Guru Shani Sanyog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची हालचाल म्हणजेच ग्रहचाल माणसाच्या आयुष्यावर सूक्ष्म आणि प्रभावी परिणाम करणारी असल्याचे मानले जाते. विशेषतः शनी आणि गुरू हे दोन्ही ग्रह जेव्हा त्यांच्या स्थितीत बदल करतात, तेव्हा त्यांच्या प्रभावाचा अनेक राशींच्या लोकांवर परिणाम झाल्याचे दिसून येते. आता २८ नोव्हेंबरपासून शनिदेव मार्गी अवस्थेत जाणार आहेत म्हणजेच त्यांच्या उलट्या गतीला पूर्णविराम मिळून, ते पुन्हा सरळ चालायला सुरुवात करतील. त्याच वेळी देवगुरू बृहस्पती ११ नोव्हेंबरपासून वक्री होणार आहेत आणि ४ फेब्रुवारीपर्यंत ते या स्थितीत राहणार आहेत. ही दोन ग्रहांची प्रभावी चाल एकत्र आल्यामुळे काही राशींच्या लोकांसाठी येणारे तीन महिने अत्यंत शुभ, संधी आणि सकारात्मकतेने भरलेले ठरू शकतात, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. पाहूया कोणत्या आहेत त्या चार ‘लकी’ राशी, ज्या राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे…
कर्क
हा काळ कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवातींचा मानला जातो. त्यामुळे त्यांची दीर्घकाळापासून अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीतील अडचणी कमी होतील आणि वरिष्ठांकडून कौतुक होण्याचे योग संभवतात. प्रवास, गुंतवणूक किंवा परदेशाशी संबंधित व्यवहारात लाभ मिळू शकतो. घर किंवा वाहनासाठी गुंतवणूक करण्याचीही इच्छा पूर्ण होऊ शकते. काही जणांची जुन्या मित्राशी अचानक भेट होण्याची शक्यता आहे, जी तुमच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरू शकते. मोठा धनलाभ होऊ शकतो.
सिंह
हा ग्रहयोग सिंह राशीच्या लोकांसाठी घरगुती आणि आर्थिक स्थैर्य आणणारा मानला जातो. भावंडांशी असलेले मतभेद मिटण्याची शक्यता आहे. काहींना वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळू शकतो. ज्यांना संततीबाबत चिंता होती, त्यांच्यासाठी चांगली बातमी मिळू शकते. हा काळ परिवारात आनंद, एकत्रितपणा आणि समाधान देणारा राहू शकतो. ज्यांनी एखाद्याला पैसे उधार दिले आहेत, त्यांच्याकडे ते पैसे आता परत येण्याचे योग दिसत आहेत. एकूणच ‘घरातील ताणतणाव संपून सौख्य लाभेल’, असा हा काळ म्हणता येईल.
वृश्चिक
हा काळ वृश्चिक राशीच्या लोकांसाठी स्वतःची ओळख आणि आत्मविश्वास वाढविणारा ठरू शकतो. कामाच्या क्षेत्रात प्रगती होईल, काहींना नवी जबाबदारी किंवा पदोन्नती मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढेल; तर काहींच्या बाबतीत धार्मिक किंवा अध्यात्मिक प्रवासाचा योग जुळून येऊ शकतो. या कालावधीत तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अध्ययनात लक्ष केंद्रित करण्याचा आणि उत्तम यश मिळविण्याचा राहू शकतो. कुटुंबीयांकडून पाठिंबा मिळेल आणि मानसिक समाधान जाणवेल.
कुंभ
शनीच्या चालीनं कुंभ राशीच्या लोकांसाठी एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी अडकलेली प्रकरणं मार्गी लागतील आणि वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळू शकेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. आर्थिक स्थैर्य मिळण्याची शक्यता आहे. काहींच्या बाबतीत परदेश प्रवासाचे किंवा व्यवसायाच्या विस्ताराचे योग जुळू शकतात. संतानसुख, मानसिक शांती आणि कौटुंबिक समाधान यांचा लाभ होईल. जुन्या गैरसमजुती दूर होतील आणि मनातला ताण हलका होईल.
शेवटी ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची ही विशेष स्थिती काही राशींच्या लोकांसाठी नवा अध्याय सुरू करू शकते. मात्र, या शक्यता फक्त ग्रहस्थितीवर आधारित असून, प्रत्येकाचे फळ त्याच्या कर्मानुसार ठरते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)
