आणि वधू एकमेकांसाठी अनुकूल जोडीदार ठरावेत, त्यांच्या संतती आणि संपत्तीमध्ये वाढ व्हावी, त्यांना दिर्घायुष्य मिळावं यासाठी दोघांचे ३६ गुण जुळवून पाहिले जातात. मुहूर्तचिंतामणि ग्रंथामध्ये अष्टकूटमधील वर्ण, वश्य, तारा, योनि, ग्रह मैत्री, गण, भटूक, नाडी या गुणांचा विचार केला जातो.

किती गुण जुळल्यास लग्न होतं?
लग्न ठरवण्यासाठी वर आणि वधूचे किमान १८ गुण जुळणे आवश्यक असतं. किमान १८ आणि त्यावर कितीही गुण जुळले तरी लग्न लावता येतं असं म्हणतात. एकूण ३६ गुणांपैकी १८ ते २१ गुण जुळल्यास त्याला मध्यम मिलन असं म्हटलं जातं. याहून अधिक गुण जुळत असतील तर त्याला शुभ मिलन विवाह असं म्हणतात. कोणत्याही वधू आणि वराचे सर्वच्या सर्व म्हणजे ३६ गुण जुळणं हे अत्यंत दुर्लभ मानलं जातं. धार्मिक मान्यतांनुसार भगवान श्रीराम आणि सीतामातेचे ३६ गुण जुळले होते.

पत्रिका जुळत नाही म्हणजे काय?
जेव्हा वधू आणि वर या दोघांच्या पत्रिकेमधील १८ हून कमी गुण जुळतात तेव्हा त्याला पत्रिका जुळली नाही असं म्हणतात. १८ हून कमी गुण जुळणाऱ्यांनी लग्न करु नये असं म्हटलं जातं. अशा पत्रिका न जुळलेल्या व्यक्तींनी लग्न केल्यास त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी येतात अशं म्हटलं जातं.

पत्रिका जुळवताना काय लक्षात घेतलं पाहिजे?
पत्रिका जुळवताना एखाद्याच्या पत्रिकेत मंगळ असेल तर अशा व्यक्तीची पत्रिका मंगळ असणाऱ्या व्यक्तीशीच जुळवली पाहिजे. सामान्य पत्रिका असणाऱ्या व्यक्तीने पत्रिकेत मंगळ असणाऱ्या व्यक्तीशी लग्न करु नये असं सांगितलं जातं.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. यासंदर्भातील निर्णय किंवा सल्ला घेण्यासाठी संबंधित विषयामधील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Patrika matching marathi horoscope which are those 36 guna kundli milan scsg

Next Story
‘या’ ३ राशींची मुले मानली जातात परफेक्ट लाइफ पार्टनर, तुमच्या जोडीदाराची रास यामध्ये आहे का? जाणून घ्या
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी